scorecardresearch

कुतूहल : वृक्ष खोडामधील नोंदवही

वृक्ष जसजसा वाढत जातो त्या प्रमाणात ही वर्तुळे खोडाच्या गाभ्याकडे सरकत जाऊन एकमेकात घट्ट मिसळून कठीण होतात

कुतूहल : वृक्ष खोडामधील नोंदवही
(संग्रहित छायाचित्र)

उत्तुंग आकाशाकडे झेप घेत सरळ उंच आणि विशाल वाढलेला वृक्ष जेवढा देखणा, आकर्षक असतो तेवढीच त्याच्या खोडामधील वाढचक्रेसुद्धा. ही वर्तुळाकार वाढचक्रे त्या वृक्षाच्या भूतकाळामधील प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक घटनांची नोंद तर ठेवतातच; पण त्याचबरोबर तो वृक्ष त्याच्या शेकडो वर्षांच्या वाढीच्या काळात कोणकोणत्या नैसर्गिक स्थित्यंतरांमधून गेला होता याची साक्षही देतात. पूर्ण वाढ झालेल्या खोडाचा आडवा छेद ही वाढचक्रे दाखवितो, मात्र ती बघण्यासाठी तुम्हाला लाकूड कटाई यंत्राने आडवी कापलेली ओंडकी पाहावयास हवी. सूक्ष्म निरीक्षण करताना आपणास दिसेल की त्या ओंडक्याचा मध्य गाभा घट्ट लालसर आहे आणि त्याभोवती सारख्या अंतरावर तांबूस रंगाची पिवळसर पट्टयाला जोडलेली अनेक वर्तुळे आहेत, हीच ती वाढचक्रे. प्रत्येक वाढचक्र एक वर्ष पूर्ण झाल्याचे दर्शक असते आणि हे १५०० व्या शतकात लिओनार्दो दा विंची यांनी सिद्ध केले.

वृक्ष जसजसा वाढत जातो त्या प्रमाणात ही वर्तुळे खोडाच्या गाभ्याकडे सरकत जाऊन एकमेकात घट्ट मिसळून कठीण होतात. थोडक्यात पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांच्या गाभ्यामध्ये शेकडो वाढचक्रे बंदिस्त असतात. पोषक हवामान, योग्य पाऊसपाणी असेल तर ही वाढचक्रे सलग योग्य अंतरावर आढळतात. वर्तुळांच्या जाडीवरून एखादा पावसाळा कोरडा होता की ओला हेसुद्धा ओळखता येते. अंतोनी व्हॅन लुवेनहॉक यांनी स्वत: विकसित केलेल्या सूक्ष्मदर्शक यंत्राच्या मदतीने विविध वृक्षांची वाढचक्रे आणि त्यांच्यावर ऋतूंच्या होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला आणि विविध नोंदींचे विश्लेषण केले. पावसाचे प्रमाण कमी आणि उष्णता जास्त असेल तर वर्तुळ घट्ट होऊन बाहेरचा पिवळा पट्टा कमी होतो. सलग आठ-दहा वर्षे पाऊसच पडला नाही तर प्रतिवर्षांची वाढचक्रे एकमेकात मिसळून वर्तुळाकार लाल पट्टा तयार होतो. वृक्षावर कीटकांचा अथवा बुरशीचा हल्ला झाला तर वृक्षांची वाढ तात्पुरती थांबते आणि वृक्ष ठरावीक रसायने बाहेर टाकू लागतात यामुळेच वाढचक्रात काळे खोल डाग उमटतात. वादळात वृक्षाची मोठी फांदी तुटली तरीही त्याची नोंद वाढचक्रात होते.

जमिनीमध्ये मुळांना अडथळा नसल्यास तो वृक्ष सरळ उंच वर जातो अशा वेळी खोडामधील वाढचक्रे सर्व बाजूंनी सारखी गोलाकार दिसतात. मात्र अडथळा आल्यास मुळांची दिशा बदलते आणि त्यास अनुसरून खोडही झुकते. अशा वेळेस खोडामधील वाढचक्रेही झुकलेल्या बाजूकडे सरकतात.

डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या