वाडा : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू राहणार असून जिल्ह्यातील सर्व शाळांतील दहावीमधील एकूण ६० हजार १६३  विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. गुरुवारी झालेल्या मराठी या पहिल्या विषयाच्या पेपरला जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांचा कडक बंदोबस्तात या परीक्षा होत आहेत. 

 माध्यमिक शालांत परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात ६४ परीक्षा केंद्रांवर ३४ हजार ९७२ सर्वाधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पालघरमध्ये १५ परीक्षा केंद्रांवर ८३२० विद्यार्थी, डहाणू नऊ परीक्षा केंद्रांवर ४५६३ विद्यार्थी, तलासरी सात परीक्षा केंद्रांवर ४१७४, मोखाडा चार परीक्षा केंद्रांवर १९९२, जव्हार चार परीक्षा केंद्रांवर १७८६, विक्रमगड सहा परीक्षा केंद्रांवर २२७५, तर वाडा सात परीक्षा केंद्रांवर २८८१ असे एकूण ११६  परीक्षा केंद्रांवर ६० हजार १६३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा पुर्वी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याने सर्वत्र शांततामय वातावरणात परीक्षा सुरु झाली आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संगिता भागवत यांनी दिली.

वसईतून ३४ हजार ९७२ विद्यार्थी

वसई तालुक्यातून ३४ हजार ९७२ इतके विद्यार्थी यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. २५ मार्चला दहावीचा अखेरचा पेपर असणार आहे. ही परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे वसईतील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी नियोजन आखण्यात आले आहे. वसईत ६४ परीक्षा केंद्राच्या ठिकाणी ही लेखी परीक्षा प्रक्रिया पार पडणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. परीक्षा कालावधीमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक ठेवण्यात आले आहे. तर दोन भरारी पथके ठेवण्यात आली आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन देऊन शुभेच्छा देण्यात आल्याचे चित्र वसईत पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातग्रस्त विद्याथी परीक्षा केंद्रावर

वाडा तालुक्यातील मौजे सोनाळे माध्यमिक शाळेचा विद्यार्थी सचिन सुरेश चौधरी याचा तीन दिवसांपूर्वी दुचाकीवरून प्रवास करताना मोठा अपघात होऊन हात मोडला आहे. हा विद्यार्थी रुग्णालयातूनच थेट वाडा येथील पां.जा. विद्यालयातील परीक्षा केंद्रांवर हजर झाला व त्याने लेखनिकाच्या मदतीने पहिला पेपर दिला. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्गखोली, स्वतंत्र पर्यवेक्षक व  नवव्या इयत्तेत शिकणारा एक विद्यार्थी लेखनिक म्हणून परीक्षा मंडळाच्या परवानगीने दिला असल्याचे येथील परीक्षा केंद्र संचालक हरी जोगी यांनी सांगितले.