ध्वनिप्रदूषणामुळे आवाज करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमी झाला असला तरी उत्सवप्रसंगी होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आकाशात विविध रंगांची उधळण होते. या रंगांमध्ये किरमिजी लाल रंगाची जी उधळण होते ती स्ट्रॉन्शिअममुळे! प्रयोगशाळेत धातूंच्या विश्लेषणात ओळख पटवण्यासाठी वापरण्यात येणारी अत्यंत सोपी पण खात्रीलायक पद्धत म्हणजे फ्लेम टेस्ट (ज्योतीचा रंग तपासणे). यात वैशिष्टय़पूर्ण म्हणजे, धातूला उष्णता दिली असता मिळणाऱ्या ज्योतीला विशिष्ट रंग असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अडेर क्रॉफर्ड व विल्यम क्रुकशांक यांना १७९०मध्ये स्कॉटलंडमधील स्ट्रॉनरिन खेडय़ातील शिशाच्या खाणीत; विदराईट खनिजात नवीन मूलद्रव्य असल्याचे जाणवले व त्याचे नामकरण त्यांनी स्ट्रॉन्शिअम असे केले. तोपर्यंत त्याला बेरियम समजण्यात येई. विद्युतविघटनाने स्ट्रॉन्शिअम क्लोराइड व मक्र्युरिक ऑक्साईडच्या मिश्रणातून स्ट्रॉन्शिअमला वेगळे करण्याचे श्रेय हंफ्री डेव्हीला जाते, मात्र त्यासाठी १८०८पर्यंत थांबावे लागले.

मऊ, चंदेरी रंगाचा स्ट्रॉन्शिअम, अल्कली मृदा धातू प्रकारातील असून त्याची मुख्य खनिजे सेलेस्टाईन व स्ट्रॉन्शिअनाईट (celestine U strontianite) आहेत. अत्यंत क्रियाशील असल्याने निसर्गात तो मुक्त स्वरूपांत आढळत नाही. हवेशी संपर्क येताच ऑक्सिडेशनमुळे त्याच्या पृष्ठभागावर पिवळ्या रंगाची झाक येते.

क्ष-किरण उत्सर्जनातील रोधक गुणधर्मामुळे स्ट्रॉन्शिअम दूरचित्रवाणी संचातील टय़ूबच्या (कॅथोड-रे टय़ूब) काचेसाठी वापरतात. एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के भाग पूर्वी वापरला जात असे मात्र आता त्याला पर्याय उपलब्ध झाल्याने स्ट्रॉन्शिअमची मागणी उतरणीला लागली असून त्याचा परिणाम स्ट्रॉन्शिअमच्या उत्पादनावर झाला आहे.

स्ट्रॉन्शिअममुळे निर्माण होणारा किरमिजी लाल रंग ही त्याची खासियत असल्याकारणाने एकूण उत्पादनाच्या ५ ते १० टक्के भागाचा वापर पायरोटेक्निक क्षेत्रात होतो उदा. शोभेचे फटाके, लक्ष वेधण्यासाठी अथवा आपात्कालीन परिस्थितीचा इशारा देण्यासाठी असलेली संकेत प्रणाली (signaling flares) आणि मागोवा घेणाऱ्या शस्त्रसामग्रीसाठी.

वैद्यकीय क्षेत्रातही स्ट्रॉन्शिअमचा वापर केला जातो. स्ट्रॉन्शिअमचे रासायनिक गुणधर्म कॅल्शिअमशी संलग्न असल्याकारणाने कॅल्शिअमप्रमाणेच स्ट्रॉन्शिअम आपल्या शरीरातील हाडांमध्ये शोषले जाते. लहान मुलांमध्ये हे प्रमाण वाढल्यास हाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. हाडांच्या कर्करोगामध्ये वापरल्या जाणाऱ्या किरणोत्सारी औषधात र१-89 महत्त्वाचा घटक आहे. संवेदनशील दातांसाठीच्या टूथपेस्टमध्ये स्ट्रॉन्शिअम क्लोराईड वापरले जाते.

– श्रीमती मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strontium chemical element
First published on: 07-06-2018 at 00:06 IST