राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्रांची (नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजिकल सायन्स – एनसीबीएस) अधिकृत स्थापना आक्टोबर १९९१ मध्ये बंगळूरु येथे झाली आणि जुलै १९९२ मध्ये कार्यालयीन व्यवस्थापनाच्या पहिल्या सभेसह त्याचे अधिकृत कामकाज सुरू झाले. डॉ. ओबेद सिद्दिकी या केंद्राचे संस्थापक-संचालक होते. जैव विज्ञानातील मूलभूत व सर्व प्रगत शाखांमधील संशोधनासाठी अत्याधुनिक सुविधा असणारे हे भारतातील प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा एक स्वायत्त भाग असून ते बंगळूरु येथील गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरातील २० एकर जागेवर अद्यायावत सोयींनी समृद्ध असलेल्या इमारतींत कार्यरत आहे. या केंद्रात अणू, पेशी आणि प्राणी यांचा अभ्यास प्रायोगिक आणि संगणकीय दृष्टिकोनातून केला जातो. जीवनप्रक्रियेच्या सर्वांगीण दृष्टीने सर्व टप्प्यांवरील प्रगतीसाठी जैवविज्ञानाचे आकलन करून घेणे हे या केंद्राचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे केंद्र जैवरसायन, जैवभौतिकशास्त्र, संगणकआधारित जैवमाहितीशास्त्र, मज्जा जीवशास्त्र, पेशीय संरचना व संकेत, जनुकशास्त्र, परिसंस्थाशास्त्र, उत्क्रांती इत्यादी जीवशास्त्राच्या विविध शाखांमध्ये मूलभूत संशोधन करते.
सायमन सेंटर फॉर स्टडीज ऑफ लिव्हिंग मशिन्स, एनसीबीएस- मॅक्स प्लॅन्क लिपिड सेंटर, केमिकल इकॉलॉजी, अॅक्सेलेटर प्रोग्राम फॉर डिस्कव्हरी इन ब्रेन डिसऑर्डर्स यूजिंग स्टेमसेल्स, मास्टर्स इन वाइल्डलाइफ बायॉलॉजी अॅण्ड कॉन्झर्व्हेशन आणि अरकाईवज् अॅट एनसीबीएस या उपकेंद्रांमध्ये संशोधन केले जाते.
राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्राने भारतातील उत्कृष्ट जैविक संशोधनातील उच्च दर्जाचा केद्रबिंदू असलेले बंगलोर लाइफ सायन्स क्लस्टर बनवले आहे, ज्यामध्ये भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या ‘इनस्टेम’ (इन्स्टिट्यूट फॉर स्टेमसेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन) आणि ‘सीकॅम्प’ (सेंटरफॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्युलर प्लॅटफॉर्म) या दोन महत्त्वाच्या संस्थांचा समावेश आहे. इनस्टेम ही मूळ पेशी विज्ञानात संशोधन करणारी भारतातील पहिली संस्था असून पुनरुत्पादक औषध म्हणजे मानवी किंवा प्राण्यांच्या शरीराचे कार्य सामान्य होण्यासाठी पेशी, ऊती अथवा अवयव पुन्हा स्थापित करणे किंवा त्यांचे पुनरुत्पादन करण्यासाठीचे महत्त्वाचे संशोधन करते. सीकॅम्प हे जीवशास्त्रातील तंत्रज्ञान, संशोधन व उद्याोजकता यासाठी सुविधा पुरवणारे केंद्र आहे.
राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्र जीवशास्त्रातील विविध क्षेत्रांतील संशोधनासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि वन्यजीवशास्त्र आणि संवर्धन या विषयात एम.एस्सी. ही पदवी प्रदान करते.
अनघा शिराळकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org