प्रशांतचंद्र महालनोबीस मुख्यत: ओळखले जातात ते भारतातील संख्याशास्त्राचे जनक म्हणून.   स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या आर्थिक नियोजनात त्यांनी कळीचे योगदान दिले. कोलकाता येथे २९ जून १८९३ रोजी त्यांचा जन्म झाला. १९१२ साली कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी घेतल्यानंतर महालनोबीस  पुढील शिक्षणासाठी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात गेले. १९२२ साली प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून  महालनोबीस रुजू झाले.  त्यांनी कृषी, उद्योग, प्रशासन क्षेत्रात संख्याशास्त्राचे भरीव उपयोजन केल्यामुळे हा विषय भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात रुजला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानववंशशास्त्र, जीवशास्त्र, हवामानशास्त्र,यांतील सैद्धांतिक आणि प्रत्यक्षात भेडसावणारे प्रश्न महालनोबीस यांनी संख्याशास्त्राने सोडवले. मोठय़ा प्रमाणावर नमुना पाहणीचे संकल्पन करण्यात त्यांचे मोठे कार्य आहे. ‘महालनोबीस अंतर’ हे त्यांच्या नावाने ओळखले जाणारे एक संख्याशास्त्रीय गणन समूह विश्लेषण व वर्गीकरण या क्षेत्रांत विस्तृत प्रमाणात वापरले जाते. भारतातील मानवशास्त्राचे आद्यप्रवर्तक म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी १७ डिसेंबर १९३१ रोजी कोलकाता येथे  ‘भारतीय संख्याशास्त्र संस्था’ (आयएसआय) स्थापन केली, जी जगातील अग्रेसर संस्था मानली जाते. सी. आर राव यांसारखे भारताचे नाव जागतिक स्तरावर नेणारे अनेक संख्याशास्त्रज्ञ आयएसआय आणि महालनोबीस यांच्यामुळे पुढे आले.

सामाजिक व आर्थिक आकडेवारीत सर्वसमावेशकता असावी म्हणून त्यांनी १९५० साली ‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण’ (नॅशनल सॅम्पल सव्‍‌र्हे) संस्थेची स्थापना केली. तसेच भारतातील सर्व संख्याशास्त्रविषयक घडामोडींमध्ये समन्वय असावा म्हणून केंद्रीय संख्याशास्त्रीय संस्थेची स्थापना केली. महालनोबीस १९५५ ते १९६७ या काळात नियोजन मंडळाचे सदस्य होते. गणितीय व संख्याशास्त्रीय संकल्पनांचा आधार घेऊन त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले, ज्याच्या आधारे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारतातील अवजड उद्योगांच्या विकासासाठी प्रोत्साहन दिले गेले. ती गणिती चौकट पुढे ‘महालनोबीस प्रारूप’ म्हणून प्रसिद्ध झाली.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे महालनोबीस संयुक्त राष्ट्रांच्या नमुना निवड उप-आयोगाचे १९४७—५१ दरम्यान अध्यक्ष होते. भारत सरकारचे संख्याशास्त्र सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. १९६८ साली त्यांना ‘पद्म्विभूषण’  हा बहुमान प्राप्त झाला. २८ जून १९७२ रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले. २००६पासून २९ जून हा त्यांचा जन्मदिवस भारतभर ‘सांख्यिकी दिवस’ म्हणून साजरा होतो.

– डॉ. शीला बारपांडे   

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasanta chandra mahalanobis father of indian statistics zws
First published on: 29-06-2021 at 03:19 IST