scorecardresearch

कुतूहल : करोना विषाणूविरोधी लस

कालांतराने  करोना विषाणू सर्दीच्या विषाणूसारखा सौम्य रूपात मानवात सहजीवन जगू लागेल.

वुहानमध्ये ११ जानेवारी २०२० रोजी कोविडचा पहिला बळी नोंदला गेला. २०२० मार्चअखेरपासून काही आठवडे सारे जग ठप्प झाले. धोतऱ्याच्या फळासारख्या गोल, जणू काटेरी मुकुटधारी, अतिसूक्ष्म आकाराच्या करोना विषाणूचे चित्र जगाला परिचित झाले. आपण विविध उपायांनी म्हणजे साबण, जंतुनाशके, पाणी, योग्यप्रकारे मुखपट्टी वापरून, दोन हात अंतर राखून करोना संसर्ग टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटचा रामबाण  उपाय होता कोरोना विषाणूविरोधी लसनिर्मितीचा.

गेल्या दोन वर्षांत करोनाची लसनिर्मिती चार  प्रकारे केली गेली. पहिला प्रकार आहे संपूर्ण जंतूचा वापर करून. या प्रकारात हे विषाणू दुबळे किंवा निष्क्रिय केले जातात. उदा. कोडाजेनिक्स- न्यूयॉर्क, सीरम इन्स्टिटय़ूट- पुणे आणि भारत बायोटेक – हैदराबाद.

दुसरा प्रकार असा की करोना विषाणूंचे फक्त बाह्य कवच वापरून कवचाबाहेर डोकावणाऱ्या काटेरी तंतूंच्या आकाराला म्हणजेच ‘स्पाईक’ प्रथिनांना पूरक आकाराचे प्रतिद्रव्य रेणू बनवायला श्वेतपेशींना  प्रोत्साहित करून स्पाईक प्रथिनांना निष्प्रभ केले जाते.

तिसरा प्रकार आहे केंद्रकाम्ले (न्यूक्लेइक आम्ल) लस. हा नवा प्रकार असून यात विषाणूच्या डीएनएपासून ‘एम-आरएनए’ मिळवला जातो. आणि यापासून विशिष्ट प्रथिने तयार केली जातात. याला ‘एम-आरएनए’ लस असेही म्हणतात. या पद्धतीत पेशीपटलाला छिद्रे पाडून डीएनए (झायडस कॅडिलाची लस) वा मेदगोलकाद्वारे  एम-आरएनए केंद्रकाम्ले पेशीत घालता येतात (जीननोव्हा बायोफार्माची लस). केंद्रकाम्ले यजमान पेशीला करोना विषाणूंच्या काटेरी तंतूंना निष्प्रभ करणारी विशिष्ट प्रथिने बनवायला भाग पाडतात. यात गोवर, सर्दीच्या विषाणूंचा वाहक म्हणून वापर केला जातो. चौथ्या प्रकारात  प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या  ‘एम-आरएनए’ तयार केला जातो आणि त्यापासून निर्माण झालेली विशिष्ट प्रथिने लस म्हणून वापरली जातात.

लसनिर्मिती प्रक्रियेत सर्वात मोठे आव्हान म्हणजे विषाणूत सातत्याने होत असलेली उत्परिवर्तने. डेल्टा हा नवा विषाणू काही महिन्यांपूर्वी आढळला. त्याच्या तंतूप्रथिनांत १८ उत्परिवर्तने झालेली होती. हल्लीच माहीत झालेला ओमायक्रॉन तंतूप्रथिनांत त्यापेक्षा जास्त म्हणजे ४३ उत्परिवर्तने झाली आहेत. नव्या अवतारांमध्ये आपसात संकर होऊन ‘डेल्मिक्रॉन’सारखी आणखी नवी विषाणूरूपे अस्तित्वात येत आहेत आणि राहतील. मदतीला नव्या, नाकात फवारण्याच्या लशीही उपलब्ध होतील. त्यांतून तयार प्रतिद्रव्ये पुरविली जातील.  विषाणूविरोधी लढा दीर्घकाळ चालेल. कालांतराने  करोना विषाणू सर्दीच्या विषाणूसारखा सौम्य रूपात मानवात सहजीवन जगू लागेल.

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vaccine on coronavirus covid 19 vaccine zws