रानडुकराच्या शिकारीसाठी गेलेल्या एका समूहाकडून वन्यप्राणी समजून आवाजाची चाहूल लागलेल्या दिशेने गोळीबार झाला आणि त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. यापूर्वी रानडुकरांचा अटकाव करण्यासाठी कुंपणाला लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे पालघर शेगाव व नंडोरे येथील दुर्घटनांमध्ये एकूण चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रानडुकरांपासून संरक्षण अथवा शिकारी निमित्ताने झालेल्या दुर्घटनांमुळे पालघर तालुका पुन्हा चर्चेत आला आहे.

रानडुक्कर हा संरक्षित वनप्राणी असून त्याच्या शिकारीवर निर्बंध आहेत. त्याचबरोबर या प्रजातीची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने गेल्या काही वर्षांत पालघर व डहाणू तालुक्यात रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रानडुकरांचा कळप एखाद्या वाडीत किंवा शेतात शिरल्यानंतर संपूर्ण शेती बागायतीचे काही क्षणातच नुकसान केले जाते. रानडुकरांच्या कळपापासून बागायची क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना नसल्याने नाइलाजाने शेतकरी कुंपणावर विद्युत प्रवाह सोडण्याचा प्रकार करतात. अशाच एका प्रकारामुळे नंडोरे व शिगाव येथे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या वर्षी चौघांचा विद्युत झटका लागून मृत्यू झाला होता.

भोजनाकरिता शिकार करणे हा आदिवासी बांधवांचा नित्यक्रम राहिला आहे. बेचकीच्या साह्याने वेगवेगळे पक्षी वेळप्रसंगी ससे मारून त्याची भाजी करून सेवन केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात शिकारीच्या छंदाची आवड सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सागरी व डोंगरी भागातील नागरिकांचे शिकारी समूह तयार झाले असून त्यांच्या मार्फत जंगलात शिकार केली जाते.

पूर्वी परवानाधारक बंदूक मालक स्थानिकांच्या मदतीने शिकारीसाठी जात असत. त्यावेळी दिशा दाखवण्यासाठी तसेच प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोताकडे येण्याजाण्याच्या रस्त्याची माहिती देण्यासाठी ‘खोड्या’ (स्थानिक माहितीगार)ची गरज भासत असते. काही समूह गावठी कट्ट्याच्या माध्यमातून शिकारीला जातात.

बोरशेती येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या एका प्रकारात समूहात उशिराने दाखल होणाऱ्या एका सदस्याला जंगली जनावर समजून त्याच्या साथीदारांकडूनच त्याच्यावर झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. ही बाब संबंधितांनी आठ दिवस लपवून ठेवली. विशेष म्हणजे या दुर्घटनेत आणखी एक सहकारी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त पुढे आले होते. मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचे गूढ कायम राहिले. ही दुर्घटना घडण्यापूर्वी या शिकारी समूहाने दोन रानडुकरांची शिकारी केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पालघर पोलिसांकडून जनसंवाद मोहिमेंतर्गत अनेक उपयुक्त कामे झाली असून पोलीस व जनतेत सुसंवाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीतदेखील पोलिसांची बीटअमलदार, पोलीस पाटील व गुप्तचर यंत्रणेला या घटनेची माहिती मिळण्यास आठवड्याचा विलंब झाल्याचे दिसून आले आहे. बोरशेती प्रकरणात पकडलेल्या आरोपींकडे तीन गावठी कट्टे सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून इतर सदस्यांनी त्यांच्याकडील हत्यारांची जंगलातच विल्हेवाट लावली असे सांगितले जात आहे.

जंगलातील पक्षी, ससे, रानडुक्कर, हरिण यांसारख्या वन्यजीवांची शिकार करण्याच्या छंदावर वन विभागाने दक्षता घेणे आवश्यक असून फास लावून वन्यप्राणी पकडण्याचा प्रकारदेखील नियंत्रणात आणणे गरजेचे झाले आहे. गावठी कट्ट्याचा वापर सध्या शिकारी पुरता मर्यादित असला तरी पुढील काळात त्याचा चोरी, दरोडे, मारामारी दरम्यान वापर होऊ शकतो. त्या दृष्टीने अशा विनापरवाना शस्त्र साठ्यांवर लक्ष ठेवणे व कारवाई करणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवैध गावठी कट्ट्यांची संख्या लक्षणीय

सद्य:स्थितीत पालघर तालुक्यातील बोरशेती, किराट, रावते, आकोली, शिगाव, आंबेदे, सोमटा, वाडाखडकोना, बऱ्हाणपूर, नानिवली अशा जंगलपट्ट्यात ५०० पेक्षा अधिक विनापरवाना गावठी कट्टे, बंदूक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे गावठी कट्टे १० ते १५ हजार रुपयात सहज मिळत असून त्यांचा आकार लहान असल्याने ते जंगलात घेऊन जाणे सोपे होत आहे. त्या पलीकडे जाऊन तीन भागांमध्ये उपलब्ध होणाऱ्या स्वदेशी बंदुका सहजगत उपलब्ध होत असून जंगलाच्या ठिकाणी जाऊन त्याचे भाग एकत्रित करून थ्रेड बॅरेल पद्धतीच्या बंदूकांद्वारे शिकार केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा शिकारीसाठी परवानाधारक व्यक्तीकडून गोळ्या उपलब्ध करून द्यायच्या व शिकार करण्याची पद्धती प्रचलित झाली आहे. या वाढणाऱ्या विनापरवानाधारी बंदुकीच्या प्रमाणावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तसेच वनविभागाने सतर्क होणे गरजेचे आहे.