scorecardresearch

कुतूहल : मूलद्रव्ये : प्रकाश देणारा-  फॉस्फरस

फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पती झाली.

फॉस्फरस-स्फोटाचे संग्रहित छायाचित्र (‘विकिमीडिया कॉमन्स’वरून साभार)

अणुक्रमांक १५ आणि अणुभार ३१ असलेल्या फॉस्फरस या मूलद्रव्याचे आवर्तसारणीतील स्थान तिसऱ्या आवर्तनात आणि १५व्या गणात आहे. फॉस्फरसची एकंदर २३ समस्थानिके आढळत असली (अणुभार २४ ते ४६) तरी ३१ अणुभार किंवा १६ न्यूट्रॉन्स असलेले समस्थानिक वगळता इतर सर्व समस्थानिक किरणोत्सारी आणि अस्थिर आहेत, त्यामुळे फॉस्फरसचे एकच समस्थानिक आहे असे मानले जाते.

फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पती झाली. पांढरा फॉस्फरस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आला असता मंद प्रकाश देतो म्हणून त्याला फॉस्फरस असे नाव दिले गेले.

फॉस्फरसची पांढरा आणि तांबडा ही दोन अपरूपे आढळतात, पण क्रियाशील मूलद्रव्य असल्याने फॉस्फरस निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. काही खनिजांचा अपवाद वगळता फॉस्फरस, ऑक्सिजनच्या संयुग स्वरूपात आढळतो. पांढरा फॉस्फरस हा अधातू असून तो घन स्वरूपात असतो. मेणासारखा पृष्ठभाग असलेला हा पदार्थ मऊ असतो. रासायनिकदृष्टय़ा अतिक्रियाशील असलेल्या पांढऱ्या फॉस्फरसचे सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे तांबडय़ा फॉस्फरसमध्ये रूपांतर होऊ  लागते. काही प्रमाणात तांबडय़ा फॉस्फरसच्या मिश्रणामुळे याचा रंग पिवळसर दिसू लागतो आणि म्हणून याला पिवळा फॉस्फरस असेही म्हणतात. ऑक्सिजनच्या सान्निध्यात मंद हिरवा-निळा प्रकाश देणारा पांढरा फॉस्फरस हवेमध्ये पटकन पेट घेतो. जळणाऱ्या फॉस्फरसचा लसणीसारखा वास येतो. स्वयंस्फूर्त पेटण्याच्या गुणधर्मामुळे युद्धात वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्यामध्ये याचा वापर करतात.

चार अणु एकत्र येऊन पांढऱ्या फॉस्फरसचा एक रेणू तयार होतो. तो P4 असा दर्शविला जातो. पांढऱ्या फॉस्फरसला ऑक्सिजन-विरहित वातावरणात २५०अंश सेल्सिअसपर्यंत तापविले असता तांबडा फॉस्फरस तयार होतो. पांढऱ्या फॉस्फरसचे अनेक रेणू एकत्र येऊन त्यांची शृंखला तांबडय़ा फॉस्फरसमध्ये तयार होते. पांढऱ्या फॉस्फरसपेक्षा कमी क्रियाशील असलेला तांबडा फॉस्फरस चटकन पेट घेत नाही. स्फटिकरूपात आढळणाऱ्या पांढऱ्या फॉस्फरसच्या तुलनेत तांबडा फॉस्फरस अस्फटिकी रूपात असतो. भुताच्या गोष्टींमध्ये आवर्जून असणारा स्मशानातील रात्रीचा पिवळसर प्रकाश आठवतोय? स्मशानातील हाडांमध्ये असणाऱ्या फॉस्फरसची हवेशी होणारी अभिक्रिया हे एक कारण या प्रकाशामागे असू शकते.

योगेश सोमण, मुंबई 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Phosphorus giving light

ताज्या बातम्या