पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की झाकोळलेल्या, ढगाळ वातावरणात पहिल्या पावसात भिजण्याची तीव्र इच्छा आबालवृद्ध आणि विशेषत: तरुणांच्या मनात निर्माण होते. परंतु सातत्याने खनिज इंधने जाळून निर्माण केलेले प्रदूषणकारी वायू आणि तरंगत राहिलेले सूक्ष्म धूलिकण यांनी हवा कमालीची प्रदूषित झालेली असते आणि येणारा पहिला पाऊस या प्रदूषकांना सोबत घेऊनच कोसळतो. म्हणजेच पहिल्या पावसाच्या वर्षांवातच आपल्या शरीरावर काही प्रमाणात या प्रदूषकांचा वर्षांव होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला जातो खरा, पण त्यामुळे अनेकदा आपल्याला त्वचेचे विकार व अन्य व्याधींना सामोरे जावे लागते. ही समस्या अर्थातच शहरांमध्ये जास्त प्रमाणात असते आणि जाणवते. रस्त्यांवरून अमर्याद संख्येने ये-जा करणारी वाहने, धूर सोडणारे कारखाने, मोठय़ा प्रमाणात साठत असलेला घनकचरा हे हवेच्या प्रदूषणाचे काही प्रमुख स्रोत शहरातच मोठय़ा प्रमाणात असतात. हे पाहता, शहरात पहिल्या पावसाचा आनंद लुटताना सावधच असले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे पावसाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल, तर नद्या, जलाशये, कोसळणारे धबधबे, भरपूर हिरवाई असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षां सहली निघतात. डोंगरावर ट्रेकला जाणे हादेखील या वर्षां सहलीचा एक भाग असू शकतो. अशा प्रदूषणमुक्त वातावरणात मुक्तपणे अंगावर पडणारा पाऊस हा अतिशय आनंददायी, अविस्मरणीय अनुभव असू शकतो. वाटेतल्या खळाळत वाहणाऱ्या जलप्रवाहाचे पाणी अतिशय स्वच्छ, प्रदूषकविरहित असते. अशा पाण्यात कितीही डुंबत राहिले किंवा हे पाणी प्यायले तरी अपाय होत नाहीच, पण ताजेतवाने नक्कीच वाटते! आजूबाजूचा निसर्गदेखील किती समृद्ध आहे, याची वारंवार जाणीव आपल्याला होत असते.

परंतु निसर्गाच्या या समृद्धीला, या वैभवाला आपल्या कृतींमुळे हानी पोहोचणार नाही याची काळजी अशा वर्षां सहलींना जाणाऱ्या प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. दुर्दैवाने गेल्या काही दशकांपासून पावसाळ्यात अशा निसर्गरम्य स्थळांवरील वर्षां सहलीत मोठमोठय़ाने गाणी लावून तेथील नैसर्गिक शांततेचा भंग करण्याच्या अनेक घटना आता सर्रास घडताना दिसतात. अशाने अप्रत्यक्षपणे निसर्गाची हानी होतेच, शिवाय अनेक जण या उन्मादात आपला जीवदेखील गमावतात. यंदा करोना विषाणूच्या साथीमुळे खूप बंधने आहेत. तरीही सर्व बंधने, नियम पाळून आपण वर्षां सहलीला जाणारच असाल, तर विघातक कृत्ये पूर्णपणे टाळा. स्वत: जगा आणि निसर्गालाही जगू द्या!

प्रा. विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainy season tourism destinations of india during rainy season zws
First published on: 13-07-2020 at 02:24 IST