बऱ्याच वर्षांपासून वैज्ञानिक कार्बनच्या सूक्ष्म रूपांच्या शोधात आहेत. परंतु कार्बन अणूंचा एखादा अगदी पातळ थरही मिळवणं, ही अशक्य कोटीतली गोष्ट वाटत होती. युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरचे प्रो. आंद्रे गीम आणि त्यांचे विद्यार्थी कॉन्स्टन्टीन नोव्होसेलोव्ह यांनी चिकटपट्टीवर पेन्सिलीमधील शिसाचा छाप उठवायला सुरुवात केली. चिकाटीनं छाप उमटवताना शेवटी ग्राफाईटचा एक मधमाश्यांच्या पोळ्यासारखा सुंदर षट्कोनी छाप चिकटपट्टीवर उमटला! त्याला जाडी जवळजवळ नव्हतीच! त्याला ग्राफिन असं नाव दिलं गेलं. तीस लाख ग्राफिनचे थर एकमेकांवर ठेवले तर त्याची जाडी केवळ एक मिलिमीटर होईल. या संशोधनासाठी प्रो. आंद्रे गीम आणि नोव्होसेलोव्ह यांना २०१० सालचे नोबेल पारितोषिकही दिलं गेलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज ग्राफिन वैज्ञानिकांचा ‘लाडका’ पदार्थ आहे. असं काय आहे ग्राफिनमध्ये? ग्राफिनचं संशोधन करताना त्याचे विलक्षण गुणधर्म दिसून आले. ग्राफिनमधून सामान्य तापमानाला इतर पदार्थाच्या तुलनेत अधिक वेगाने वीज वाहते. तो तांब्यापेक्षाही उत्तम उष्णतावाहक आहे. तो हिऱ्यापेक्षा चाळीसपट कठीण आहेच. शिवाय त्यात प्रत्यास्थता (लवचीकपणा) रबरापेक्षा किती तरी पटीनं जास्त आहे.

यापासून बनवले गेलेले संगणक-टीव्हीचे स्क्रीन, मोबाइल हॅण्डसेट तुम्ही घडी घालून ठेवू शकाल, कुठेही नेऊ शकाल! स्क्रीनटच्, एलईडी, अल्ट्राफास्ट लेझर, बॅटरी यांच्या निर्मितीमध्ये ग्राफिन हा महत्त्वाचा घटक असेल. प्लॅटिनम -इरिडियमसारख्या महाग धातूंना तो पर्याय ठरू शकेल. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेला इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये ग्राफिन रूपांतरित करू शकतं!

सन २००८ मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी ग्राफिन हा सगळ्यात मजबूत पदार्थ आहे, हे सिद्ध केलं. ग्राफिनचा एक थर आणि तेवढय़ाच जाडीचा पोलादाचा थर यांची ‘ताकद’ त्यांनी मोजली तेव्हा ग्राफिन शंभरपट जास्त मजबूत असल्याचे लक्षात आले. जेमतेम केसभर जाडीची एक चौरस मीटर ग्राफिनची ‘जाळी’ एखादं मांजर सहज तोलू शकेल.  ग्राफिन अतिशय हलकं असल्यानं उपग्रह, विमानं, लष्करी साधनं इतकंच टेनिस रॅकेट, नेहमीच्या वापरातल्या वस्तू अजून हलक्या होतील, पर्यायाने इंधन कमी लागेल. शिवाय त्यांना विशेष मजबुती असेल. ग्राफिनमुळे डेटास्टोरेज क्षमता अधिक गुणवत्तेची होईल. इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा घट अशा दैनंदिन जीवनांतील क्षेत्रांत ग्राफिनमुळे क्रांती येईल, असं  मानलं जातं. नॅनो तंत्रज्ञानात ग्राफिन किमयागार ठरू शकतो.

-चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is graphene
First published on: 15-02-2018 at 02:29 IST