बांधकाम नसलेल्या विहिरींची कामे रद्द करण्याचा घाट
पालघर: वाडा तालुक्यातील १६ विहिरींचे काम झाले नसल्याची बाब समोर आली होती. ठेकेदारांनी ही कामे न केल्यामुळे ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी ही कामे रद्द करण्याचा घाट पाणीपुरवठा विभागाने घातला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग या ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. आजतागायत या ठेकेदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
वाडा तालुक्यातील सोळा विहिरींची कामे २०१६ ते २०१८ या वर्षांत त्या विविध ठेकेदारांकडून बांधण्यात येणार होत्या. मात्र त्या बांधल्या नसल्याने या कामाची चौकशी करून तसा अहवाल पाठवण्याचे पत्र जिल्हा कार्यालयाने वाडय़ाच्या उपविभागीय कार्यालयाला पाठवले होते. जिल्हा कार्यालयाच्या पत्राच्या अनुषंगाने उपविभागीय कार्यालयाने या सर्व कामांची चौकशी करून तसा अहवाल पुन्हा जिल्हा कार्यालयाकडे पाठवला.
हा अहवाल पाठवताना वाडय़ाचे उपअभियंता यांनी काय चौकशी केली? कशासाठी कामे बंद राहिली? आदी बाबींची सविस्तर चौकशी अपेक्षित असताना दोन पाने अहवाल पाठवून ही कामे रद्द करावी, ठेकेदारांवर कारवाई करावी, असे सांगण्यात आले. कामांची नावे व ठेकेदारांची नावे लिहून सभापत्र जोडलेले आहे. यावरून वाडय़ाचे उपविभागीय अभियंता हेही या प्रकरणांमध्ये सामील असल्याचे सांगितले जाते. २०१६ पासून या कामांना आदेश दिल्यानंतरही २०२२ पर्यंत यापैकी बारा गावांमध्ये आजतागायत विहिरींचे काम सुरू झालेले नाही.
सविस्तर अहवाल का जोडला नाही, अशी विचारणा पवार यांना केल्यानंतर त्यांनी वेगवेगळी कारणे तोंडी सांगितली. मात्र तसा कोणताही चौकशी अहवाल त्यांनी पाठवलेल्या अहवालासोबत जोडला नाही. याउलट जिल्हा कार्यालयाने पत्र पाठवल्यामुळे आम्ही चौकशी करून तसा अहवाल परत त्यांच्याकडे पाठवल्याचे उत्तर त्यांनी दिले. या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतरही उपविभागीय पाणीपुरवठा विभागाचा अहवाल अजूनही प्राप्त झाला नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे यांनी सांगितले व या प्रकरणात पाहतो, असे सांगून अधिकचे बोलणे टाळले.
२०१६ ते २०१९ पर्यंतची न झालेली कामे
मौजे शेलेपैकी हाडळपाडा, मौजे वाघोटे, मौजे शेलटे, मौजे कळंभई गावठाण, मौजे असनसपैकी नाडेबांध, मौजे पोषेरीपैकी दुमडा पाडा, बिलघरपैकी रायात पाडा, वसराळेपैकी जांभूळपाडा, कुयलूपैकी तोरणे िधडेपाडा, विलकोसपैकी घाटाळ पाडा, ढांढरपैकी मोर पाडा, मोजपैकी कातकरी वाडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर बांधणे ही कामे घेण्यात आली होती, तर कुयलूपैकी चेंदवली गावठाण व वसराळेपैकी कडूपाडा व नवापाडा, अंबरभोईपैकी गांद्याचा पाडा ही कामे जलयुक्त शिवारमधील आहे. २०१६ ते २०१९ पर्यंतची ही कामे झालेली नाहीत.
