पालघर : राज्य सरकारने अकरावी इयत्तेत प्रवेशासाठी राज्यभरात ऑनलाइन प्रक्रिया अनिवार्य केली असून ग्रामीण भागात ऑनलाइन फॉर्म भरण्यास असणाऱ्या सोयी सुविधांची मर्यादा, पालकांचे अज्ञान तसेच फॉर्म भरण्यासाठी असणाऱ्या व्यवस्थेमधील त्रुटींच्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील किमान १० हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शालांत परीक्षेत पालघर जिल्ह्यातून ६३ हजार ६१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६० हजार ६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेल्या ४८ हजार ९५७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४७ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीतील वैयक्तिक माहिती असणाऱ्या प्रथम भागाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आश्रम शाळेची विद्यार्थ्यांना थेट अकरावी प्रवेश दिला जात असून शालांत परीक्षा झालेले काही विद्यार्थी पदविका अभ्यासक्रम, आयटीआय व इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत असतात. अशा विद्यार्थ्यांची एकंदर संख्या तीन हजार च्या जवळपास असून ग्रामीण भागातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणीच केली नसल्याचे दिसून आले आहे.
ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेशिका भरताना शिक्षण विभागाने अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करणारा व्हिडिओ प्रकाशित केला होता तसेच प्रत्येक शाळेत पालक सभेचे आयोजन करून याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बहुतांश पालक हे अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असल्याने तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतःकडे संगणक किंवा इतर व्यवस्था नसल्याने नीम शहरी भागातील खाजगी सायबर कॅफे, एमएससीआयटी क्लास अथवा इतर व्यवस्थेतून अर्ज भरण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामीण भागात इंटरनेटच्या सलगतेचा व त्याचा वेग बाबत असणाऱ्या समस्येसोबत खंडित होणाऱ्या वीज प्रवाह मुळे अकरावी प्रवेश अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय अर्ज भरणारे खाजगी सायबर कॅफे व इतर ऑपरेटर हे योग्य पद्धतीने प्रशिक्षित नसल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत कॉलेजचे प्राधान्य दर्शवणारा भाग दुसरा “लॉक” करण्याचे त्यांच्याकडून नकळत पणे राहिले होते असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते.
परिणामी अकरावी प्रवेशाच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचे नाव न झळकल्यास तो पुढच्या यादीच्या प्रसिद्ध होण्याच्या प्रतीक्षेत राहिला. प्रत्येक यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागावरील “लॉक” असणारा महाविद्यालय अग्रक्रमाचा भाग पुन्हा खुला होत असल्याची माहिती अशा दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या मनतील प्रवेशाबद्दलचा संभ्रम कायम राहून ते पुढच्या यादीत आपला प्रवेश निश्चित होईल याच्या प्रतीक्षेत राहिले.
तिसऱ्या यादीनंतर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अशा विद्यार्थ्यांनी धावपळ सुरू केली. मात्र प्रवेश मिळवण्यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक मार्गदर्शनापासून ते वंचित राहिल्याचे दिसून आले आहे.
अकरावी प्रवेशाची चौथी यादी प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये प्रवेशिकेच्या लॉक केलेल्या ३६७१६ अर्जांपैकी पैकी १७९५४ विद्यार्थ्याला प्रवेश घेतला असून इतर ४४२४ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विशेष कोटा मधून ऍडमिशन मिळवली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या ४८९५७ अर्जांपैकी फक्त २२३७८ विद्यार्थ्याला (४५.७१ टक्के) प्रवेश मिळाला असून उर्वरित विद्यार्थी प्रवेशासाठी विशेष फेरीच्या आशेवर बसले आहेत. या अखेरच्या टप्प्याच्या प्रवेश फेरीमध्ये नव्याने अर्जाचा दुसरा भाग लॉक करणे आवश्यक असून असे अर्ज योग्य प्रकारे ऑनलाइन पद्धतीने सादर झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल अशी स्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या संदर्भात विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली असून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी विशेष मार्गदर्शना कक्षांची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध
शालांत परीक्षांमध्ये ६० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी पालघर जिल्ह्यातील १४२ कला विभागाच्या, १९१ वाणिज्य विभागाच्या व १५८ विज्ञान विभागाच्या अशा ४९१ महाविद्यालयांमधून ६५ हजार ३९० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची क्षमता आहे. यापैकी १५३०५ विद्यार्थ्यांना कला शाखेत, २८३०० विद्यार्थी वाणिज्य शाखेत तर २१७८५ विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश देण्याची जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमता असल्याचे शिक्षण विभागाकडून माहिती प्राप्त झाली आहे.
अनुदानित विनाअनुदानित तुकड्यांचा गोंधळ
अप्रशिक्षित सायबर कॅफे ऑपरेटर यांच्या अज्ञानामुळे अनेकदा चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यां चे अर्ज अनुदानित तुकडी मध्ये भरण्याऐवजी विनाअनुदानित तुकड्यांमध्ये भरण्यात आल्याने व अशा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाल्याने ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात शुल्क भरण्याची परिस्थिती वडावली आहे. या गोंधळाच्या वातावरणामुळे अनेक पालकांना आर्थिक भुर्दंड बसणार असून ग्रामीण भागात अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवेश अर्जांचा तपशील
अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग एक पूर्ण न केलेल्या (लॉक न केलेल्या) विद्यार्थ्यांची संख्या : १३१०
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत भाग एक पूर्ण भरून दुसरा भाग लॉक न करता खुला ठेवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : १०,९३१
प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या भाग दोन लॉक न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : १२२४१
दहावीत उत्तीर्ण होऊन अकरावी प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ११७२३
अकरावी प्रवेशाबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिक्षण विभागातर्फे अशा विद्यार्थ्यांचे व पालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले असून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी खबरदारी घेतली जाईल. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर