दरवर्षी पाऊस पडतो. पावसाचे पाणी ओढे व नाले यातून प्रथम नदी व नंतर समुद्राला मिळते. हे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरवून सिंचनासाठी उपलब्ध करून द्यायला हवे. याचे तंत्रज्ञान अग्निबाण उडवण्यासाठी लागते तसे गुंतागुंतीचे नाही. या कामासाठी लागणारी साधनसामग्री स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असते. त्याचा वापर करून जलसंधारण आणि मृदसंधारण करण्यासाठी लागणारे मनुष्यबळही हवे तेवढे उपलब्ध आहे. अशा सर्व कामांसाठी पैसेही फार लागतात असे नाही. निसर्गाने पाणी दिले आहे. ते साठवण्यासाठीचे तंत्रज्ञान सोपे आणि सहज उपलब्ध आहे. पण प्रश्न सोडवण्यासाठी निव्वळ तंत्रज्ञान पुरेसे नाही. आणखी एक गोष्ट लागते, सुजाण नेतृत्व आणि सामाजिक जाणीव!

महाराष्ट्र राज्यात सुमारे १५० गावांमध्ये चांगल्या प्रकारे जलसंधारणाचे काम झाले आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची हे गाव त्यापैकी एक. मुख्य म्हणजे जलसंधारणाचे काम झाल्यामुळे जे अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे, ते सर्व गावकऱ्यांनी वाटून घेण्याची प्रथा येथे रूढ झाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाण्याची भरमसाट गरज असणारी ऊस व केळी यासारखी पिके घेता येत नाहीत. गावातील शेतकरी जास्तीत जास्त कांद्याचे पीक घेऊ शकतात.

कडवंची गावच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम विजय आण्णा बोराडे यांनी केले आहे. या गावाच्या जलसंधारणाच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. ही रक्कम त्यांना ‘इंडो-जर्मन फंडा’तर्फे मिळाली होती. या अल्पशा भांडवली गुंतवणुकीवर तेथील शेतकरी वर्षांला तब्बल ७५ कोटी रुपये मिळवत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, सिंचनासाठी थोडेसे पाणी उपलब्ध झाले आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागांतील आर्थिक प्रश्न सुटू शकतात.

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवल्यामुळे आणि त्याचा संरक्षक सिंचनासाठी वापर सुरू केल्यामुळे भुसार पिकांची उत्पादकता आता पूर्वीच्या दुप्पट झाली आहे. शेतकऱ्यांनी दुधाचा जोडधंदा सुरू करून आपल्या उत्पन्नात भर घातली आहे. काही शेतकऱ्यांनी विहिरीतील आणि शेततळय़ातील पाण्याचा वापर करून द्राक्षे, ढोबळी मिरची अशी व्यापारी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. अशी अधिक उत्पन्न देणारी पिके घेण्यात कडवंची हे गाव आघाडीवर आहे.

– रमेश पाध्ये

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org