प्रचंड आकाराच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या आणि उंचच उंच बहुमजली इमारतींनी भरलेल्या शहरे-महानगरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येक नगरवासीयाच्या घरापर्यंत पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हे नजीकच्या भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. मोठमोठी धरणे बांधणे, त्यामधील पाणी शेकडो किलोमीटपर्यंत वाहून आणणे, ते शुद्ध करणे आणि त्याच शुद्ध स्वरूपात, योग्य दाबाने सर्व भागांपर्यंत पोहोचवणे हे मोठय़ा जिकिरीचे काम असते. म्हणूनच महानगरांनी जलव्यवस्थापनामध्ये याव्यतिरिक्त इतर उपलब्ध जलस्रोतांचा विचार करणे आता गरजेचे झाले आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले विहिरी, तलाव, टय़ूब किंवा बोअर वेल यांतील पाणी हा एक स्रोत आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा, पण लोकमान्यता न मिळालेला स्रोत आहे; तो म्हणजे- आपल्या दैनंदिन वापरानंतर आपल्यासाठी निरुपयोगी असलेले पाणी.. म्हणजेच सांडपाणी!

आपण घरामध्ये जितके पाणी वापरतो, जवळपास तेवढेच सांडपाणी निर्माण करतो. वास्तविक याच पाण्याचा पुनर्वापर करता येणे शक्य आहे. परंतु आपल्याला आजवर मिळत असलेल्या मुबलक स्वच्छ, शुद्ध पाण्यामुळे आणि विशिष्ट पूर्वग्रह-समजुतींमुळे सांडपाण्याला उपयुक्त जलस्रोत न मानता ते दूषित पाणी मानले जाते. त्यामुळे ते त्वरित दूर वाहून नेऊन अन्यत्र सोडून द्यावे यासाठी खर्चीक यंत्रणा उभारली जाते.

सर्वसाधारणपणे सांडपाण्यात काही रासायनिक घटक असतात. याने ते पाणी अस्वच्छ बनते. खरे तर आपण घरी स्वच्छतेसाठी- शारीरिक तसेच कपडे, भांडी, वगैरे धुण्यासाठी- रसायनयुक्त की सेंद्रिय पदार्थाचा वापर करतो, यावर सांडपाण्याची पत किंवा गुणवत्ता अवलंबून असते. सांडपाण्याचे मूलत: ‘ग्रे’ आणि ‘ब्लॅक’ असे दोन प्रकार असतात. यातील ‘ग्रे’ पाणी म्हणजे आपल्या स्नानगृहातून किंवा भांडी व कपडे धुण्यातून निर्माण झालेले पाणी आणि ‘ब्लॅक’ पाणी म्हणजे मानवी मैलातून निर्माण झालेले पाणी. यामध्ये ग्रे पाणी अतिशय माफक प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा वापरता येते. इतकेच नव्हे, तर या ग्रे पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्यसुद्धा करता येते. आजच्या तंत्रज्ञानयुक्त युगात या पाण्याचे शुद्धीकरण करून पुन्हा वापरल्यास आपली पाण्याची मागणी जवळपास अर्ध्याने कमी होऊ शकते.

– विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org