व्हेनिस अनेक शतके पूर्वेकडच्या बायझन्टाइन रोमन साम्राज्याच्या अखत्यारीत असल्यामुळे व्हेनिसच्या स्थापत्य, कला संस्कृतीवर बायझन्टाइनचा प्रभाव दिसून येतो. विशेषत: चर्च/ प्रासादांवरील घुमटांचे आकार, रंग, चित्रकृती असलेल्या मोझाइक्स व पुतळे ही याची बोलकी उदाहरणे. सेंट मार्क बॅसिलिकाचे बायझन्टाइन शैलीचे पाच घुमट त्यांच्या अनोख्या स्थापत्यशैलीमुळे जगप्रसिद्ध झाले. सान फ्रान्सिस्को आणि सान जॉर्जओि चच्रेसच्या बांधकामांमध्ये पालाडिओ या वास्तुविशारदाने केलेल्या गॉथिक शैलीचेही स्थापत्य दिसून येते. पालाझ्झो डय़ुकाले म्हणजे डोजचा राजवाडा आणि धनिकांच्या प्रासादांमध्ये पुनरुत्थानोत्तर काळातील प्रसिद्ध चित्रकार बेलीनी, व्हेरोनीज, टिशियन, जॉर्जीयन यांच्या सुरेख चित्रकृतींमुळे व्हेनिसमधील प्रत्येक वास्तू जणू एक कलादालनच बनलीय. मायकेल अ‍ॅन्जेलोसुद्धा व्हेनिसमध्ये काही काळ वास्तव्यास होता. व्हेनिसने अनेक उत्तमोत्तम संगीतकार जगाला पुरविले. अ‍ॅन्टोनियो विवाल्डी हा कॅथोलिक धर्मगुरू बरोक शैलीच्या संगीताचा विख्यात रचनाकार होता. त्याने एकूण ४६ नाटके आणि ७३ लघुसांगीतिका लिहिल्या. १७२३ साली त्याने लिहिलेल्या ‘फोर सीझन्स’ या सांगीतिकेचे प्रयोग आजही होतात. तो स्वत: एक उत्तम व्हायोलिन वादक होता. टोमॅसो अलबिनानी याचे प्रसिद्ध संगीत नाटक ‘टिआट्रो इटालिया’ आजही लोकप्रिय आहे. शेक्सपियरची ’अ‍ॅथेल्लो’ ही शोकांतिका व्हेनिसवरच बेतलेली आहे. पुनरुत्थानोत्तर काळात सोळाव्या- सतराव्या शतकात येथील संस्कृती बहरली.
व्हेनिसची लोकवस्ती दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे तिथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कधी तरी, पुढे व्हेनिसच्या नागरिकांच्या बरोबरीने होईल अशी शक्यता वर्तवली जाते. त्या वेळी व्हेनिस शहर हेच स्वत: एक ‘ओपन एअर म्युझियम’ होईल असे वाटते! व्हेनिसमध्ये जानेवारीत साजरा होणारा काíनव्हल युरोपीय देशातील दुसऱ्या क्रमांकाचा समजला जातो. समकालीन चित्रपट, दृश्यकला, वास्तुकला, नृत्य यांसाठी व्हेनिसची ‘बिएनाले’तर जगप्रसिद्धच आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 
सुकाणू
सुकाणू एक विषारी वृक्ष आहे. म्हणून याला इंग्रजीत ‘स्युसाइड ट्री’ म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘सरबेरा ओडोलम’ असे आहे. भारतात आणि दक्षिण अशियाच्या इतर देशांमध्ये नसíगकरीत्या वाढतो. साधारण समुद्रकिनाऱ्याची हवा यांस अधिक पोषक असून त्या जागी चांगला वाढतो. सुकाणू एक छोटेखानी सदाहरित वृक्ष आहे. फांद्यांवर एकत्रित, चकचकीत हिरव्या रंगाची पाने, वरून गोलसर व खालच्या बाजूला निमुळती असतात. फुले मोठी आणि सुगंधी असतात. हा वृक्ष फार कमी प्रमाणात उद्यानात दिसतो. फळ जेव्हा हिरवे असते तेव्हा साधारण क्रिकेटच्या चेंडूच्या आकाराचे असते. वाळल्यावर फळ तंतुमय होते व अतिशय कमी वजनाचे होते. जरी हा वृक्ष विषारी असला तरी सदाहरित व छोटेखानी असल्याने उद्यानात शोभून दिसतो.
सुकाणू या वृक्षाचे कण्हेरीशी खूप साधर्म आहे. संपूर्ण वृक्षात पांढरा द्रव अर्थात लेटेक्स असतो. फळामध्ये सरबेरीन नावाचे एक विषारी तत्त्व असते. त्याचा चुकून वापर झाल्यास स्नायूंना हृदयाकडून होणारा कॅल्शियमचा पुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयाचे स्पंदन अनियमित होते. काही वेळी मृत्यूपण होऊ शकतो. उपचार करत असताना नेमके कारण शोधणे कठीण होऊन बसते. केरळ प्रांतात १९८९-९९ या कालावधीत जवळजवळ पाचशे मृत्यू सुकाणू वृक्षामुळे झाल्याची नोंद आहे. विष शरीरात भिनल्यावर मळमळणे, उलटय़ा, पोटदुखी ही लक्षणे दिसतात. या विषाचा उपयोग उंदीर मारण्यासाठीही होतो.
फळांचा उपयोग बायोइन्सेक्टिसाइड बनवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे सुकाणूंच्या बियांपासून बायोडिझेल निर्मिती करणे शक्य आहे का, तसेच ते फायद्याचे आहे का यावरही संशोधन चालू आहे.
मुंबईत भायखळा येथील जिजामाता उद्यानात व टाटा मूलभूत संशोधन केंद्र- कुलाबा वसाहत येथे एकेक सुकाणूंचा वृक्ष आहे.
नसíगकरीत्या ज्या परिसरात हा वृक्ष वाढतो त्या ठिकाणी या वृक्षाची लागवड करून वृक्षवाढ होऊ शकते. उद्यानातील पायवाटांच्या दोन्ही बाजूस लागवड केल्यास परिसर शोभून दिसण्यास आणि उद्यानाची शोभा वाढवण्यास मदत होईल.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venice art and culture
First published on: 19-05-2016 at 03:11 IST