नायलॉनची उच्च ताकद आणि लंबनक्षमता यामुळे औद्योगिक वापराच्या कापडासाठी हे तंतू अतिशय लोकप्रिय आहेत. इतकंच नव्हे तर औद्योगिक क्षेत्रात वापरला जाणारा नायलॉन हा पहिला तंतू आहे. सायकल, मोटरसायकल आणि मोटरगाडय़ांचे टायर बनविताना नायलॉन तंतूंपासून तयार केलेले धागे (टायर कॉर्ड) वापरले जातात. विविध प्रकारचे दोर आणि पॅराशूटचे दोरखंड, बोटी ओढून नेऊन बांधण्याकरिता आणि पर्वत चढून जाण्याकरिता वापरले जाणारे दोरखंड नायलॉनचेच असतात. मच्छीमारांची जाळी आणि खेळात वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या जाळ्या बनविताना नायलॉन तंतूंचा उपयोग केला जातो. मोटरगाडय़ांतील सीटकव्हर, तसेच उद्योगामध्ये वापरले जाणारे वाहक पट्टे (कन्व्हेअर बेल्ट) नायलॉनपासून बनविले जातात. मोटारगाडय़ा व विमानातील सुरक्षितता पट्टे, प्रवासी बॅगा, पाठपिशव्या (हॅवर सॅक) या सगळ्यांच्या निर्मितीसाठी नायलॉनचा उपयोग केला जातो. हवाई छत्री हवेत तरंगत असता खाली येत असल्यामुळे तिचे वजन कमी असावे लागते. तसेच हवेच्या दाबात टिकून राहणारे (न फाटणारे) कापड लागते. त्यामुळे हवाई छत्रीकरितासुद्धा नायलॉनच्या कपडय़ाचा वापर केला जातो. पूर्वी पावसाळी छत्रीकरिता सुती कापडाचा वापर केला जायचा. वजनाने हलके, विविध रंगांत किंवा छापील कापड नायलॉनमुळे उपलब्ध झाले. शिवाय या कापडाची जलशोषण क्षमता कमी असल्यामुळे छत्रीच्या सुती कापडासारखे नायलॉनच्या छत्रीच्या कापडाचे वजन वाढत नाही.     घरी, कार्यालयात, हॉटेलमध्ये वापरली जाणारी कारपेट नायलॉनपासून बनविली जातात. आपण रोज वापरतो ते दात घासायचे ब्रशसुद्धा नायलॉन तंतूंपासूनच बनविले जातात.
याचप्रमाणे घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीचे अनेक प्रकारचे ब्रश तयार करण्यासाठी नायलॉनचाच वापर करतात. याशिवाय नायलॉनपासून औद्योगिक यंत्रांना लागणारी बेअिरग चक्रे इत्यादी वस्तू बनविताना नायलॉनचा वापर केला जातो. तसेच उद्योगात वापरल्या जाणाऱ्या मालवाहू ट्रॉली किंवा गाडय़ा यांची चाके तयार करण्यासाठी नायलॉनचा वापर केला जातो.
इतक्या विविध क्षेत्रांत उपयोगात येणारा नायलॉन हा वस्त्रोद्योगातील पहिला तंतू आहे. जवळपास सर्व नसíगक तंतूंपेक्षा हा तंतू वरचढ ठरला. नायलॉनमुळे वस्त्रोद्योगाच्या कक्षा मोठय़ा झाल्या आणि वस्त्रोद्योगाने स्थापत्य, उद्योग, क्रीडा, कृषी, मोटरगाडय़ा, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आणि आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळेच नायलॉन धाग्याला स्वप्नातील धागा असे म्हटले जाते.
– चं. द. काणे  (इचलकरंजी) , मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – पतियाळा नेकलेस
विविध मौल्यवान दागदागिन्यांचा शौकीन असलेल्या पतियाळा महाराजा भूिपदरसिंग यांचे युरोपात वरचेवर भ्रमण असे. एखादी वस्तू पसंत पडली, की किमतीबद्दल फार विचार न करता ती विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवण्यासाठी ते उतावीळ होत. महाराजांच्या संग्रही असलेला जगप्रसिद्ध ‘पतियाळा नेकलेस’ हा हार राजेमहाराजे, उमराव अशा धनिकांच्या वर्तुळात मोठा चच्रेचा विषय झाला. या पाच पदरी हारामधील ‘डी बिअर्स’ हा मुख्य हिरा जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा होता.  पॅरिस येथील जगप्रसिद्ध जवाहिरे कार्टयिर हे पूर्वीपासून महाराजांचे हिऱ्या-मोत्याचे दागिने घडवीत असत. महाराजांनी आपल्याजवळचा डी बिअर्स हिरा चार्ल्स कार्टियरला देऊन हा बहुचíचत ‘कोलीयर डी पतियाळा’ ऊर्फ पतियाळा नेकलेस तयार करवून घेतला. पाच पदरांच्या प्लॅटिनम साखळ्यांमध्ये २९३० मौल्यवान हिरे आणि मौल्यवान मोती गुंफून तयार केलेल्या या हाराचे वजन ९६२ कॅरेट्स होते. मध्यातील पदकाच्या मध्यभागात २३५ कॅरेटचा पिवळ्या रंगाचा डी बिअर्स हिरा आणि त्याच्या सर्व बाजूंनी इतर सात हिरे १८ ते ७३ कॅरेट वजनाचे असे या हाराचे स्वरूप होते. १९२८ साली तयार झालेल्या या अति मौल्यवान हाराची सध्याची किंमत ३० दशलक्ष डॉलर अशी अफाट झाली असती!
 असा हा मौल्यवान पतियाळा नेकलेस भूिपदरसिंगांनी व नंतर त्यांचे पुत्र यदिवद्रसिंग यांनी विशेष कार्यक्रमप्रसंगी वापरला, परंतु १९४८ साली राजमहालातून रहस्यपणे गायब झाला. पुढे १९९८ साली कार्टियर पेढीच्या एका माणसाला हा हार लंडनच्या पुरातन वस्तू व जवाहिऱ्याच्या एका दुकानात दिसल्यावर त्याने तो विकत घेतला, पण त्यातले डी बिअर्स आणि सात मौल्यवान हिरे काढून घेतलेले आढळले. कार्टयिर पेढीने या सर्व गायब झालेल्या मौल्यवान हिऱ्यांऐवजी कृत्रिम हिरे व मोती बसवून हा हार पूर्ववत बनविण्याचा प्रयत्न केलाय. न्यूयॉर्क येथील फिफ्थ अ‍ॅव्हेन्यूमधील कार्टयिरच्या शोरूममध्ये सध्या हा हार केवळ प्रदर्शनासाठी ठेवला गेला आहे.
 सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com