23 February 2019

News Flash

‘नाटकशाळे’चा अर्थ!

‘लोकरंग’मधील चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘नाटक २४  ७’ या नव्या सदरातील ‘गारुड’ हा पहिला लेख (७ जानेवारी) वाचला.

‘लोकरंग’मधील चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘नाटक २४  ७’ या नव्या सदरातील ‘गारुड’ हा पहिला लेख (७ जानेवारी) वाचला. लेखात कुलकर्णी यांनी ते सायन्स कॉलेजमध्ये असतानाच्या काळाविषयी लिहिले आहे. त्यासंदर्भात ते लिहितात की, ‘बी.एसस्सी. केलं, पण उपस्थिती प्रयोगशाळेपेक्षा ‘नाटकशाळे’तच जास्त!’ येथे नाटकशाळा हा शब्द मुद्दाम वापरला आहे, हे त्यातील अवतरण चिन्हांवरून कळते. कारण ‘शब्दरत्नाकर’मध्ये या शब्दाचा अर्थ ‘नाटकगृह, नर्तकी, वेश्या’ असा दिला आहे. परंतु हा मिस्किलपणा आज किती जणांच्या लक्षात येईल हा प्रश्नच आहे. मीसुद्धा कुठल्यातरी नाटकातच हा शब्द वाचला होता आणि त्याच्या विचित्र अर्थामुळे तो सुदैवाने लक्षात आहे, म्हणूनच लेखातील या नर्मविनोदाचा आनंद घेऊ शकलो.

– रत्नाकर यादव धर्माधिकारी, कल्याण

 

सृष्टीवैभवाची जाणीव

‘लोकरंग’मधील (७ जानेवारी) मारुती चितमपल्ली यांचा ‘अद्भुतरम्य प्राणीविश्व!’ हा लेख वाचला. चितमपल्ली यांच्या ‘प्राणिकोशा’तील लिखाण वाचताना सृष्टीतील विविधरंगी वैभवाची जाणीव झाली. पतीची नोकरी वनविभागात होती. त्यामुळे वृक्ष, प्राणी-पक्षीजीवनाचा आणि जंगलाचा काही प्रमाणात परिचय पूर्वी झाला होता. आज मात्र ‘प्राणिकोशा’सारख्या ग्रंथांची गरज वाटते. कारण सध्याच्या काळात पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता अजून काही वर्षांनी नव्या पिढीला प्राणी, पक्षी, वनस्पती पुस्तकांतील छायाचित्रांतच पाहावी लागतील की काय अशी चिंता वाटते. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. जंगले व पर्यावरणाचे संवर्धन झाले तरच निसर्गवैभव टिकेल. वनवैभवासंदर्भातील चार कोश निर्माण करणाऱ्या चितमपल्लींना मन:पूर्वक धन्यवाद!

– सिमंतिनी काळे, नाशिक

 

डॉ. पंडितांच्या प्रत्युत्तरात सोयीचे मुद्दे

‘लोकरंग’मधील (२४ डिसेंबर) ‘सुरेश भट आणि..’ या माझ्या पुस्तकावरील डॉ. राम पंडित यांच्या टीकालेखावरील माझे ‘परीक्षण? की टीकालेख?’ हे प्रतिक्रियात्मक पत्र ३१ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले. या पत्राला उत्तर देणारे डॉ. पंडित यांचे पत्र ७ जानेवारीच्या अंकात वाचले. त्याबाबत..

१) ‘रसवंतीचा मुजरा’ हे शीर्षक, फिराक यांचा चुकलेला शेर, भट घराण्याची नाराजी यावर काहीही उत्तर न देता पुन्हा एकदा व्यक्तिद्वेषातून आणि सोयीचे मुद्दे घेऊन डॉ. पंडित यांनी उत्तर दिले आहे.  २) रमण रणदिवे मला १ जानेवारी २०१८ ला पुन्हा भेटले आणि एक शब्दही बोलले नाहीत. ३) ‘धर्मवीर भारती यांना ओळखत होतो’ ही दर्पोक्ती कशाला? ‘ते तसे म्हणाले नसतील,’ याचा अर्थ भट  खोटे बोलले असा होतो. भट यांचे भाऊ  आणि पत्नी जिवंत आहेत, त्यांना विचारा. पुस्तकाच्या प्रकाशनाआधी भट वहिनींसमोर या पुस्तकाचे वाचन झाले. त्यांनी कुठल्याही मुद्दय़ांवर आक्षेप घेतलेला नाही, हे मी नोंदवू इच्छितो.

४) माझ्यावरील ‘ते’ पुस्तक डॉ. पंडित यांनी काढले नसेल तर कोणते प्रकाशन आहे? मुख्य म्हणजे त्या पुस्तकावर डॉ. पंडित यांनी त्यांचे नाव का टाकले?

– प्रदीप निफाडकर

 

निफाडकरांची ‘ती’ विधाने धादांत खोटी!

‘सुरेश भट आणि..’ या पुस्तकावरील डॉ. राम पंडित यांच्या समीक्षालेखात माझ्या संदर्भात छोटासा उल्लेख आहे. शिवाय या लेखावरील प्रदीप निफाडकर यांच्या पत्रातही माझा उल्लेख आहे. त्यासाठी हा खुलासा : ‘सुरेश भट आणि..’ या प्रदीप निफाडकर लिखित पुस्तकात माझ्या तोंडी टाकलेली विधाने धादांत खोटी आहेत. ती स्वत: लेखकाची आहेत; माझी नाहीत. त्यावेळी मी भटसाहेबांना असे काहीच बोललो नव्हतो.

सदरहू पुस्तकात लेखक निफाडकरांनी आपल्यालाच कशी सुरेश भटांविषयी खडान्खडा खरी (बव्हंशी खोटीच) माहिती आहे, आणि आपणच एकमेव भटसाहेबांचे प्रतिभावान शिष्योत्तम आहोत, हे दर्शविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. स्वत:चे पराकोटीचे उदात्तीकरण या ग्रंथात असल्यामुळे कोणीतरी अशा सुमार ‘शिष्योत्तमा’चा समाचार घ्यायलाच हवा होता. ते काम डॉ. राम पंडित यांनी यथार्थपणे केले आहे.

– रमण रणदिवे, पुणे

First Published on January 14, 2018 2:34 am

Web Title: loksatta readers letter over lokrang articles 2