News Flash

पूर्णाकच्या निमित्ताने

खरं तर दत्तक प्रक्रिया समाजाने पूर्णपणे स्वीकारली तर अशा गटांची गरजच लागणार नाही.

प्रत्येक कुटुंब आणि मूल जे दत्तक प्रक्रियेशी जोडलं आहे, त्या मुलाला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मदत मिळावी यासाठी ‘पूर्णाक’ हा मदत गट मी सुरू केला.

प्रत्येक कुटुंब आणि मूल जे दत्तक प्रक्रियेशी जोडलं आहे, त्या मुलाला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मदत मिळावी यासाठी ‘पूर्णाक’ हा मदत गट मी सुरू केला. काही अनुभव मला इथे नमूद करावेसे वाटतात ज्यामुळे असं वाटतं की, समाजात अजून दत्तक या विषयासंबंधी खूप काही काम होण्याची गरज आहे. खरं तर दत्तक प्रक्रिया समाजाने पूर्णपणे स्वीकारली तर अशा गटांची गरजच लागणार नाही.

या वर्षांत आत्तापर्यंत आपण बऱ्याच जणांचा दत्तक प्रवास जाणून घेतला. या प्रवासात मलाही खूप जण भेटले आहेत. ही लेखमालिका सुरू होण्याच्या थोडे दिवस आधी ‘पूर्णाक’ हा मदतगट मी सुरू केला. उद्देश हा होता की, दत्तक प्रक्रियेतून झालेले पालक आणि मुलं एकत्र यावीत आणि एकमेकांना मदत व्हावी. या मदत गटात आज शंभरहून जास्त सदस्य आहेत. या गटाच्या अंतर्गत आमचा प्रयत्न असा आहे की, प्रत्येक कुटुंब आणि मूल जे दत्तक प्रक्रियेशी जोडलं आहे, त्या मुलाला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर इथे मदत मिळावी. या गटात पुण्याशिवाय संपूर्ण भारतामधून बरेच सदस्य आहेत, त्यांना या गटाची खूप मदत होते आहे आणि पुढेही मदत होत राहील असं वाटतं. असे मदतगट बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांनीही एकत्र येऊन काम केलं तर त्याचं परिणाम नक्कीच वेगळे दिसतील.

खरं तर दत्तक प्रक्रिया समाजाने पूर्णपणे स्वीकारली तर अशा गटांची गरजच लागणार नाही. काही अनुभव मला इथे नमूद करावेसे वाटतात ज्यामुळे असं वाटतं की, समाजात अजून दत्तक या विषयासंबंधी खूप काही काम होण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही मदतगट सुरू केला. शाळेमध्ये मुलांना जेव्हा कुटुंबाची ओळख करून दिली जाते, तेव्हा आई म्हणजे ‘जिच्या पोटातून आपण जन्म घेतो तीच व्यक्ती.’ ही व्याख्या जरी योग्य वाटत असली तरी त्या वर्गात दत्तक प्रक्रियेमधून आलेल्या मुलाच्या मनात खूप मोठा संभ्रम निर्माण करणारी ठरली. मी एका संस्थेतील कार्यकर्तीसोबत बोलत होते, त्यावेळेस तिने तिचा एक अनुभव सांगितला, ‘‘सहा वर्षांचा मुलगा, जो दत्तक प्रक्रियेतून घरी आला. त्याला पूर्ण सत्य माहीत आहे. शाळेमधून वर सांगितली तशी कुटुंबाची व्याख्या कळली आणि घरी आल्यावर तो आईशी तुटकपणे वागू लागला, इतका की त्याला तिचा स्पर्श परका वाटू लागला. माझी ‘आई’ ही नव्हे, असं त्याला वाटू लागलं. घरच्यांना कळेना, याला झालं तरी काय? वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याशी बोलल्यावर थोडासा उलगडा झाला. लगेच पालक त्याला संस्थेत घेऊन आले. मुलगा वयाच्या मानाने खूप समंजस आहे, शिवाय तो व्यवस्थित भावना व्यक्त करू शकणारा वाटला. त्याला जेव्हा डोळे बंद करून ‘तुला बाबा म्हणून कोण दिसतं? आई म्हणून कोण दिसतं?’ असं विचारलं तेव्हा त्याला आई म्हटलं की फक्त अंधार आणि कुणी तरी पुसटशी एक व्यक्ती दिसली. थोडय़ा वेळाने त्याच्याशी पुन्हा बोलले तेव्हा म्हणाला, ‘‘आई म्हणून मला माझी हीच आई दिसते आहे.’’ सगळ्यांचा जीव भांडय़ात पडला. घरी जाताना तो मुलगा म्हणाला, ‘मावशी, मला तुझ्याशी बोलून छान वाटलं.’’ खरंच इतक्या कोवळ्या वयात असे अनुभव यावेत का मुलांना? ‘कुटुंब हे दोन प्रकारे पूर्ण होत असतं, पालक आणि त्यांची जैविक मुलं तसेच पालक आणि दत्तक प्रक्रियेतून घरी आलेली मुलं.’ इथे पालक हा शब्दही खूप महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक मुलाच्या घरी आईबाबा असतातच असं नाही. आज आपल्या आजूबाजूला किती तरी एकल पालक आपण बघतोच. थोडासा भावनिक विचार करून आपण बोललो तर मुलांना लहान वयात नको ते अनुभव येणार नाहीत. इथे मला गरज वाटते ती समाजात आणि शाळेत दत्तक प्रक्रियेबद्दल संवेदनशीलता निर्माण होण्याची!

