वेबसाइट हे माध्यम नवं असल्याने तिथली मोजमापनंही नवी, आगळी आहेत. सुरुवात करू या नुसत्या साइटभेटींनी. जितक्या जास्त भेटी तितकी जास्त लोकप्रियता अशी सर्वसामान्य अटकळ असते. पण त्याहून महत्त्वाचं असतं अशा माहितीचं पुढचं पृथक्करण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या साइटवर किती भेटी (visits) झाल्या हे पाहताना त्या कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसवरून (इंटरनेटला जोडलेल्या प्रत्येक साधनाचा पत्ता) झाल्या, हेही पाहिलं जातं. एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून तीन-चारदा साइटभेटी होत असतील, तरी अभ्यागत (visitor) एकच असतो. म्हणून भेटी आणि अभ्यागत वेगवेगळे मोजले जातात.

समजा, एखाद्या साइटवर एका दिवसात २०० भेटी झाल्या;  तरी प्रत्यक्ष अभ्यागत १५० असू शकतात. बातम्या पुरवणाऱ्या किंवा शॉपिंग साइट्स, ब्लॉग्ज, फोरम्स यांना असे पुन:पुन्हा भेट देणारे निष्ठावंत अभ्यागत हवे असतात. अशा सतत येणाऱ्या मंडळींचा एक समान आवड असणारा समूह बनू शकतो आणि त्याला मार्केटिंगच्या दृष्टीने खूप महत्त्व असतं. उलट नव्या साइट्सना अधिकाधिक अभ्यागत हवे असतात. म्हणून हे मापन महत्त्वाचं ठरतं.

यासोबत मोजला जातो बाऊन्स रेट. म्हणजे आलेल्यांपकी किती जण तिथे येऊन लगेच परतून गेले त्याचं मापन. साइटवर रंजक, उपयुक्त माहिती असेल तर अभ्यागत जास्त वेळ थांबतात. अर्थात बाऊन्स रेट जितका कमी तितकं चांगलं!

साइटवर थांबणारे अभ्यागत तिथला कोणता मजकूर वाचताहेत, हेही या मापनात नोंदलं जातं. कोणत्या पानाला किती दृष्टिक्षेप (views) मिळाले, यावरून त्या मजकुराचं वाचनमूल्य ठरतं. त्यावरून मग कशा प्रकारचा मजकूर ठेवावा, त्या वेबसाइटला किती जाहिराती मिळू शकतात, याचा अंदाज बांधता येतो.

पुढचा प्रश्न असतो की या साइटवर हे अभ्यागत कुठून आले? काही जण थेट साइटचा पत्ता वापरून येतात, काही सर्चमधून येतात, तर काही दुसऱ्या एखाद्या साइटवरून संदर्भ मिळवून येतात. भेटींच्या या पृथक्करणामुळे आपली साइट अधिक चांगली कशी करावी, तिची जाहिरात कशी आणि कुठे करावी, याची दिशा मिळते.  असं मोजमापन करणारी अनेक साधने (टूल्स) नेटवर उपलब्ध आहेत.

– मेघश्री दळवी 

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

मास्ती वेंकटेश :  व्यक्तिमत्त्व

कन्नड लेखक मास्ती वेंकटेश अय्यंगार यांनी १९१० च्या शेवटी महाविद्यालयीन विद्यार्थी असतानाच कथा लिहायला सुरुवात केली होती. सुरुवातीला इंग्रजीमध्ये त्यांनी लेखन केले पण नंतर मात्र कन्नडमध्येच लिहिले. १२३ पेक्षा अधिक पुस्तके त्यांची कन्नडमध्ये आणि १७ पुस्तके इंग्रजीमध्ये प्रकाशित झाली आहेत.

मास्तींना भारतीय संस्कृतीबद्दल नितांत आदर होता. त्यांच्या साहित्यात त्या वेळच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन, ऐतिहासिक संदर्भ येतात. ऐतिहासिक वास्तवाशी प्रामाणिक राहूनच त्यांनी लेखन केले आहे. परमेश्वराच्या सत्तेवर, त्याच्या अनुकंपेवर त्यांची असीम श्रद्धा होती. ते नेहमी मानीत, की अनेक प्रसंगी ती दिव्यशक्ती त्यांच्या बाजूने उभी राहते. मास्तींच्या मते साहित्याचे प्रयोजन समाज आणि व्यक्ती या दोन्ही घटकांना आनंद, सुख प्रदान करणे हेच आहे.

कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, अनुवाद अशा अनेक साहित्य प्रकारांत मास्तिजींनी लेखन केले आहे. १९१० मध्ये लिहिलेल्या ‘रंगन मदुवे’पासून त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘मातुगार रामण्णा’पर्यंत त्यांनी विविध साहित्य प्रकारांत लेखन केले. शेवटपर्यंत त्यांचे लेखन सुरू होते. कथेच्या तुलनेत कादंबरीलेखन त्यांनी खूपच उशिरा सुरू केले. कन्नड लोकांचे जीवन, संस्कृती, भाषा याबद्दल अपार प्रेम व अभिमान त्यांनी साहित्यातूनही व्यक्त केला आहे.

मास्ती हे एक उत्तम वक्ते होते. इंग्रजी व कन्नड भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आपल्यासह साहित्यिकांबद्दल – द. रा. बेन्द्रे, कुवेंपु-  इ.बद्दल -त्यांना विशेष आपलेपणा होता. विनोदाचीही त्यांना उत्तम जाण होती.

मास्तींना वयाच्या ९१ व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. एकाने त्यांना विचारले, ‘‘आपल्याला हा पुरस्कार जरा उशिरा मिळाला असे वाटत नाही का?..  या प्रश्नावर  विलंब न लावता मास्तींनी हसत उत्तर दिले – ‘‘घरी जिलेबी केली, की लहान मुलांना प्रथम देतात. मोठी माणसे नंतर खातात. मला आत्ता पारितोषिक मिळणे तसेच आहे.’’

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Website measurement marathi articles
First published on: 25-05-2017 at 03:39 IST