सर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी त्यांना बोराचे विक्री व्यवस्थापन तसेच बोरापासून मूल्यवíधत पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत असायला हवे. बोराचा हंगाम प्रामुख्याने नोव्हेंबरपासून सुरू होऊन जानेवारी अखेपर्यंत चालतो. हे फळ झाडावरच पिकणारे असल्यामुळे पूर्णपणे पिकल्यानंतरच त्याची काढणी केली जाते. बोरावर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ तयार केल्यास ग्राहकांना बोराचा आस्वाद हंगाम नसतानादेखील घेता येईल.
पाण्यात बुडू शकणाऱ्या बोरांच्या गरांचा लगदा करून त्यापासून रस काढता येतो. रसात सायट्रिक आम्ल, साखर व पाणी टाकून सरबत तयार करता येते. यातील घटकांचे प्रमाण बदलून स्क्व्ॉश आणि सिरप तयार करता येते.
पिकलेल्या बोरांपासून उत्तम प्रकारची कॅण्डी तयार होते. उमराणा, कडाका या जातींच्या आकाराने मोठय़ा असणाऱ्या बोरांपासून टुटीफ्रूटी तयार करता येते. या टुटीफ्रूटीचा उपयोग विविध प्रकारचे केक, फ्रूट ब्रेड, फ्रूट  सॅलड, आइस्क्रीम यांमध्ये करता येतो.
बोरापासून सुकी बोरे व बोराची पावडर तयार करून ती जास्त काळ साठवता येते. ज्या वेळी बाजारात बोरे उपलब्ध नसतील त्या वेळी या पदार्थाचा उपयोग आहारामध्ये विविध मार्गानी करता येतो. पावडरचा उपयोग सरबत तयार करण्यासाठी व पुडिंगसाठी होतो. सुकवलेल्या बोरांचे लहान-लहान तुकडे करून त्यांचा उपयोग बेकरी पदार्थ व इतर अन्नपदार्थामध्ये करता येतो. खजूर, सुका मेवा तयार करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कच्च्या बोरापासून जेली तयार करता येते. ही जेली फ्रूट ब्रेडमध्ये व बेकरी पदार्थ तयार करताना वापरता येते.
बोराच्या फोडींपासून उत्तम प्रकारची लोणची, चटणी, चिवडा हे पदार्थही तयार करता येतात. कमी पिकलेल्या बोरांचा मुरांबा र्निजतुक बाटल्यांमध्ये हवाबंद करून साठवता येतो.
-डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  –  मी आणि आपण
मी सकाळी उठल्यावर tooth brush वापरतो, shower  घेतो, सांडपाण्यासाठी  flush हा शब्द वापरतो. चहा पितो तो आपल्या देशात उगवत असला तरी तो पिण्याची सवय आपल्याला इंग्रजांनी लावली. coffee  ला तर मराठी शब्दच उपलब्ध नसावा. मग मी breakfast घेतो. न्याहारी हा शब्द इतिहासजमा होत आहे. dining table   वर ठेवून खातो. बसतो खुर्चीवर, तो शब्द मध्यपूर्वेतून आला. कामाला मी train ने जातो ती station  वर थांबते.
माझ्या व्यवसायाच्या जागेला clinic म्हणतात. शस्त्रक्रिया करताना शस्त्र किंवा आयुध दे, असे मी म्हणत नाही. Instrument दे, असो म्हणतो तेही सिस्टरला. Operation  करायच्या आधी मी कपडे बदलतो ते पूर्णपणे shirt  आणि pant   या विलायती धर्माचे असतात. शस्त्रक्रियेनंतर मी surgeons room मध्ये बसतो. तिथले furniture विलायती पद्धतीचे असते. त्या खोलीत मुख्यत्वे मराठी आणि गुजराती माणसे असतात, पण वर्तमानपत्रे फक्त English  असतात.
काम संपल्यावर माझ्या plastic surgery  च्या पुस्तकावर मी computer  वर entries करतो. संध्याकाळी  walk ‘ला जातो. रात्री थोडी घेतो तेव्हा ती whiskey किंवा beer असते.  
अशा तऱ्हेने माझे जीवन संपूर्णपणे पाश्चिमात्य विज्ञान, भाषा आणि चालीरीतींनी वेढले आहे. तरीही मी मला भारतीय म्हणतो.
आधुनिक शहरी आणि निमशहरी जीवनात भारतीय म्हणता येईल, अशी एकही गोष्ट उरलेली नाही, असेच दिसते. आहारावरही आता पाश्चिमात्यांचा पगडा बसू लागला आहे.
या पाश्र्वभूमीवर एक गंमत बघू या. विल्यम हार्वे (जन्म १५७८) वयाच्या अडतीसाव्या वर्षांपासून (म्हणजे सन १६१६)हे शिकवीत होता की,  हृदय एक पंप आहे. ते रोहिण्यांमधून रक्त पसरवते. मग पेशींशी संपर्क झाल्यावर ते रक्त नीलांच्या द्वारे हृदयात परत जाते. हे रक्ताभिसरणाचे विज्ञान आहे. १६८८ मध्ये लिव्हन हॉकने त्यानेच तयार केलेल्या सूक्ष्मदर्शक यंत्रामधून बेडकिणीच्या पिल्लाच्या पारदर्शक शेपटीत हे रक्ताभिसरण चक्षुर्वैसत्य बघितले आणि ते अभिसरण केसाहून बारीक रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातही बघितले. यानेच मडक्यातल्या पावसानंतर जमलेल्या पाण्यातले शिंग काढून चालणारे जिवाणू बघितले. बॅक्टेरियांचा शोध या काळातला.
