‘काही रुग्णांना रक्ताची इतकी आवश्यकता असते, की रक्तदानासाठी सणासुदीचा मुहूर्त पाहूनच रक्तदात्यांनी रक्तदान करावे, तत्पूर्वी करू नये, असा अट्टाहास नेत्यांनी का करावा?’

या वाक्यात ‘अट्टाहास’ हा चुकीचा शब्द आहे. मराठीने संस्कृतातून स्वीकारलेला ‘अट्टहास’ हा तत्सम शब्द आहे. ट्ट-योग्य, ट्टा-चुकीचा. संस्कृतात या शब्दाचे जे अर्थ आहेत, ते सगळेच मराठीने स्वीकारले नाहीत. अट्टहास (सं. नाम, पुल्लिंगी) अर्थ- भारी, मोठा प्रयत्न, मोठय़ाने हसणे, मोठा स्वर, आक्रोश असे अनेक अर्थ आहेत. मराठीत या शब्दाचा अर्थ ‘जोराचा पण चुकीचा आग्रह’ दुराग्रह, हट्ट, हेका असा वेगळा अर्थ रुढ झालेला आहे. वरील वाक्यातील ‘अट्टाहास’ असा शब्दच मराठीत किंवा संस्कृतातही नाही. अट्टहास (ट्ट-बरोबर, ट्टा-चूक) हाच निर्दोष शब्द आहे. वरील वाक्यात रक्तदान सदासुदीच्या सुमुहूर्तावर करावे, तत्पूर्वी किंवा त्यानंतरही रक्तदान करू नये, हा नेत्यांचा दुराग्रह आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना रक्ताची निकड आहे. त्यांच्यावर अन्याय होईल, त्यांचे प्राण वाचवणे अशक्य होईल, याची जाणीव नेत्यांना नाही. दुराग्रहात (अट्टहासात) आपलेच म्हणणे खरे, दुसऱ्या कोणाचे म्हणणे ऐकायचेच नाही असा अर्थ अनुस्यूत आहे; हे लक्षात घेऊन योग्य शब्द ‘अट्टहास’ असून मराठी भाषकांनी बोलताना व लिखाण करताना याच शब्दाचा स्वीकार करावा ही विनंती.

केव्हा केव्हा संस्कृतातील शब्द आपण मराठीत स्वीकारतो. शब्दलेखनात चूक होत नाही. पण अर्थ मात्र अगदी वेगळा करतो. म्हणजे संस्कृतात त्या शब्दाचा जो अर्थ आहे, त्याच्या नेमक्या उलट अर्थाने आपण तो शब्द वापरतो. ते शब्द आहेत- परोक्ष आणि अपरोक्ष. या शब्दाचे संस्कृतात अर्थ आहेत- परोक्ष (विशेषण) अर्थ : (१) नजरेआड, अदृश्य, (२) गैरहजर, (३) गुप्त, गूढ, दृष्टिआड. परोक्ष – (क्रियाविशेषण) अर्थ : एखाद्याच्या पाठीमागे, गैरहजेरीत, डोळय़ांआड, असमक्ष.

मात्र आपण समक्ष या अर्थी परोक्ष या शब्दाचा वापर करतो व अपरोक्ष हा शब्द असमक्ष याकरिता योजतो.वास्तविक अपरोक्ष- अर्थ -डोळय़ांदेखत, समक्ष आणि परोक्ष शब्दाचा अर्थ डोळय़ांआड. परोक्ष या शब्दाची फोड करू या. पर अक्षांसमोर म्हणजे दुसऱ्याच्या डोळय़ांसमोर म्हणजेच स्वत:च्या डोळय़ांआड (पर-अक्ष) पर= दुसरा, अक्ष= डोळा, पर- स्वत:च्या नव्हे. अ-परोक्ष- जे दुसऱ्याच्या डोळय़ांसमोर नाही ते. म्हणजे जे स्वत:च्या डोळय़ांदेखत असते किंवा घडते. मात्र मराठीत नेमक्या उलटय़ा अर्थाने हे शब्द रूढ आहेत.- यास्मिन शेख