एका मुलीला तिच्या पालकांनी तिच्या दत्तक प्रक्रियेबद्दल कधीच सांगायचं नाही असं ठरवलं. घरात तिचा मोठा भाऊ  जैविक प्रक्रियेतून आलेला. पालकांनी कधीही कुठेही भेदभाव असा केला नाही आणि करतही नाहीत. परंतु किशोरवयात त्या मुलीला बाहेरून कळलं, ‘तू दत्तक आहेस या घरात, म्हणून तुझे आईबाबा तुला वेगळी वागणूक देतात. दादाला जे हवं ते मिळतं परंतु तुला मात्र नाही, कारण तू दत्तक आहेस ना!’ ही मुलगी अजूनही भावनिक कल्लोळात आहे. आईबाबा हतबल आहेत. ही मुलगी भावाशी अजिबात बोलत नाही, उलटपक्षी सारखी भांडत असते. आईबाबांशी कुठलाही मतभेद झाला की एवढं मात्र ती नेमकं बोलते, ‘मी दत्तक आहे ना म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागता.’ खरंच त्या शेजाऱ्यांना काय मिळालं तिला सत्य सांगून? कशासाठी आपण काही गोष्टी स्वत:पुरत्या मर्यादित ठेवत नाहीत. का आपण कुणाच्या आयुष्यात अशी वादळं आणायला कारणीभूत होतो? फक्त एकदा असं कुत्सितपणे बोलणं संपूर्ण कुटुंबाला हानी पोचवत असतं, हे त्यांच्या लक्षात तरी येतं का?

किशोर वयातील मुलांशी बोलताना मला नेहमीच जाणवतं, त्यांना आईबाबा किंवा नातेवाईकांकडून कधी तरी ऐकायला मिळतं, ‘पोटच्या मुलापेक्षा आम्ही तुझ्यासाठी जास्त करतो’, ‘तुझ्या सवयी आनुवंशिकतेमुळं आल्या असतील’, ‘कुठलं रक्त, कुठली जनुकं आहेत देव जाणे!’ अशा भावना, अशा प्रतिक्रिया यामुळं मुलांच्या मनात केवढा न्यूनगंड निर्माण होत असेल, याची आपण सगळे कल्पनाही करू शकत नाही. मी नेहमीच सांगते, ‘दोघं नवराबायको कैक वर्ष आनंदानं एकत्र राहतात, काय जनुकीय संबंध असतो यांचा? मग फक्त दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांना का जनुकीय संबंधांबद्दल बोललं जावं? किशोर

वयात तसंही स्वत:च्या अस्तित्वाबद्दल मनात चलबिचल चालू असते, त्यात दत्तक प्रक्रिया आणि आपल्या जिवाभावांच्या लोकांकडून अशा प्रतिक्रिया आल्या की काय होत असेल या मुलांच्या भावनांचं?

