हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर

दैनंदिन जीवनाचा काही प्रमाणात भाग झालेल्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतल्यानंतर, आता भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल..

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
evm machine court case marathi news
ईव्हीएम वापरताना माहिती कायद्याचे उल्लंघन होते म्हणून बॅलेट पेपरने निवडणूक घ्या, उच्च न्यायालयात याचिका
voice commands with Gemini AI to finding a specific EV charging station 10 hidden Google Maps features You Know
आता प्रवास होईल अधिक सोपा; Google Maps च्या ‘या’ १० फीचर्सबद्दल जाणून घ्या…

या लेखमालिकेत आपण औद्योगिक क्रांतिपर्वाच्या चौथ्या युगातील सायबर-फिजिकल विश्व आणि त्यातील सहज उपलब्ध असलेल्या व आपल्या जीवनात काही प्रमाणात समाविष्ट झालेल्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेत आहोत. त्यात विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), वस्तुजाल अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड, ५-जी/फायबर, ऑग्मेंटेड आणि व्हर्च्युअल रियालिटी (एआर/व्हीआर), ड्रोन्स, सायबर-सुरक्षा अशा विषयांबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. वरील सर्व तंत्रज्ञान वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेतून आपल्या दैनंदिन जीवनात काही प्रमाणात का होईना, उपलब्ध झाले आहे. यापुढे आपण बघू : सध्या जागतिक पातळीवर संशोधन सुरू असलेले आणि नजीकच्या काळात आपल्या दैनंदिन आयुष्याचा आमूलाग्र भाग बनू शकतील अशा तंत्रविषयांबद्दल! ‘इमर्जिग टेक्नोलॉजिस्’ म्हणजेच उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विषयाची चर्चा पुढील काही लेखांत सविस्तरपणे करू या.

या लेखमालेचा प्रवास साधारणपणे पुढील टप्पे समोर ठेवून सुरू आहे..

(अ) सध्याचे उपलब्ध डिजिटल तंत्रज्ञान

(ब) उदयोन्मुख तंत्रज्ञान

(क) चौथ्या औद्योगिक क्रांतिपर्वाआधीच्या युगातील प्रत्यंतर घडवणारे महत्त्वाचे शोध आणि रंजक इतिहास सारांशरूपात; तसेच भविष्यातील जग, जीवन, शक्यता आणि आव्हाने

(ड) शेवटच्या टप्प्यात या सर्व स्थित्यंतराला सामोरे जाण्यासाठी पुढील काळातील व्यवसाय, रोजगार, शिक्षण यांबद्दल.

म्हणजे आता आपण, या लेखमालेच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत!

सध्याचे सर्वात महत्त्वपूर्ण उदयोन्मुख तंत्रज्ञान (संदर्भ : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, २०१९, अहवाल व इतर संशोधन) खालीलप्रमाणे :

(१) ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय)

