प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी ऱ्हेनिअमच्या बाबतीतली एक गोष्ट म्हणजे ऱ्हेनिअमच्या २७ समस्थानिकांतील तीन समस्थानिके, १९५५च्या आसपास, भारतीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक बी.सी. हालदर यांनी सर्वप्रथम बनविली आहेत. ती समस्थानिके आहेत ऱ्हेनिअम-१७७, ऱ्हेनिअम-१७८ आणि ऱ्हेनिअम-१८०. यांच्या ऑक्सिडेशन अवस्था (oxidation states) देखील किती असाव्यात? अगदी उणे एक (-१) ते अधिक सातपर्यंत (+७). कुणाशीही कशाही तऱ्हेने जोड करायला तय्यार! म्हणूनच ऱ्हेनिअम कधी एकटं, स्वतंत्र असं मिळतच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त ऱ्हेनिअमच्या अशा खाणी नसतात तर ते इतर धातू- उदाहरणार्थ प्लॅटिनम, मॉलिब्डेनम किवा तांब्याच्या खाणींमध्ये मिळतं. पृथ्वीवर ऱ्हेनिअमचं प्रमाण अत्यंत कमी आहे. चिली, पेरू, अमेरिका आणि कझाकिस्तान या देशांमध्ये इतर खनिजांमध्ये ऱ्हेनिअम आढळतं. चायना ऱ्हेनिअम मर्यादित (लिमिटेड) ही कंपनी ऱ्हेनिअम या धातूवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून विविध स्वरूपांत; म्हणजे ऱ्हेनिअमचा पत्रा, तापवायच्या जाळ्या, छोटे दांडे इत्यादी तयार करून या वस्तूंची विक्री करते.

ऱ्हेनिअमचा उपयोग – त्याच्या अतिउच्च तापमानाला टिकून राहण्याच्या गुणधर्मामुळे – प्रामुख्याने विमानाचे जेट इंजिन बनविण्याच्या कामी केला जातो. तसेच अतिशय क्रियाशील असल्यामुळे ऱ्हेनिअम हे इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये वेग वाढविण्यासाठी म्हणजेच उत्प्रेरक म्हणून उपयोगात येतं. प्लॅटिनमबरोबर ऱ्हेनिअम उत्प्रेरक म्हणून शिसेरहित पेट्रोल बनविण्याकरिता मोठय़ा प्रमाणात वापरलं जातं.

माणसाने मात्र पूर्ण खबरदारी घेऊनच ऱ्हेनिअम हाताळायला हवं, नाहीतर छान चंदेरी दिसते म्हणून हातात घ्यायला जाऊ ; पण अंगाला खाज सुटून बेजार होऊ .. झालंच तर त्याच्या ज्या वाफा येत असतात त्याने गुंगी येते.

तसं म्हणाल तर, हे पृथ्वीवर दुर्मीळ असणारं ऱ्हेनिअम आपल्याला कुठे हातात मिळणार! पूर्ण जगामध्ये वर्षांला अवघं ४० ते ५० टन ऱ्हेनिअम खनिजांपासून वेगळं केलं जातं. त्यामुळे याची किंमत पण अफाट आहे. किती असावी माहितेय? एका किलोला तब्बल अडीच ते चार लाख रुपये. तेव्हा आपण त्याच्या उपयोगाने बनवलेलं पेट्रोल किंवा जेट इंजिनमधील त्याचं अस्तित्व यावरच समाधान मानू, हे बरं!

– डॉ. विद्यागौरी लेले

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metal in jet engine
First published on: 13-09-2018 at 00:44 IST