बॉनसायच्या आकारानुसार त्यांचे चार प्रकारांत वर्गीकरण करता येते. मोठे बॉनसाय दोन-तीन फूट उंचीचे असते. मध्यम बॉनसाय एक-दोन फूट उंचीचे असते. मिनिएचर बॉनसाय दोन ते सहा इंच उंच असते.
बॉनसायला किती बुंधे आहेत, त्याप्रमाणे एक बुंधा असलेले, दोन बुंधे असलेले अथवा दोनपेक्षा जास्त बुंधे असलेले बॉनसाय अशी बॉनसायची विभागणी होते. एका ट्रेमध्ये किती झाडे आहेत, यावरून एकच झाड, दोन झाडे अथवा जंगल स्टाइल असे बॉनसायचे वर्गीकरण होते. बॉनसायच्या खोडाचा आकार आणि रचना यावरून बॉनसायचे सरळ उभे, उभे पण वाकडे-तिकडे, तिरके, अर्धवट झुकलेले, धबधब्याप्रमाणे, पूर्ण खाली झुकलेले, वळणावळणांचे असे प्रकार आहेत.
फांद्यांच्या ठेवणीवरून बॉनसायचे ब्रूम म्हणजे झाडूप्रमाणे, िवड स्वेफ्ट असे प्रकार आहेत. मुळांच्या ठेवणीनुसार बॉनसायचे एक्स्पोज्ड, राफ्ट असे प्रकार आहेत. बॉनसाय ही फुले/ फळे येणारी अथवा न येणारी शोभिवंत झाडे असू शकतात. फुले येणाऱ्या बॉनसायची फुले अथवा फळे निसर्गात आढळणाऱ्या त्याच्या मूळ झाडाच्या फुलांच्या रंगांची, वासाची असतात. फक्त आकाराने लहान असतात.
फुले व फळे येणाऱ्या बॉनसायला मोठय़ा झाडांना ज्या ऋतूमध्ये फुले आणि फळे येतात, त्याच ऋतूत फुले आणि फळे येतात. बॉनसायच्या फळांचा रंग, चव त्याच प्रकारच्या मोठय़ा झाडाप्रमाणेच असतात. रोपवाटिकेतून फळांची कलमी रोपे घेऊन त्यांचे बॉनसाय बनवल्यास त्यांना फलधारणा लवकर होते. आपल्या भागामध्ये, वातावरणामध्ये उत्तम प्रकारे वाढू शकणाऱ्या प्रजातींची निवड बॉनसाय बनवण्यासाठी करावी. शक्यतो भरपूर फांद्या असणारी, जवळजवळ आणि आकाराने लहान पाने असणारी झाडे किंवा प्रजाती बॉनसाय करण्यासाठी निवडाव्यात. पामवृक्ष किंवा नारळाप्रमाणे एकच फांदी असणाऱ्या प्रजाती बॉनसाय करण्यासाठी निवडू नयेत.
सर्वसाधारणपणे वड, िपपळ, अंजीर, पेरू, अडुळसा, चिंच, चेरी, आंबा, विलायती चिंच, िलबू, संत्री, मोसंबी ही सहजपणे उपलब्ध होऊ शकतील अशी झाडे बॉनसाय करण्यासाठी निवडली जातात.
– मानसी भिर्डीकर (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..      एका कुत्र्याची गोष्ट / Venous Flap
ही गोष्ट नव्वदीतली. मला नेहमी असे वाटत असे की, जर हृदयावरच्या शस्त्रक्रियेच्या वेळी हृदय बंद करतात आणि माणसाला काही काळ एका पंपावर जगवतात. आणि शस्त्रक्रिया संपली की हृदय परत चालू करतात. असे जर आहे तर रक्तपुरवठा करणारी रोहिणी, अशुद्ध रक्त घेऊन जाणारी नीला आणि त्या ज्या त्वचेला रक्तपुरवठा करायचा त्याचे नकाशे जर उपलब्ध आहेत तर मग असा रोहिणी नीला त्वचा ह्य़ांचा संच कापून रक्त भरलेल्या पंपाला जोडला तर त्वचा जगायला हवी. ही कल्पना माझा त्या काळचा विद्यार्थी माझा धाकटा चुलतभाऊ मुकुंद थत्तेकडे सोपवली आणि त्या पठ्ठय़ाने उत्साहाने ह्य़ा कल्पनेवरचे प्रयोग कुत्र्यावर केईएम रुग्णालयात सुरू केले.
