प्रत्येक तालुक्यात करोना काळजी केंद्र कार्यान्वित करणार

पालघर : पालघर जिल्ह्यातील करोना रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. तरीही जिल्ह्यातील करोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक करोना काळजी केंद्र (सीसीसी) कार्यरत करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईलगतच्या वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात करोना रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणात झाली असून जिल्ह्यात सध्या १०८० नागरिक करोनावर उपचार घेत आहेत. मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजाराची बाधा अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. गर्दीच्या रेल्वे गाडय़ांमधून प्रवास करताना आजाराचा अधिक प्रमाणात प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रतिजन चाचणी केंद्र उभारण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. प्रवाशांनी किमान आठवडय़ाला एकदा प्रतिजन चाचणी करून घेण्याचे नियोजन केले जात आहे.

जिल्ह्यात सध्या एक ते सव्वा लाख प्रतिजन चाचणी संच उपलब्ध असून नव्याने प्रतिजन चाचणी संच खरेदी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. अधिक प्रमाणात बाधित असणाऱ्या तालुक्यांमधील खासगी डॉक्टरांकडे प्रतिजन चाचणीचे संच देऊन त्यांच्यामार्फत आजाराचे निदान लवकर करण्यासाठी आखणी केली जात आहे. सध्या जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी मर्यादित सुविधा असून काही खासगी व सेवाभावी संस्थांच्या रुग्णालयांमध्ये आरटीपीसीआर तपासणी करण्याची सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोणतेही करोना काळजी केंद्र (सीसीसी) सुरू नसून तालुक्यात अशा प्रकारचे किमान एक केंद्र कार्यरत करण्याच्या सूचना संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आगामी काळात आजाराची तीव्रता वाढल्यास प्राणवायूची रुग्णांना गरज भासल्यास त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची तयारी करण्यात यावी, असेदेखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांसाठी ८० हजार औषधांचा साठा उपलब्ध असून एकंदर आजाराच्या संक्रमणाचा दर पाहता नव्याने गोळय़ा उपलब्ध होण्याचे  कामदेखील हाती घेण्यात आले आहे. एकीकडे लसीकरण वेगवेगळय़ा केंद्रात सुरू असून १५ ते १८ वयोगटातील तरुणांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये लसीकरणाच्या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याबरोबरीने लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी प्रत्यक्षात सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून लाभार्थ्यांची संख्या निश्चित झाल्यावर जिल्ह्यातील लसीकरणाच्या टक्केवारीमध्ये सुधारणा होईल असे अपेक्षित आहे.

सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात

जिल्ह्यात सर्वत्र आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी जाऊन सर्वेक्षण हाती घेण्यात येणार असून गावात राहत असणाऱ्या नागरिकांची संख्या, लसीकरणासाठी पात्र नागरिक संख्या, अंशत: लसीकरण व लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या, सहव्याधी असणाऱ्या नागरिकांची संख्या, तसेच वर्धक लसमात्रा घेण्यासाठी पात्र ठरत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या याचा अभ्यास केला जात असून या सर्वेक्षणानंतर लसीकरणाबाबत व्यापक मोहीम हाती घेण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.