नेपच्युनिअमचा शोध लागल्याचे अनेक वेळा घोषित झाले पण ते दावे फोल ठरले. १९३४ मध्ये युरेनिअमवर न्यूट्रॉनचा मारा करून नेपच्युनिअम व प्लुटोनिअमचा शोध लागला असे एन्रिको फर्मी यांना वाटले. इडा नोडॅक या जर्मन महिला शास्त्रज्ञाने या शोधाला आक्षेप घेतला. वास्तवात फर्मीने युरेनिअमचे विखंडन केले होते. इडा नोडॅकने अणू विखंडन प्रक्रियेचा अभ्यास केला होता. हीच अणू विखंडन प्रक्रिया आपण आजही अणुभट्टीमध्ये अणुऊर्जा मिळविण्याकरिता वापरतो. त्यामुळे फर्मी यांची ओळख अणुभट्टीचे जनक अशी आहे. दुसऱ्यांदा, १९३८ साली रोमन भौतिकशास्त्रज्ञ होरिया हुलुबे व फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ कॉकोइज (Cauchois) यांनी नेपच्युनिअमचा शोध लागल्याचा दावा केला, पण नेपच्युनिअम निसर्गात आढळत नाही या आधारावर हाही दावा खोटा ठरला.

१९४० मध्ये एडविन मॅकमिलन व फिलीप एबलसन यांनी बर्कले (कॅलिफोर्निया) येथे यशस्वीरीत्या नेपच्युनिअमचा शोध लावला. युरेनिअमवर कमी वेगाच्या न्यूट्रॉनचा मारा केल्यावर याचा शोध लागला. विशिष्ट प्रकारच्या बीटा किरणांच्या उत्सर्जनामुळे नवीन समस्थानिक शोधल्याचे त्यांच्या लक्षात आले. एबलसनने हे मूलद्रव्य नेपच्युनिअम असल्याचे सिद्ध केले. १९५१ मध्ये एडविन मॅकमिलन यांना नेपच्युनिअमच्या शोधासाठी रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

Pakistani youTuber viral video
VIDEO: लाइफस्टाइल ब्लॉगरचा उच्छाद थांबेना! पाकिस्तानी यूट्यूबरने बहिणीच्या मृत्यूनंतर केलेलं ‘हे’ कृत्य पाहून प्रेक्षकही भडकले
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…

ग्रहमालेत जसे युरेनसनंतर नेपच्युन येतो तसे आवर्तसारणीत या मूलद्रव्याला युरेनिअमनंतर म्हणून नेपच्युनिअम नाव देण्यात आले. हे मूलद्रव्य चांदीप्रमाणे चकाकते, पण हवेत उघडे राहिल्यास ऑक्साइडच्या थरामुळे काळवंडते. नेपच्युनिअमच्या तीन समस्थानिकांपकी २३७ अणुवस्तुमानांक असणारा समस्थानिक सर्वात स्थिर आहे. युरेनिअमनंतर येणाऱ्यामूलद्रव्यांना युरेनिअमोत्तर (transuranic) असे संबोधले जाते.

जितका अणू मोठा व जड होत जातो तितकीच त्याची अस्थिरताही वाढते. ज्याप्रमाणे वर्गात पटसंख्या वाढली की वर्गावर नियंत्रण ठेवणे अवघड होते तीच तऱ्हा मोठय़ा व जड अणूंची. केंद्रकीय बल छोटय़ा अणूंना बरोबर नियंत्रित ठेवतो. पण अणूचा आकार वाढला की केंद्रकीय बलाला जड मूलद्रव्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.

किरणोत्सारी असल्याने नेपच्युनिअम विषारी आहे. हाडात याचा संचय घातक ठरतो. युरेनिअमोत्तर सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी असल्याने ते हाताळताना अतिशय काळजी घ्यावी लागते.

– सुधा सोमणी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org