आपल्या इथे तेव्हा काय होते? शिवाजीराजांच्या जन्माच्या आधी (१६३०) रक्ताभिसरण सिद्ध होते आणि मोगलाई मोडकळीस येण्याच्या काळात जंतूंचे अस्तित्व सिद्ध होते. त्यांच्याकडेही धर्ममरतड होते आणि राजे-राजवाडेसुद्धा; पण विज्ञान बहरत होते.
तो त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – आयुर्वेदीय प्रथमोपचार, तातडीचे उपचार : भाग ४
माझ्या ४०-४५ वर्षांच्या आयुर्वेदीय वाटचालीत अनेक थोर, सवरेदयी कार्यकर्ते, गांधीवादी मंडळी स्वर्गीय नानाजी देशमुख, डॉ. चित्रा नाईक, मोहन धारिया अशांचा सहवास लाभला. या मंडळींनी आपल्या आयुष्यात आर्यवैद्यकाला खूप महत्त्व दिले. स्वत:करिता व्यवहारात आयुर्वेदिय औषधे डोळसपणे वापरली. भारताात खेडोपाडी, आताचे महागडे वैद्यक  गरिबांना कसे समजणार?  कसे उपयोगी पडणार? तेथे आयुर्वेदीय प्रथमोपचार, तातडीची उपचारपद्धतीच उपयोगी पडणार.  या लेखाचा उद्देश ही गरज  भागविण्यापुरताच आहे. या लेखाच्या वाचनाने वापराने कोणी डॉक्टर/ वैद्य व्हावा, व्यवसाय करावा, धंदा करावा ही अपेक्षा अजिबात नाही. आपली लक्ष्मणरेषा वाचकांनी समजून घ्यावी. जोपर्यंत वैद्यकीय मदत येत नाही, उपलब्ध नाही तोपर्यंतच तात्पुरता वापर या लेखाद्वारे  जरुर करावा. त्याकरिता जवळपासचे  जुनेजाणते वैद्य मंडळींचे सहकार्य घ्यावे.
सोबतचे लिखाण काळजीपूर्वक वाचावे. सुचविलेली बहुतेक सर्व औषधे निरपायी आहेत. आपल्या बुद्धीला पटले तर यातील काही उपचार स्वत:करिता, स्वत:च्या कुटुंब सदस्यांकरिता करून  पाहावे. उपयोगी पडतील, असा दृढ विश्वास आहे. आश्वासक प्रत्यय आला तर आयुर्वेदिय प्रथमोपचार पेटी- फर्स्ट एड बॉक्स घरी तयार करावी, वापरावी. वानगीदाखल शंभर विविध लक्षणे रोगांकरिता तुलनेने सोपे-सुलभ उपाय सुचवित आहे.
१) अजीर्ण, पोटदुखी, गॅसेस, भूक कमी, करपट ढेकरा, पोट डब्ब होणे- प्रवाळपंचामृत, बाळहिरडा, शंखवटी, हिंगाष्टक चूर्ण,  गंधर्वहरितकी.
२) अरुची (मळमळणे)- कुटजवटी, आरोग्यवर्धिनी, शंखवटी
३) आम्लपित्त, अ‍ॅसिडिटी, उरोदाह, जळजळ- प्रवाळपंचामृत, लघुसूतशेखर, टाकणखारलाही, त्रिफळाचूर्ण
४) अत्यार्तव- विटाळ जास्त जाणे, वारंवार विटाळ जाणे- कामदुधा, त्रिफळाचूर्ण, मौक्तिकभस्म.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत –  १९ डिसेंबर
१९०३> संतकवी, ग्रंथकार रामचंद्र विष्णू गोडबोले तथा स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म. त्यांच्या रचना रसाळ व भावमधुर आहेत. अमृतधारा, भावार्थगीता, अभंगज्ञानेश्वरी,  संजीवनी  ही त्यांची पुस्तके.
१९१६> नाटय़ साहित्याचे अभ्यासक विष्णू दत्तात्रेय साठे यांचा जन्म. मराठी नाटय़कथा, तसेच  निवडक नाटकांचे प्रवेश एकत्र केलेले नाटय़प्रवेश १ ते ५ हे संकलन त्यांचे.
१९२७> लेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचा जन्म. वास्तु व उत्सव (कथासंग्रह),या मनाचा पाळणा (कवितासंग्रह) चित्रशाळा  (कादंबरी) व   नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास हा ग्रंथ असे वैविध्य त्यांच्या लेखणीत होते.  
१९५६> गांधीवादी साहित्यिक पांडुरंग श्रीधर आपटे यांचे निधन. अनेक चरित्रे त्यांनी लिहिली. याशिवाय आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनवरून) आणि अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गऱ्हासाबद्दल फिर्याद), ही त्यांची पुस्तके
१९९७> महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्षे डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे यांचे निधन. माझे घर, माझा देश, गोष्टींचे गाठोडे’ हे त्यांचे कथासंग्रह आणि ‘मी पण माझे’ या कादंबरीसह हिंदी, इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
– संजय वझरेकर