पालघर : पालघर जिल्ह्यात जव्हार, डहाणू व पालघर येथील नगर परिषदांसह वाडा, विक्रमगड, तलासरी व मोखाडा या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी पालघर, वाडा व जव्हार येथील मुख्याधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे या शहरांमधील विकासकामांवर परिणाम झाला आहे.

जव्हारचे मुख्य अधिकारी प्रसाद बोरकर तसेच पालघरच्या मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांची बदली झाल्यानंतर या दोन्ही पदांचा कार्यभार डहाणूचे मुख्याधिकारी वैभव आवारे सांभाळत आहेत. तत्पूर्वी डहाणूचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे निधन झाल्यानंतर आवारे यांच्याकडे या जागेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सागर साळुंके यांची ऑगस्ट २०२० मध्ये बदली झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार जव्हार किंवा अन्य ठिकाणच्या मुख्याधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्याचबरोबरीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासकीय अधिकारी पदाची जागासुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्याचा अतिरिक्त कार्यभार वसई येथील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगर परिषदेकडे विविध योजनेअंतर्गत निधी येत असून विकासकामांना गती व यासाठी प्रस्तावांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी तयारी करून त्यांची मंजूर करून घेणे महत्त्वाचे असते. शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष देणे तसेच शहरात अतिक्रमण रोखण्यासाठी पावले उचलली अशा अनेक बाबींकडे लक्ष देण्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील चार महत्त्वाची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील विकास काही अंशी खुंटला आहे.