तत्त्वज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा काय संबंध असा प्रश्न पडू शकतो, परंतु थोडे खोलात जाऊन पाहिल्यास असे दिसते की या दोघांचाही परस्पर संबंध आहे व या दोन्ही विषयांचे धागे-दोरे एकमेकांत गुंतलेले आहेत. दोन्ही आपआपल्या पण वेगवेगळ्या पद्धतीने वास्तव आणि मानवी चेतना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच मज्जातंतूशास्त्र व मानसशास्त्र यांवरील सखोल अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेले पॉल माँटगोमेरी चर्चलँड महत्त्वाचे ठरतात. आज एक प्रसिद्ध कॅनेडियन विचारवंत असलेल्या पॉल चर्चलँड यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला.
कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ व्हावी यासाठी त्यांनी संगणकशास्त्र, मज्जातंतूशास्त्र (न्युरो सायन्स), संज्ञानात्मक विज्ञान (कॉग्निटीव सायन्स) आणि मानसशास्त्र यांच्या संलग्न संशोधनावर भर दिला. पारंपरिक आणि नैसर्गिक तत्त्वज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देणारे ते एक आधुनिक विचारवंत आहेत. त्यांच्या विचारांची झलक त्यांनी केलेल्या भाष्यांवरून व लिहिलेल्या शोध निबंधांवरून दिसते.
हेही वाचा >>> कुतूहल : ही सारी चॅटबॉटची किमया!
कृत्रिम बुद्धिमत्तेला नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या समान पातळीवर येण्यास किती अवधी लागेल असे विचारले असता, ते म्हणतात की काही बाबतीत आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेपर्यंत नेऊन ठेवलेदेखील आहे, जे काही अडथळे सध्या दिसत आहेत ते आपण लवकरच ओलांडून जाऊ असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आपले ध्येय मानवी क्षमतेचा कृत्रिम मेंदू बनवणे हे नसावे कारण ते तर मनुष्य जन्मापासून, अनादिकालापासून नैसर्गिकपणे होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला आपण काही विशिष्ट प्रकारच्या संज्ञानात्मक क्षमतांसाठी विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.
चर्चलँड आपल्या अभ्यासाच्या जोरावर असे म्हणतात की येत्या काळात आपण आपल्या मेंदूतील विशिष्ट कप्प्यात संगणकाद्वारे नियंत्रित कृत्रिम मज्जातंतू रोपण करू शकू त्याद्वारे आपली विचार करण्याची क्षमता अधिक प्रभावी होईल. तसेच झीज झालेल्या निकामी मज्जातंतूंवरदेखील हा उपाय असू शकेल. त्यांनी केलेल्या वरील विधानांचे वास्तवात रूपांतर आज आपण काही प्रमाणात पाहू लागलोही आहोत.
पत्नी पॅट्रिशिया बरोबर त्यांनी अनेक पुस्तके तसेच शोधनिबंध लिहिले आहेत. १९९० मध्ये लिहिलेले ‘मशीन विचार करू शकते?’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. तसेच ते अनेक नावाजलेल्या संशोधन संस्थांशी संलग्न आहेत. चर्चलँड यांच्यासारख्या बहुआयामी विचारवंतांच्या प्रगल्भ व समग्र विचारांतून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सर्वांगीण विकासास अधिक चालना मिळते, यात शंकाच नाही.
– कौस्तुभ जोशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org