थोडसं अजून पुढल्या वयोगटातील मुलांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत बोललं की वेगळे प्रश्न दिसतात. सध्या माझ्याकडं किमान आठ-दहा जणांनी तरी दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांच्या लग्नासाठी म्हणून फोन केले आहेत. सगळ्यांचा अनुभव जवळपास सारखाच.. लग्नासाठी म्हणून स्थळं बघायला सुरुवात केली आणि जेव्हा दत्तक प्रक्रियेतून आमची मुलगी किंवा मुलगा आला आहे असं सांगितलं की बघायलासुद्धा येत नाहीत. मला इथे अजिबात म्हणायचं नाही की, या मुलांची लग्नं होत नाहीत किंवा सगळ्यांनाच हा त्रास होतो, परंतु बऱ्याच जणांना हा अनुभव येतो आहे म्हणून इथे नमूद करावसं वाटलं. आजकाल दत्तक प्रक्रियेतून बाळ घरी आलं की सगळेच नातेवाईक, आजूबाजूचे लोक सगळेच कौतुक करताना दिसतात. परंतु हीच मुलं लग्नायोग्य झाली की वेगळ्याप्रकारे बघितलं जातं मग आधीच्या कौतुकाला काही अर्थ राहतो का बरं? जर मला माझ्या कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांना मी स्वीकारू शकत नसेन तर त्या बाळांचं कौतुक करून काय साध्य होतं? हे प्रत्येकाने एकदा नक्की तपासून बघावं.

या आणि अशा अनेक कारणांमुळं ‘पूर्णाक’ मदत गट सुरू करावासा वाटला आणि त्याचा बऱ्याच पालकांना आणि मुलांना उपयोग होतो आहे हे दिसतंय. असे मदत गट वेगवेगळ्या शहरात असावेत म्हणून ‘पूर्णाक’ला एक आकार द्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे.

या गटात आम्ही उपगट तयार केले आहेत. प्रत्येक उपगट हा ठरावीक बाबींवर काम करेल. हे उपगट असे आहेत :

१. पहिला उपगट आहे तो म्हणजे ज्यांची मुलं सहा वर्षांच्या आतील आहेत अशा पालकांसाठी. या गटाच्या अंतर्गत, ‘पालकांनी दत्तक प्रक्रियेबद्दल मुलांशी कसा संवाद साधायचा?’, ‘दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांसाठी पोषक आहार कसा असावा?’, ‘मुलांच्या वाढीचे टप्पे व त्यासंदर्भातील शंकानिरसन करणे’, ‘समाजात आणि शाळेमधून दत्तक प्रक्रियेविषयी संवेदनशीलता निर्माण करणे’.

२. दुसरा उपगट आहे तो म्हणजे ज्यांची मुलं शालेय वयोगटात आहेत अशा पालकांसाठी. या गटाच्या अंतर्गत पालकांना, ‘मुलांना दत्तक प्रक्रियेविषयी संपूर्ण जाणीव करून देणे आणि ते स्वीकारून योग्य दिशेने वाटचाल करणे’, ‘या वयातील मुलांचे शारीरिक आणि मानसिक पातळीवरील बदल भावनिकपणे जोपासणे’, ‘समाजात आणि शाळेमधून दत्तक प्रक्रियेविषयी संवेदनशीलता निर्माण करणे’, ‘त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे’.

३. तिसरा उपगट आहे तो म्हणजे २० वर्षांपुढील मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी. या गटाच्या अंतर्गत मुलांना त्यांच्या करियरसाठी मदत तसेच लग्नासाठी मार्गदर्शन आणि मदत करणं.

या सगळ्या उपक्रमांमध्ये ज्यांना जिथे मदत करता येईल असे वाटते त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. मला विश्वास आहे आपण सगळे मिळून हे काम पुढे नेऊ.

दत्तक प्रक्रिया ही खरंच एक नाममात्र प्रक्रिया असून या मुलांना दया, कीव, तिटकारा या कुठल्याच भावनांना सामोरं जावं लागणार नाही याची खबरदारी घेऊ या.

संगीता बनगीनवार sangeeta@sroat.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 1:01 am

Web Title: support groups to bring adoptive father and children together
Next Stories
1 मातृत्वाचं आगळं दातृत्व
2 जागवलेला स्वाभिमान
3 एक स्तुत्य निर्णय
Just Now!
X