संपूर्ण व्हेनिस शहर कालव्यांवर तरंगतेय असा भास येथील कालव्यांमधून जाताना होतो. या कालव्यांवरील तेराव्या ते अठराव्या शतकातले १७० प्रसिद्ध प्रासाद व्हेनिस प्रशासनाने जतन करून ठेवलेत. त्या काळात पाईन वृक्षाच्या जाड सालींच्या चळती पाण्यात ठेवून त्यावर दगड रचून या इमारतींचा पाया तयार केला आहे. अलीकडे संपूर्ण व्हेनिसमधील इमारती थोडय़ा प्रमाणात खचताहेत. व्हेनिसच्या ऐतिहासिक भागातील सर्व वाहतूक जलमार्गानेच होते. त्या भागात पदपथांशिवाय दुसरे रस्तेच नाहीत. ‘गोंडोला’ बोटी हे व्हेनिसचे पारंपरिक वाहन! लांब, चिंचोळ्या, काळ्या रंगाच्या आणि लांब बांबूंच्या साहाय्याने नौकानयन करणाऱ्या या गोंडोला पूर्वी व्हेनिसमध्ये सर्रास वापरल्या जात. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात डिझेलवर चालणाऱ्या स्वयंचलित बोटी आल्यावर गोंडोला कमी कमी होत गेल्या. सध्या गोंडोला बोटी केवळ पर्यटकांच्या मौजेसाठी वापरल्या जातात. सतराव्या, अठराव्या शतकात आठ ते दहा हजार एवढय़ा प्रचंड संख्येने असलेल्या गोंडोला सध्या एकविसाव्या शतकात केवळ चारशेच्या संख्येने उरल्यात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत गोंडोला बोटी विविध आकारांच्या, विविध रंगांच्या आणि बोटीत एक बंदिस्त केबिन असणाऱ्या होत्या. १९५० साली व्हेनिस प्रशासनाने गोंडोला बांधणीबाबत काही प्रमाण निश्चित केले आणि त्यासाठी कायदाही मंजूर केला. ट्रमोंटीन याने केळ्याच्या आकाराची बनवलेली गोंडोला हे प्रमाण ठरले. गोंडोला बोटीच्या बांधणीसाठी आठ जातींच्या वृक्षांचे लाकूड वापरले जाते. या लाकडांचे २८० तुकडे जोडून गोंडोला बनते. बोटीचा तळ सपाट हवा, फक्त काळाच रंग हवा. १९५० सालापासून गोंडोला व्यावसायिकांचा संघ या बोट वाहतुकीचे नियंत्रण करतो, गोंडोला वाहकांना परवाने देतो. सध्या असे ४२५ गोंडोला परवानेधारक आहेत. गोंडोला बोट चालवणाऱ्या नाविकाला ‘गोंडोलियर’ म्हणतात. नवीन गोंडोलियरला प्रशिक्षण घ्यावे लागते. नौकानयनाशिवाय त्याला व्हेनिसच्या इतिहासाची जुजबी माहिती आवश्यक असते. उभ्या रंगीत चट्टय़ापट्टय़ांचा शर्ट, फिक्या रंगाची पँट आणि डोक्यावर जाड कडा वळवलेली हॅट, हा त्याचा युनिफॉर्मही ठरलाय! विवाहप्रसंगासाठी मिरवणुकीत वापरावयाच्या सुशोभित, वेगळ्या रंगांच्या गोंडोला निराळ्या असतात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

करदळ

करदळ म्हटल्यावर साधारणपणे डोळ्यांसमोर उद्यानात समूहाने वाढणारे पिवळ्या, नािरगी किंवा लाल फुलांचे मोठय़ा पानां-झुडुपांचे चित्र दिसते. पण ही  करदळ ती नाही.

या करदळीचा लहान वृक्ष म्हणा किंवा पसरणारे लहान झुडूप जे जास्त योग्य ते. काष्ठ वेल म्हणणे पण तसे बरोबर नाही. पण त्यास असलेल्या काष्ठ तंतूंचा आधार घेऊन करदळ वाढते. मूळ फांद्यांचे रूपांतर काष्ठतंतूत  होते. पाने व फुले येणाऱ्या फांद्या बेचक्यात असतात. करदळ साधारणपणे २-३ मीटर उंच वाढते. १० ते २५ सेमी लांब अशी एकांतरीत पाने असतात. सदाहरित पानांवर ठळक शिरा असतात. फुलं पांढरी, लहान तुऱ्यात उगवतात व लवकर गळून पडतात. फुलं लहान, गोल पाच पंखसदृश पाकळ्या असलेली, फुलांचा हंगाम मार्च – एप्रिलमध्ये असतो.

हा दुर्मीळ वृक्ष महाराष्ट्रात खंडाळा, माथेरान, फणसाडचे अभयारण्य, अंबोली घाट या ठिकाणी नसíगकरीत्या वाढताना आढळतो. केरळमध्ये ही करदळ आहे व तिला मल्याळम भाषेत ‘मोडिरावल्ली’  म्हणतात. या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘एन्सीस्ट्रोक्लॅडस हायनीअनस  असे आहे. अन्सिस्टीन म्हणजे हुक आणि क्लॅडोस म्हणजे फांद्या अर्थात हूक असलेल्या फांद्यांचा वृक्ष. संशोधनाअंती असे लक्षात आले की करदळीच्या एका जातीमध्ये ‘एड्स’ हा रोग बरा करण्याची क्षमता आहे. म्हणूनच सर्वाना करदळीच्या प्रजातींमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. जरी ही बातमी माणसांना आनंद देणारी असली करदळीची मोठय़ा प्रमाणात मागणी वाढणार आणि परिणामी हा दुर्मीळ वृक्ष नाहीसा होण्याच्या मार्गावर जाणार. खरोखरच या वनस्पतीचा उपयोग औषधे निर्माण करण्यासाठी होऊ लागला तर ही वनस्पती निसर्गातून गोळा करणे टाळून या वनस्पतीची लागवड केल्यास करदळीचे अस्तित्व कायमस्वरूपी राहण्यास कारणीभूत ठरेल.

या वनस्पतीचे अस्तित्व टिकवायचे असल्यास ज्या ज्या परिसरात हा छोटा वृक्ष आहे त्या त्या जागी या वृक्षाच्या बिया टाकून त्यांची वाढ कशी होईल, अशा प्रकारचे प्रयोग करून बघण्यास हरकत नाही जेणेकरून या वृक्षाच्या नसíगक उपलब्धतेत वाढ होईल.

डॉ. सी. एस. लट्ट

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई -२२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venice feature gondola
First published on: 17-05-2016 at 04:16 IST