दुसरी-तिसरीपर्यंतच्या वयातली मुलं जराही शांत बसत नाहीत. त्यांना मारामारी करायला, ढकलाढकली करायला अतिशय आवडतं. असं काही केल्याशिवाय त्यांना चन पडत नाही. अशी अनेक पालकांची -शिक्षकांची तक्रार असते. अशा मुलांवर दंगेखोर असा शिक्काही बसू शकतो. अशा मुलांना इतर मुलांपासून शिक्षा म्हणून लांब ठेवलं जातं. पण मुलांना मनापासून मारायला आवडतं का?
अशाच लहान मुलग्यांवर एक प्रयोग केला. एका वेळेला एक मुलगा – अशा पद्धतीने त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून आधी बोलतं केलं. जसं की तुझं नाव काय आहे, मोठं झाल्यावर तुला काय करायला आवडेल? यानंतर त्यांच्याच वयाच्या मुलीशी ओळख करून दिली. या मुलीशी शेकहँड कर, तिच्यात काय आवडलं ते सांग, तिच्याकडे बघून गमतीदार चेहरे कर असं सांगितलं. मुलांनी हे सर्व केलं. आता शेवटची गोष्ट – तिला मार, असं सांगितलं. हे ऐकून मुलं भांबावली, गोंधळली, त्यांच्या मनातले भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसले.
सर्व मुलग्यांनी मुलीला मारायला नकार दिला. ‘का मारणार नाही?’ असं विचारल्यावर कोणालाही मारणं चांगलं नसतं अशी उत्तरं मुलग्यांनी दिली. हाच प्रयोग भारतीय मुलग्यांवर केला तेव्हाही हेच निष्कर्ष दिसले. लहान मुलग्यांना कळतं की मारू नये, पण एका आकडेवारीनुसार ६५ टक्के भारतीय पुरुष कौटुंबिक हिंसाचार करतात. याबाबतीत आपल्या देशाचा वरचा नंबर आहे, असं कसं?
जी मुलं उगाचच दुसऱ्यांना मारतात, ढकलाढकली करतात, यामागे इतर अनेक कारणं असू शकतात. दुसऱ्याला वेदना देणं हा कदाचित मूळ हेतू नसतो. तर मारणाऱ्या मुलांच्या अंगात अतिशय जास्त शारीरिक ऊर्जा असते. ही ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वळवली, तर अशी मुलं शांत होतात. त्यामुळे अशा मुलांनी भरपूर खेळणं, दमणं हे त्याच्यावरचे चांगले उपाय आहेत. मात्र काही मुलांच्या घरांमध्ये कौटुंबिक हिंसाचार असू शकतो. ज्यांच्या मेंदूतल्या न्युरॉन्सची हा हिंसाचार बघतच जोडणी झालेली आहे अशी मुलं दुसऱ्या मुलांवर हात उचलू शकतात. मुलांना कोणतंही लेबल लावण्याच्या आधी हे मूल असं नक्की का करतो हे शोधून त्यावर उपाय केले तर ते त्या मुलांसाठी योग्य ठरेल.
– श्रुती पानसे
contact@shrutipanse.com