(२) क्वाण्टम आणि सव्‍‌र्हरलेस कॉम्प्युटिंग

(३) बायो-प्लास्टिक्स, नेक्स्ट-जेन मटेरियल्स

(४) बायोमेट्रिक्स व कोलॅबोरेटिव्ह टेलिप्रेसेन्स

(५) मायक्रो कॅमेरा लेन्सेस, स्क्रीन्स

(६) कृत्रिम प्रकाश, प्रीसिजन अ‍ॅग्रो, स्मार्ट खते आणि ड्रोनआधारित पुरवठा साखळी

(७) कृत्रिम खाद्य व प्रयोगशाळेत मांस उत्पादन

(८) ३-डी : छपाई व मानवी अवयवनिर्मिती

(९) डीएनए डेटा साठवणूक, जीनोमिक्स, प्रोटिन ड्रग्स

(१०) अपारंपरिक ऊर्जा साठवणूक, सुरक्षित अणुऊर्जा

दर वर्षीप्रमाणे सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) येथील मीडिया लॅबच्या वार्षिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. एमआयटी म्हणजे जगातील संशोधनाचे माहेरघरच! जगातील अर्ध्याहून अधिक शोधांमध्ये, तसेच संशोधक घडवण्यात या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक जॉन मॅक्कार्थी हेही इकडचेच! तर.. तीन दिवसांच्या त्या कार्यक्रमात काही महत्त्वाचे विषय चर्चिले गेलेच; तसेच अमेरिकेतील उमद्या तरुण संशोधकांना (३५ वर्षांखालील) त्यांचे शोधप्रबंध मांडण्याची संधीही देण्यात आली. विशेष म्हणजे, यातील काही तरुण भारतीय वंशाचे होते! परंतु बहुतांश तरुण मात्र चिनी वंशाचे असून, भविष्यातील तंत्रज्ञानविषयक घडामोडींत वर्चस्व कोणाचे असेल, हे त्यातून ठळकपणे जाणवले. तिथे चर्चिले गेलेले विषय अर्थातच ‘उदयोन्मुख तंत्रज्ञान’ संज्ञेत बसत असल्यामुळे, त्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय; त्यातील काही ठळक मुद्दे :

(अ) कृत्रिम बुद्धिमत्तानामक तंत्रज्ञान हळूहळू सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि कुठेकुठे नकारात्मकदृष्टय़ा सर्वभक्ष्यी होत चालले आहे. एमआयटीच्या कार्यक्रमात मांडलेला प्रत्येक शोध, प्रत्येक प्रबंध हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाननामक गुरुकिल्लीला आत्मसात करून केलेला होता, असेच म्हणावे लागेल. थोडे इतिहासात डोकावायचे तर, आधी मनुष्याने शोधून काढलेल्या कुठल्याही गोष्टीत, उपकरणात एक नियंत्रणात्मक बाजू होती. अगदी जुन्यात जुना आगीचा वापर, पुढे धातूची अवजारे व हत्यारे, मग त्यापुढची प्रगत वाहने, वाफेवरील इंजिन, वीज, इलेक्ट्रॉनिक्स व संगणकही. या साऱ्यांत एक सूत्र आजपर्यंत समान होते; ते म्हणजे त्या उपकरणांना वापरण्यास/ चालवण्यास माणूस लागे, त्या यंत्रांना स्वत:ची बुद्धिमत्ता अशी नव्हती. माणसाने आपली बुद्धिमत्ता वापरून त्यांना निर्माण केले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवेशानंतर मात्र एक प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. ती म्हणजे मनुष्यानेच ज्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोरावर इथवर मजल मारली आणि पृथ्वीवरील सर्वात प्रगत, शक्तिमान, ज्ञानी प्राणी म्हणून वर्चस्व मिळवले; तीच बुद्धिमत्ता कृत्रिम पद्धतीने का होईना, आपण आपल्याच निर्मितीला बहाल करायला लागलोय.

(आ) दुसरे म्हणजे, आधीची कुठलीही यंत्रे सांगकाम्यासारखी सूचना घेणे व यांत्रिक पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करणे इतकेच काय ते करू शकत. त्यांच्यावर नियंत्रण मनुष्याच्या बुद्धीलाच ठेवावे लागे. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता बहाल करण्याआधी त्यांना माणसासारखे ‘अनुभवातून शिकणे व निर्णय घेणे’ काही जमत नव्हते.

(इ) तिसरे म्हणजे, आधीच्या सर्व यंत्रे, उपकरणांना सूचनावली काटेकोरपणे द्यावी लागे. जितके कार्य सोपे, तितकी सूचनावली सहज अन् जितके कार्य क्लिष्ट तितकीच सूचनावली गुंतागुंतीची. त्यामुळेच पूर्वी न जमलेल्या अत्यंत क्लिष्ट आणि मूलभूत नैसर्गिक कार्यामध्ये मोडणाऱ्या उपकरणांची निर्मिती जमत नव्हती, जी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शक्य झाली आहे. उदा. मानवी भाषा यंत्रांना शिकविणे!

