‘सह्याद्रीची आर्त हाक’ हे डॉ. माधवराव गाडगीळ यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच ‘वनराई’ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. लेखकाने केंद्र सरकारला २०११ मध्ये सादर केलेल्या पश्चिम घाट अहवालाचे हे मराठीतील संक्षिप्त रूपच आहे. दु:ख, वेदनांनी विव्हळलेला पक्षी, प्राणी आणि माणूससुद्धा मदतीसाठी जी हाक देतो त्यात आर्तता तर असतेच, पण त्याचबरोबर याचनासुद्धा असते. वृक्ष, डोंगर, दऱ्या जेव्हा कापल्या जातात तेव्हासुद्धा त्या अशा आर्त हाका देत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यांच्या कुशीत पसरलेल्या आणि मानवी विकासाच्या धारदार कुऱ्हाडीने रक्तलांच्छित झालेल्या पश्चिम घाटाच्या प्रत्येक आर्त हाकेचे कारण, त्याचे वैज्ञानिक विश्लेषण, पूर्वीची आणि आत्ताची परिस्थिती, तेथील लयास जात असलेली बहुमोल जैवविविधता, स्थानिक आदिवासी आणि रहिवासी यांच्या ठिबकणाऱ्या वेदना या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर उमटलेल्या आढळतात.

डॉ. माधवराव गाडगीळ हे भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये स्थापना केलेल्या पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सहा राज्ये, त्यातील ४४ जिल्हे आणि १४२ तालुक्यांतील हजारो गावांमधील गावकऱ्यांशी संवाद साधत पश्चिम घाट संवर्धनाबद्दल त्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या. ३१ ऑगस्ट २०११ ला त्यांनी त्यांचा हा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आणि त्यात पश्चिम घाटामधील सर्व डोंगर, दऱ्या, तेथील स्थानिक वृक्ष, वेली, प्राणी, पक्षी, कीटक, जलचर, उभयचर यांची संवेदनशील म्हणून नोंद केली. त्याचबरोबर विकासाच्या नावाखाली डोंगरांची तोडफोड, नद्यांचा प्रवाह रोखणे, रस्तेनिर्मिती यावर नियंत्रण ठेवण्याचे सुचविले. दुर्दैवाने मोठय़ा परिश्रमाने केलेला हा अहवाल आहे तसा स्वीकारला गेला नाही. संपूर्ण शास्त्रीय गुणवत्तेवर आधारित ५२२ पानांचा हा अहवाल सर्वसामान्य निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध होणे, त्याचे वाचन करणे हे कठीण काम आहे. म्हणूनच त्या अहवालात डॉ. माधवरावांना नेमके काय म्हणायचे होते ते या अहवालातून जाणून घेता येईल. हे पुस्तक हा त्या अहवालाचा मथितार्थच आहे. निसर्ग हा विज्ञानाचा खरा गुरू आहे. विकासाची मर्यादा सांभाळताना या गुरू-शिष्यांनी हातात हात गुंफूनच वाटचाल करावयास हवी, हे डॉ. गाडगीळ या अहवालाद्वारे अधोरेखित करतात. विज्ञान आणि कायदे धाब्यावर बसविणारा असंतुलित विकास कसा घातक आहे, हे समजावून सांगतात. विज्ञानाचा विपर्यास करून निसर्गाची हानी करू नका असे आर्जव करतात.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahyadrichi aart haak book by madhav gadgil zws
First published on: 09-09-2022 at 02:29 IST