– डॉ. माधवी वैद्य

बेलनं’ हा शब्द सध्या फार वापरला जात नाही, विस्मृतीत गेल्यासारखा झाला आहे. त्या ऐवजी आपण ‘लाटणं’ हा शब्द वापरतो. पण असे असले तरी कोणी कोणी ‘बेलनं’ हा शब्द अजूनही वापरतात. हे ‘बेलनं’ म्हणजेच ‘लाटणं’ ही स्वयंपाकघरातली एक अत्यावश्यक वस्तू असते. लाटणं जर सापडत नसेल तर जेवणाचा चक्क खोळंबा होतो. अर्थात या लाटण्याचा स्वयंपाक करण्यापासून ते अगदी मनातला राग व्यक्त करण्यापर्यंत अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो.

यमुनाबाई हे घरातलं एक अजब प्रकरण होतं. त्याचा अनुभव सगळय़ा घरादाराला होताच. त्या जरा वेंधळय़ा होत्या. विसराळूदेखील होत्या. तर व्हायचं काय, की त्यांच्या या खास स्वभाववैशिष्टय़ांमुळे त्यांच्या हातून घोडचुका होत असत. म्हणजे कधीकधी घराला पुरेल इतका स्वयंपाक तयार नाही, ही गोष्ट त्यांच्या अगदी आयत्यावेळी लक्षात येई. तर कधीकधी पुरेसा स्वयंपाक खरे तर फ्रीजमध्ये तयार आहे, हेच त्या विसरून जात असत. कधीकधी त्यांच्या हातातून भांडी निसटत असत, मग पदार्थाची सांडलवंड होई. मग पुन:श्च स्वयंपाक करण्यापासून तयारी करावी लागे. कधीकधी पोळय़ाच अपुऱ्या पडत असत, मग पुन्हा लाटणं म्हणजे ‘बेलनं’ हातात घ्यावं लागे. अशा वेळी इतरांना रागाने ते लाटणे त्यांच्यावरच उगारण्याची तीव्र इच्छा न झाली तरच नवल!

ही झाली घरातली गोष्ट. पण एखाद्या उद्योजकाचा असा वेंधळा, विसराळू, अव्यवस्थित, गोंधळा स्वभाव असेल तर त्याच्या उद्योगात, कार्यपद्धतीत काय काय घोटाळे होतील याची जरा कल्पना करून बघा. मग त्या उद्योगात ब्रह्मघोटाळे होण्याचेच प्रसंग अधिक येतील. हिशेब नीट ठेवले जाणार नसतील, कोणाकडून उधारी, उसनवारी घेतली, याची नोंद अस्ताव्यस्तपणे ठेवलेली असेल, मीटिंग्सच्या नोंदी नीट ठेवल्या नसतील, पगारांचे हिशेब नीट ठेवण्यात आले नसतील तर सर्वच उद्योग वठणीवर आणण्यासाठी ‘शिजलं, भिजलं, वाया गेलं..’असं म्हणत ‘बेलनं’ फिरून एकदा हाती घ्यावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

madhavivaidya@ymail. com.