दोन नद्यांचा संगम होऊन त्या एकत्र वाहणे ही काही नवलाची गोष्ट नाही. ब्राझीलमध्ये अशाच दोन नद्यांचा संगम होतो, पण त्यांचे प्रवाह मात्र अनेक किलोमीटपर्यंत वेगवेगळे दिसतात.

निग्रो नदी (रिवो निग्रो) कोलंबियात उगम पावते आणि ब्राझीलमध्ये कूक्की येथून अ‍ॅमेझोनस प्रांतातून आग्नेयकडे वाहत जाऊन, मनाऊसच्या दक्षिणेस सुमारे १७.६ किलोमीटरवर सोलिमोएस नदीला मिळते. सोलिमोएस हा पेरु देशातील अँडीज पर्वतात उगम पावणाऱ्या जगातील सर्वात मोठय़ा नदीचा, अ‍ॅमेझॉन नदीचा वरचा म्हणजे ब्राझील देशापर्यंतचा भाग. मनाऊस ब्राझील या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो खरा, पण पुढे सहा किलोमीटर या नद्या वेगवेगळय़ा वाहतात.

निग्रो नदीचे पाणी कोऱ्या चहासारखे काळे आहे. हा मातीमुळे, गाळामुळे आलेला रंग नाही. गाळ नसलेल्या या पाण्याला काळा रंग आला तरी कसा? कोलंबियाच्या टेकडय़ा आणि जंगलातून वाहताना पाण्यात कुजलेली पाने आणि वनस्पतींचे इतर अवशेष मिसळल्याने निग्रो नदीच्या पाण्याचा रंग काळा आहे.

सोलिमोएस नदी अँडीज पर्वत शृंखलेतून वाहताना पाण्यात माती मिसळल्याने तिचे पाणी मातकट, तपकिरी दिसते. निग्रो नदीच्या पाण्याचा काळा रंग आणि सोलिमोएस नदीचा तपकिरी रंग सहा किलोमीटर अंतरापर्यंत वेगळा पाहायला मिळतो. ही नवलाई नद्यांच्या पाण्याच्या वेगवेगळय़ा गुणधर्मामुळे दिसते.

निग्रो नदीच्या पाण्याचे तापमान २८ अंश सेल्सिअस आहे तर सोलिमोएस नदीच्या पाण्याचे तापमान २२ अंश सेल्सिअस आहे. फक्त हा एकच फरक नाही तर दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वेगवेगळा आहे. निग्रो नदी दोन किलोमीटर प्रतितास अशा मंद गतीने वाहते. तर सोलिमोएस नदी चार ते सहा किलोमीटर प्रतितास एवढय़ा वेगाने वाहते. निग्रो नदीतील वनस्पतींचे अवशेष तर सोलिमोएस नदीतील माती यामुळे पाण्याची घनताही वेगवेगळी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही नद्यांचा संगम झाला तरी तापमान, वेग आणि घनतेत फरक असल्याने सहा किलोमीटपर्यंत दोन्ही प्रवाह वेगळे राहतात. त्यानंतर सोलिमोएस नदीच्या वेगामुळे पाण्यात भोवरा तयार होऊन दोन्ही नद्यांचे पाणी एकत्र येते. थंड, तपकिरी रंगाचा, घनता जास्त असलेला, वेगवान सोलिमोएस नदीचा प्रवाह आणि तुलनेने कोमट, काळय़ा रंगाचा, घनता कमी असलेला, कमी वेगाने वाहणारा निग्रो नदीचा प्रवाह पाण्याच्या पृष्ठभागावरून वेगळा ओळखता येतो. या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या रंगामधील हा फरक अंतराळातून घेतलेल्या चित्रातही स्पष्ट दिसतो.

– अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org