रक्तदाब खूप वाढला आहे, आज भाजी अळणी आहे, वरणात मीठ जास्त पडलं. आजीने खारवलेली मिरची, मासे, लोणची, पापड पाठवले आहेत. किडनीचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांनी मीठ कमी खायला सांगितले आहे. सकाळी आकाशवाणीवर गलगंड होऊ नये म्हणून आयोडिनयुक्त मीठ खावे असा सल्ला ऐकला. अशी संभाषणे आपल्या ओळखीची आहेत. या सर्व संभाषणांमध्ये एक सामायिक दुवा म्हणजे मीठ! हे मीठ म्हणजेच सोडिअमचे संयुग, आपल्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा बनलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनस्पतींमध्येही सोडिअम हे मूलद्रव्य महत्त्वाचे कार्य करते.  वनस्पतींमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी, वनस्पतीपेशीमधील स्फिती (टर्गर) दाब समतोल ठेवण्यासाठी, पर्णरंध्राची उघडझाप करण्यासाठी सोडिअम महत्त्वाची भूमिका बजावतो.

प्राणीपेशी बाहेरील द्रवाचा सोडिअम हा महत्त्वाचा घटक असून परासरण दाब तयार करणे व त्याद्वारे द्राव्य पेशीच्या आत-बाहेर वहन करण्याचे तो कार्य करतो. मानवाच्या शरीरातील रक्ताचे आकारमान व रक्तदाब यांचे नियमन करणे हे महत्त्वाचे कार्य सोडिअम करतो. सोडिअमच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब व कमतरतेमुळे अल्पदाब अनुभवास येतो. किडनीमध्ये (मूत्रिपडामध्ये) एक अनोख्या प्रकारची रेनिन अँजिओटेन्सिन प्रणाली ही सोडिअमची रक्तातील पातळी नियमनाचे कार्य करते. हे नियंत्रण करण्यासाठी एक अनोख्या प्रकारचा सोडिअम पंप आपल्या किडनीत असतो. हे नियंत्रण ऋतू आणि रक्तदाबाशी संबंधित असते. जसे की, रक्तदाब वाढला असता किडनीकडे रक्तप्रवाह वाढतो व किडनीमधील नेफ्रॉन नलिका जास्तीचे सोडिअम मूत्रावाटे बाहेर टाकते. उच्चरक्तदाबात रक्तप्रवाह वाढल्यामुळे नेफ्रॉन नलिका सोडिअम बाहेर टाकण्याच्या कार्यात दमतात, त्यांच्या कार्यात बिघाड होतो आणि पर्यायाने किडनीचे कार्य बिघडते. उच्चरक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये म्हणून किडनीचे आजार आढळून येतात.

हृदयाच्या स्नायूपेशींचे स्पंदन हे सोडिअमच्या आत बाहेर जाण्याने टिकून राहते. मेंदू, चेतातंतू, मज्जारज्जू, चेतापेशीतील चेतावेगाचे संवहन सोडिअम आणि पोटॅशिअमच्या चेतापेशीतील आतबाहेर जाण्याच्या पंपामुळे होत असते. याशिवाय दैनंदिन गरजेच्या वस्तू जसे काच, कागद, साबण, कापड यांच्या प्रक्रियेमध्ये सोडिअम महत्त्वाचा घटक आहे. रस्त्यावर बर्फ पडून वाहतूक बंद पडल्याच्या बातम्या आपण वाचतो. रस्त्यावरील हा बर्फ काढून रस्ता पूर्ववत करायच्या कामासाठी सोडिअम क्लोराइड वापरले जाते. इजिप्तच्या प्रसिद्ध ममीज करण्याच्या प्रक्रियेमध्ये नॅट्रॉन हे सोडिअमयुक्त खनिज वापरले जाते.

डॉ. मनीषा कर्पे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sodium elements
First published on: 06-03-2018 at 02:32 IST