(ई) चौथा मुद्दा सर्वात महत्त्वाचा. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपण उपकरणांच्या संगणकीय प्रणालीला दिलेल्या उदाहरणांवरून निर्माण होत असते. जशी उदाहरणे, तशी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उत्पादन. लहान मुलाला लागणारे चांगले वळण विरुद्ध वाईट सवयी त्यांनी लहानपणी अवतीभवती पाहिलेल्या प्रसंगांतून, शिकवणीतून घडत असतात. तसेच हे काहीसे! त्यातून निर्माण होतोय ‘सोशल बायस’ – म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमधील सामाजिक पूर्वग्रह.

एक अनुभव नमूद करावासा वाटतो इथे, ज्यावरून तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. एका एआय संगणकीय प्रणालीला मनुष्याची छायाचित्रे बघून त्यातील दृश्यांचे विश्लेषण करायचे होते. त्यासाठी इंटरनेटवर सापडणारी लाखो छायाचित्रे वापरली गेली. विविध देशांतील पुरुष, स्त्रिया, वांशिकता, वेगवेगळी कार्ये/ व्यवसाय करणारे, कार्यालये, घरे, निसर्ग अशा वेगवेगळ्या ठिकाणची, विविधता असणारी छायाचित्रे वापरली गेली. यातून प्राथमिक उत्पादन काय निघाले माहितीय? पाठमोरा पुरुष घरात किचनसारख्या ठिकाणी असल्यास एआय प्रणालीने ती स्त्री असावी असे दर्शविले! गडद वर्ण, श्रमदान करणारे दृश्य दाखविल्यास विशिष्ट वांशिकता दर्शविली गेली. यास कारणीभूत आहे, आपण त्या प्रणालीला दिलेली आपल्याच समाजाची छायाचित्रे- ज्यांमध्ये सामाजिक पूर्वग्रह ठासून भरला आहे आणि अर्थातच एआय अभियांत्रिकी, ज्यांनी असले सामाजिक पूर्वग्रह शिकण्यापासून त्या प्रणालीला रोखले नाही. दोषी दोनच : पहिला आपला समाज, जिथून अशी छायाचित्रे प्राप्त झाली आणि दुसरा अभियांत्रिकी गट- म्हणजे मनुष्यच! पुढेही असे हेतुपुरस्सर गैरवापर होणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ  शकणार नाही.

(उ) शेवटचा मुद्दा म्हणजे, मानवी भावना समजण्याइतपत व आपल्यासारखी सौंदर्याविष्कार, नवनिर्मिती करण्याइतपत कृत्रिम बुद्धिमत्तेची मजल अजून तरी गेलेली नाही. मात्र, पुढील २०-३० वर्षांत नक्कीच आपण तिथे पोहोचू. त्या स्थितीला ‘जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हटले जाते आणि त्याही पुढे आपल्या मानवी बुद्धिमत्तेपेक्षाही प्रगत असे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि कदाचित सर्वभक्ष्यी असे ‘सुपर-इंटेलिजन्स’!

‘वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या काही वाईट छटा असलेली उदाहरणे आपण पाहतोय. जसे- (१) डीप-फेक तंत्रज्ञान (एखाद्याचा आवाज छायाचित्र, आवाज मिळवून कृत्रिम दृक्मुद्रण बनवणे, अर्थातच त्या व्यक्तीने प्रत्यक्ष न वदलेले शब्द घुसडून चुकीचा प्रसार करण्यासाठी) (२) ‘ह्य़ुमन-जीनोमिक्स’ व ‘आर्टिफिशियल एम्ब्रीयो सिलेक्शन’चा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे गैरवापर (३) फेशियल रेकग्निशन, बायोमेट्रिक्स वापरून आणि सार्वजनिक स्थळांवर एआय कॅमेरे बसवून कोणावरही, कधीही, कुठेही पाळत आणि मग लोकशाहीचे मूलभूत हक्क विरुद्ध सत्ताकेंद्र असे द्वंद्व. याचे ताजे उदाहरण म्हणजे हाँगकाँग येथील लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारी फेशियल रेकग्निशन उपकरणांची केलेली तोडफोड.

पुढील लेखापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या खोलात शिरू या!

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com