– डॉ. नीलिमा गुंडी – nmgundi@gmail.com

कुस्ती हा आपल्याकडचा अस्सल देशी स्वरूपाचा लोकप्रिय मैदानी खेळ आहे. त्या खेळाशी संबंधित काही वाक्प्रचार वर्षांनुवर्षे आपल्या भाषेत रूढ आहेत.

शड्डू ठोकणे हा त्यातलाच एक वाक्प्रचार  आहे. शड्डू म्हणजे डावा हात कोपरापासून वर करून उजव्या हाताने काढलेला आवाज. शड्डू  ठोकणे म्हणजे दंडावर किंवा मांडीवर हाताच्या खोंग्याने मारणे (खोंगा म्हणजे तळहाताचा पसा), दंड थोपटणे. या कृतीतून खेळाडूची ईर्षां व्यक्त होते. त्यामुळे याचा अर्थ ‘आव्हान देणे’ असा होतो. हा वाक्प्रचार विरोधकांना तोंड द्यायला सिद्ध असल्याची भावना व्यक्त करतो. त्यातून प्रतिकार करण्याची खुमखुमी लक्षात येते.

झोंबी घेणे ही कृतीदेखील  वाक्प्रचार म्हणून वापरली जाते. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देणे, हा त्याचा अर्थ आहे. साहित्यिक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘झोंबी’ असून त्यात त्यांनी शिक्षणासाठी बालपणी परिस्थितीशी केलेला संघर्ष वर्णन केला आहे.

धोबीपछाड, टांग मारणे हे कुस्तीमधले डावपेचदेखील नाटय़पूर्ण असल्यामुळे वाक्प्रचार म्हणून रूढ झाले आहेत. धोबीपछाड करणे म्हणजे प्रतिपक्षाला  धुण्याच्या कपडय़ाप्रमाणे मागे नेऊन पुढे आपटणे होय! विरोधकांना पराभूत करण्याचा हा प्रकार राजकीय वार्ताकनात वाक्प्रचार म्हणून आजही स्थान मिळवतो!

टांग मारणे म्हणजे स्वत:च्या पायाने दुसऱ्याच्या पायावर मारून त्याला खाली पाडणे. याचा लक्ष्यार्थ ‘फसवणे’ असा आहे. हे वाक्प्रचार चित्रदर्शी असल्यामुळे मनावर ठसतात.    

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुस्तीचा खेळ संपताना कोणाला तरी पराभूत व्हावे लागते. त्यातून ‘चारी मुंडय़ा चीत करणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. याचा शब्दश: अर्थ असा आहे – कुस्तीत दोन खांदे आणि कमरेचे दोन खवाटे ( सांधे ) मिळून चार मुंडय़ा होतात. त्यापैकी प्रत्येक अवयव जमिनीला लागेल अशा प्रकारे जमिनीला पाठ लागणे. याचा लक्षणेने अर्थ आहे ‘पूर्ण पराभव होणे’! गंमत म्हणजे या अवस्थेत पराभूत स्पर्धकाचे नाक वर राहाते! त्यामुळे ‘नाक वर असणे’ (म्हणजे खोटा दिमाख मिरवणे), हाही वाक्प्रचार तेथे अगदी शोभतोच!