आपल्याकडे ‘कुपा’ किंवा ‘गेदर’ म्हटला जाणारा हा सुरमईसारखा दिसणारा जाडसर मासा भारतीय खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरत नाही. याउलट पाश्चिमात्य देशांत टय़ुना खाणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. आपल्या कोळी समाजातील घरांमध्ये याचे स्वयंपाकात नानाविध प्रकार केले जातात. मात्र बेसुमार आणि अवैज्ञानिक पद्धतीने केलेल्या मासेमारीमुळे यांच्या संख्येत घट होत आहे. म्हणूनच ‘शाश्वत पद्धतीने यांचे नियोजन करण्याचा प्रयास करणे’, यासाठी या दिनाचे निमित्त! पोषणमूल्यांच्या बाबतीत सरस असलेला हा मासा एकूण २० टक्के समुद्री माशांचे मार्केट व्यापून आहे.

मुळात भक्षक असणारा टय़ुना कळपाने पोहतो. त्यामुळे फेकलेल्या जाळय़ात मोठय़ा संख्येने मासे सापडतात. म्हणूनच याच्या शिकारीवर निर्बंध येणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेम्ब्लीने २ मे रोजी टय़ुना दिन साजरा करण्याचे मुख्य कारण हेच की, समुद्रातील या खाद्यसंपत्तीचे संपूर्ण निर्मूलन होऊ नये. प्राचीन प्राणिशास्त्रज्ञ ‘अ‍ॅरिस्टॉटल’ यांनी माशाच्या प्रजातीचे वर्णन लिहून ठेवले आहे. टय़ुनाच्या मासेमारीला खूप मोठा इतिहास आहे.

एका तासात ७३-७५ किलोमीटर पोहून जाणारा हा कणखर मासा वजनाने २२७ किलोपेक्षा जास्त वाढू शकतो. हे सतत स्थलांतर करतात, तसेच निरनिराळय़ा समुद्री प्रदेशातील एका खंडातून दुसऱ्या खंडात जातात. यांच्या शरीरात असणाऱ्या खास चयापचयामुळे हे कोणत्याही समुद्रात तग धरू शकतात. स्वत:च्या शरीराचे तापमान वाढवण्याच्या क्षमतेमुळे थंडगार गोठलेल्या पाण्यातदेखील हा जाऊ शकतो. बऱ्याच वेळा हा मासा ‘बायकॅच’मध्ये पकडला जातो, त्यासाठी योग्य पद्धतीची जाळी वापरणे आवश्यक आहे. मासेमारीचे शास्त्रीय व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी मच्छीमारांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. या माशाबद्दल जनसामान्यांत जागरूकता निर्माण करणे, या मुख्य हेतूसाठी या वर्षीची संकल्पना आहे ‘येस वुई कॅन’, म्हणजेच ‘हो, आम्हाला हे शक्य आहे’. भविष्यातील पिढय़ांना हा मासा ज्ञात राहण्यासाठी त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा टय़ुना फक्त चित्रांतच दिसेल.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांत समुद्रीप्राण्यांची काळजी घेणे हे अंतर्भूत असल्यामुळे हा दिवस साजरा करून आपणदेखील या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल टाकू शकतो.

– डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org