होळीनंतरचा दुसरा दिवस धुळवडीचा. रंगपंचमी उशिरा असते. पण अनेकदा आपण धुळवडीलाच रंगांची होळी ‘खेळतो’. केव्हाही खेळोत, पण त्यासाठी रासायनिक रंग सर्रास वापरले जातात. पाण्यामध्ये मोठय़ा प्रमाणात रासायनिक रंग मिसळून जलप्रदूषणही केले जाते. तसेच आपल्या त्वचेचे आणि इतर महत्त्वाच्या अवयवांचे होणारे नुकसान, हा त्याचा दुसरा दुष्परिणाम. एकूणच बदलत्या परिस्थितीत हा सण पर्यावरणानुकूल करण्यासाठी नैसर्गिक रंग वापरायला हवेत.
रासायनिक रंगांचा आपल्या त्वचेशी संबंध येणे घातक आहे; कारण ते त्वचेशी अभिक्रिया करतात. रंग खेळून झाल्यानंतर ते धुऊन टाकताना त्वचा त्या रंगांसोबत उखडून निघते. दुसरे म्हणजे ते धुण्यासाठी घातक आणि कर्करोग निर्माण करणारी अनेक सेंद्रिय विद्रावके (सॉल्व्हेन्ट्स) वापरली जातात. तसेच कणरूपातील सुके धातूमिश्रित रंग आपल्या श्वसनयंत्रणेत आणि पोट तसेच शरीरात त्वचेमार्फत शिरतात.
स्वस्त आणि धोकादायक रासायनिक रंग, हलक्या प्रतीच्या प्लास्टिकच्या पिचकाऱ्या आणि रंग फेकून मारण्याकरिता वापरले जाणारे फुगे वा पातळ प्लास्टिकच्या पिशव्या.. हे सर्व आपल्या धुळवडीच्या संस्कृतीत कधीच नव्हते. श्रीकृष्णाने खेळलेल्या धुळवडीचे पौराणिक उल्लेख आहेत; त्यात- धुळवड फुलांच्या पाकळ्यांनी खेळली जायची, असे म्हटले आहे. सर्व रंगीत पाकळ्यांनी फुलून आलेला निसर्ग या सणाला रंग द्यायचा!
आजही सर्व रंगीत नैसर्गिक फुले, फळे व पानांचे रंग आपण धुळवडीत निर्धोकपणे वापरू शकतो. सर्व खायचे रंग वा खायच्या पदार्थाचे रंग आपल्या त्वचेला इजा करत नाहीत. त्वचेवर लावायचे पारंपरिक रंग म्हणजे मेहंदी किंवा मुलतानी माती निर्वेधपणे वापरता येईल. शरीराला रंग फासून खेळायच्या धुळवडीला पर्याय म्हणून पाण्याच्या दुर्भिक्षाच्या काळात तिलक होळी म्हणजे रंगाचा केवळ टिळा लावण्याची पर्यावरणानुकूल पद्धत पुढे आली आहे. काही ठिकाणी कोरडी किंवा पाणीविरहित धुळवड/ रंगपंचमीही साजरी केली जाते.
शेवटी एक ध्यानात घ्यायला हवे की, जेवढा भडक आणि चमकदार रंग, तेवढा तो धोकादायक. अनेकदा चमक ही काचेच्या चुऱ्यामुळे येते. आजही बाजारात नैसर्गिक रंग आहेत असे सांगत विक्रेते ते रंग पाण्यात विरघळवून दाखवतात; पण नैसर्गिक स्रोतांतून तयार केलेले रंग सहजपणे पाण्यात विरघळत नाहीत, तर पाण्यात बारीक कणांच्या स्वरूपात तरंगतात, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे यंदाची धुळवड/ रंगपंचमी स्वत: नैसर्गिक रंग तयार करून खेळली तर ती खरी पर्यावरणनिष्ठ होईल.
– विद्याधर वालावलकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org