डहाणू : पालघर जिल्ह्यात नव्याने तयार झालेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग सुरू होण्याआधीच या मार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवार १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून डहाणू पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गावर गंजाड गावच्या हद्दीत हा अपघात घडला असून अतिवेगात वाहन चालवत असताना नियंत्रण सुटल्यामुळे वाहन दुभाजकाला धडकून उलटून अपघात झाला आहे. अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वाहन वेग खूप जास्त असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महामार्गावर काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात पाठवत याविषयी डहाणू पोलिसांना माहिती दिली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
द्रुतगती मार्गाचे काम सुरू असल्यामुळे येथून कंपनीच्या वाहनांना ये – जा सुरू असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवला जातो. परिसरातील प्रवासी याचा गैरफायदा घेत महामार्गावरून प्रवास करत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. तसेच महामार्गावर कोणतीही वाहने नसल्यामुळे खुल्या मार्गावरून भरधाव वेगात वाहने प्रवास करत असून अनेक. वेळा छोटे अपघात घडल्याचे समोर आले आहे.