पालघर : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करत पालघर जिल्हा परिषदेने विकल्प विपरीत व आंतर जिल्हा बदलीचे शिक्षकांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव मंजूर करून त्यांना कार्यमुक्त केले आहे. यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत १८.२२ टक्के शिक्षकांची पद रिक्त असून आगामी काळात समायोजनाद्वारे कोणत्याही शाळेत पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची संख्या कमी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यात २११० जिल्हा परिषद शाळा असून ३२९ मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठी ६६७१ पदांना मंजुरी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने तसेच ग्रामीण भागात शिक्षकांची संख्या कमी असल्याने विकल्प विपरीत व आंतर जिल्हा बदली संदर्भात प्रस्ताव जिल्हा परिषदेने नामंजूर केले होते. या संदर्भात काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने विकल्प विपरीत शिक्षकांसंदर्भात असलेल्या याचिकेवर ५ मे २०२५ रोजी तर आंतरजिल्हा बदली संदर्भात १५ जुलै २०२५ रोजी निकाल देताना बाधित शिक्षकांच्या मानसिकतेचा व त्यांच्यावर होणाऱ्या परिणामाचा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज असून अशा शिक्षकांची बदली करून त्यांना वेळीच कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पालघर जिल्हा परिषदेने २२१ विकल्प विपरीत व आंतरजिल्हा बदलीची मागणी केलेल्या ४०४ शिक्षकांना अनुक्रमे जून पूर्वी व २९ ऑगस्ट रोजी कार्यमुक्त केले.

सध्या जिल्ह्यात ४१५४ शासकीय सेवेतील शिक्षकांसह पेसा विभागात दरमहा १६ हजार रुपये मानधनावर काम करणारे ५८७ शिक्षक तर कंत्राटी पद्धतीने दरमहा २० हजार मानधन तत्वावर काम करणाऱ्या ४८० असे एकूण ५२२५ शिक्षक काम करत आहेत. जिल्ह्यात मंजूर असलेल्या पदांपैकी १८.२२ टक्के शिक्षकांच्या जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी जिल्ह्यात १० टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांची पद रिक्त ठेवू नये अशा प्रकारचा शासन निर्णय जारी केला होता. मात्र या निर्णयातील प्रमुख अटींना नंतर शिथिलता देण्यात आली होती. या शिथीलतेच्या आदेशाच्या आधारे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेने पूर्ण केल्या आहेत.

विज्ञान गणित शिक्षकांची वानवा

पालघर जिल्ह्यात २०२३- २४ च्या पटसंखेच्या आधारे ४९८ गणित व विज्ञान पदवीधर शिक्षकांची पद रिक्त होती. गेल्या काही महिन्यात यापैकी ९७ पदांवर नव्याने नेमणूक केली असली तरी जिल्ह्यात अजूनही ४५० गणित व विज्ञान शिक्षकांची पदरी रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. तालुक्यामधील शिक्षकांच्या समायोजनाद्वारे हंगामी बदलायचे अधिकार गटविकास अधिकारी यांचे असून जिल्ह्यात एकही शून्य शिक्षकी शाळा नसल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांनी पत्रकारांना सांगितले. ३० पट संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या काही शाळांमध्ये सध्या एक शिक्षक कार्यरत असले तरीही उपलब्ध शिक्षक व विद्यार्थी पटसंख्या यांचा समतोल राखला जाईल असे सोनाली मातेकर यांनी पुढे सांगितले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या पदांची संख्या कमी असल्याचे सांगून पदभरतीसाठी प्रयत्न केले जातील असे त्या पुढे म्हणाल्या.