 ते काही यशस्वी होईनात. त्याची कारणे अनेक होती. त्याच्या तपशिलात जात नाही. नंतर काही वर्षांनी केवळ त्वचा अशी पंपावर जगत नाही हे इतरत्रही दिसले. परंतु प्रयोगांती परमेश्वर ह्य़ा न्यायाने एका कुत्र्याने त्याची कापलेली त्वचा स्वत:च खाण्याचा पराक्रम करताना फक्त रोहिणी (Artery) खाल्ली आणि नीला तशीच ठेवली. दुसऱ्या दिवशी दुपारी मुकुंद प्रयोगशाळेत गेला तर रोहिणीच्या रक्ताला मुकलेली ती त्वचा केवळ नीलेवर लटकत होती, पण जगली होती आणि आणखी काही दिवस जगली. तेव्हा मूलभूत विज्ञानावरच तर आम्ही घाला घालत नाही ना, असा विचार चमकून गेला. मग ही शस्त्रक्रिया रुग्णांवर करण्यात आली. केवळ तीन मिलिमीटरच्या नीलेवर लांबच्यालांब त्वचा इकडून तिकडे फिरवण्यात यश आले आणि ते काम ब्रिटिश जर्नलमध्ये प्रसिद्ध केले तेव्हा परीक्षकाने लिहिले, ‘ही बनवाबनवी तर नाही ना?’ Tony Watson या संपादकाने आम्हाला उचलून धरले. नंतर मुकुंदने मुंबईच्या आयआयटीमध्ये हायड्रॉलिक विभागात संशोधन केले आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामुळे नीलेच्या आजूबाजूला जे धक्के बसतात त्यामुळे भरती-ओहोटीसारखा प्रवाह सुरू होत असेल असे अनुमान मांडले. नंतर नीलेला स्वत: शुद्ध रक्तपुरवठा करण्यासाठी तिच्या भिंतीत रोहिण्या असतात त्या तर ह्या चमत्कारासाठी जबाबदार नसतील ना, असाही विचार आम्ही मांडला.
पण पुढे ह्या विज्ञानात सूक्ष्मदर्शक शिरला आणि त्याच्या साह्याने बारीक वाहिन्या शिवून त्वचाच काय परंतु स्नायू, हाडे इकडेतिकडे नेणे शक्य आणि सोपे झाले. त्यामुळे आमचे विज्ञान केवळ नोंद म्हणून ठरले; परंतु चित्रपट तारका कशा थोडय़ा काळासाठी चमकतात तसे आम्ही चमकलो.
 हे नीलेवर त्वचेचे विज्ञान संपूर्ण पुसलेले नाही. ते निराळ्या स्वरूपात वावरते. प्रसिद्धीचे सोडा, पण निसर्गाचे एक नवे रूप दिसले. अरूपाचे रूप शब्दे मांडियले.
उद्या आणखी एक गंमत आणि सुश्रुतमुनींबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

वॉर अँड पीस –  वृद्धापकाळातील अनेकानेक समस्या
साठ- पासष्टीनंतर माणूस निवृत्त होतो. आठ-दहा तासांचे रोजचे काम थांबते. पण आहार मात्र तोच राहतो.  श्रम कमी, अन्न तेच मग वातपित्तकफ आपापला वाईट प्रभाव त्रस्त करतात. एका रुग्णाने पुढील पंधरा प्रकारच्या तक्रारी सांगून खूप खूप औषधे  मागितली. रुग्ण जरी रोगलक्षणांची लांबलचक कहाणी सांगत असला तरी सगळय़ा लक्षणांचे सामान्यपणे वातपित्तकफ यांच्या आधारावर वर्गीकरण करुन वैद्यमंडळी नेमकी औषध योजना करीत असतात.
पायाच्या पोटऱ्या दुखतात, तळपाय, डोके दुखते, चालताना तोल जातो, चक्कर येते, सांधे आखडतात, त्यामुळे हालचालींमध्ये जराही लवचिकता नाही, कुठेही वर चढल्यावर चक्कर येते, पलंगावरून खाली उतरता येत नाही, जरासे चालल्यास दम लागतो, सतत जांभया येतात, त्यामुळे जबडा दुखतो, बोलताना पटकन हसू येते, कुठलेही काम करताना ग्रीप येत नाही. स्मरणशक्ती कमी झाली आहे, कसलीही इच्छा होत नाही, आत्मविश्वास कमी झाला आहे, अन्नपचन नीट होत नाही, अ‍ॅसिडिटी होते, सतत शिंका येतात, नुकतेच काही दात काढून त्या ठिकाणी कवळी बसवली आहे, तेव्हापासून तोंडाची सतत हालचाल होऊन आवाज येतो, तोंडात सारखे पाणी येते, थकून गेल्यामुळे आराम करावासा वाटतो.
वरील पाच-पंचवीस सरमिसळ लक्षणांतील वातप्रधान लक्षणांकरिता ब्राह्मोपचारार्थ अभ्यंग तेलाचा सकाळ-संध्याकाळ युक्तीने वापर करावा. त्यामुळे थकवा जाऊन आत्मविश्वास वाढतो. आपण खातो-पितो त्यावर थोडे नियंत्रण ठेवून सुयोग्य पचनाकरिता  पिप्पलादिकाढा, अभयारिष्ट, आम्लपित्तवटी, प्रवाळपंचामृत घ्यावे. सायंकाळी लवकर कमी जेवावे. जेवणानंतर अर्धा तास फिरून यावे. कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना शतधौतघृत, खोबरेल तेल, एरंडेल तेल, लोणी, तूप यापैकी एखादे स्निग्ध द्रव्य जिरवावे. सकाळ-संध्याकाळ लघुसूतशेखर, चंद्रप्रभा, ब्राह्मीवटीची मदत घ्यावी. आहार सात्त्विक असावा. परान्न टाळावे. सूर्यनमस्कार, दीर्घश्वसन, प्राणायाम यांचे महत्त्व म्यां पामराने सांगायची गरज नाही.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – ५ डिसेंबर
१९४४ > समीक्षक व ‘शोध’ या संस्थेचे संस्थापक-संचालक विलास वसंत खोले यांचा जन्म. सूर्यबिंबाचा शोध, अध्यात्म आणि विज्ञान. आज्ञापत्र, चौकट इ. संपादित ग्रंथ आणि शोकांतिकेचा उदय, संत नामदेव आणि सांस्कृतिक प्रबोधन, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ इ. स्वतंत्र पुस्तके प्रसिद्ध.
१९५५ > इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांचे निधन. त्यांनी ‘शिवचरित्र साहित्य खंड १ व ७’, ‘किल्ले पुरंदर’, ‘चिमाजी अप्पा’ इ. हे त्यांचे लेखन.
१९९९> लेखक व बेळगाव तरुण भारतचे संपादक बाळकृष्ण रंगराव सुंठणकर यांचे निधन. रॉयवाद, महाराष्ट्रीय संतमंडळाचे ऐतिहासिक कार्य, लोकभ्रम कसे नाहीसे होतील विज्ञानाने? जडवाद  हे त्यांचे ग्रंथ.
२००७> मराठी काव्य व साहित्याचे विविधांगी चिंतन मांडून समीक्षेला झळाळी देणारे मधुकर वामन धोंड यांचे निधन. काव्याची भूषणे, मऱ्हाटी लावणी (संपादन) , ज्ञानेश्वरी : स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य, ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी, चंद्र चवथिचा, जाळय़ातील चंद्र, तरीहि येतो वास फुलांना ही पुस्तके, तसेच अनेक संशोधनपर लेख त्यांनी लिहिले. यापैकी ‘.. लौकिक सृष्टी’ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. म.वां.चे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे.
– संजय वझरेकर