पालघर: प्रथम श्रेणी डब्यातून पालघर रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशाकडे तिकीट नसल्याने तिकीट तपासनीस आणि प्रवाशामध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याबाबत दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असला तरी पालघर रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नक्की चुकी कोणाची याचा उलगडा होऊ शकला नाही.
वसई येथील रहिवासी राकेश तिवारी हे पालघर असा रेल्वेने प्रवास करत असतांना दुपारी साडे बारा ते एक वाजताच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकात गाडी दाखल झाली. यावेळी राकेश तिवारी हे प्रथम श्रेणी डब्यातून उतरलेल्याचे महिला तिकीट तपासनीस यांनी पाहिले. महिला तिकीट तपासनीस यांनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला असता प्रवासी त्यांना धक्का देऊन पुढे गेल्याचे महिला तपासनीस यांनी माहिती दिली.
पुढे काही अंतरावर उभ्या असलेल्या पुरुष तिकीट तपासनीस यांने प्रवाशाला थांबवून तिकीटबाबत जाब विचारण्यासाठी व चलन भरण्यासाठी कार्यालयात घेऊन गेले. यावेळी प्रवासी राकेश तिवारी आणि पुरुष तिकीट तपासनीस यांच्या मध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. या मारामारीत प्रवाशाच्या खालच्या चार दातांना, जबड्याला व छातीवर दुखापत झाली. तर प्रवाशाने टीसी याच्या उजव्या हाताच्या बोटाला देखील चावा घेतला असल्याने दोघांवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
याबाबत रेल्वे पोलिस निरीक्षक सचिन इंगवले यांच्याकडे दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असून पालघर रेल्वे पोलिस स्थानकात दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रवासी यांनी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरे तपासा असे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र विरार ते डहाणू रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याने या प्रकरणात नक्की चुकी कोणाची हे पुढे येऊ शकले नाही.
पालघर रेल्वे टीसी प्रवासीवर हात उचलणे योग्य नाही. रेल्वे टीसीचे कर्तव्य तिकीट तपासणे आणि प्रवाशांना मदत करणे असते आणि ते शारीरिक हिंसा वापरू शकत नाहीत. जर प्रवाशाने नियम मोडले किंवा गैरवर्तन केले, तर टीसीने योग्य कायदेशीर मार्गांनी कारवाई करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
संदर्भात पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्याशी संपर्क साधला असता प्रवाशांनी तिकीट तपासणीs यांच्यावर हल्ला केल्याने प्रवाशाविरुद्ध रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लोकसत्ता ला सांगितले.
पश्चिम रेल्वे स्थानकात अनेक घटना घडत असतात. मात्र विरार ते डहाणू स्थानका दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अशा घटनांचा उलगडा होऊ शकत नाही. पश्चिम रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. – ॲड प्रथमेश प्रभूतेंडोलकर, प्रवासी संघटना