पालघर जिल्हा प्रशासन परिस्थिती हाताळण्यास सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज होणारी करोना रुग्णवाढ ही चिंतेचा विषय ठरत आहे. भविष्यात रुग्णवाढीचा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून प्रशासन त्याबाबत कृतिशील झाले आहे. यासाठी राज्य स्तरावरून वारंवार जिल्ह्याचा आढावा घेतला जात आहे.

सद्यस्थितीत २ जानेवारीपर्यंत पालघर जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांहून जास्त झाला आहे. त्यामुळे वाढत असलेल्या रुग्णसंख्येमध्ये पालघर जिल्हा पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये येत आहे. झपाटय़ाने होत असलेली रुग्णवाढ याला नागरिकांचा बेजबाबदारपणाही तितकाच कारणीभूत ठरत आहे. आठवडे बाजार, सार्वजनिक स्थळे, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, रिसॉर्ट्स, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी नागरिक बेफिकिरपणे वावरताना दिसत आहेत. लग्न, पाटर्य़ा, सण-समारंभ कोणतेही नियम न पाळता गर्दीने जोरात सुरू आहेत. मुखपट्टी लावणे, हात सॅनिटाईज करणे, सामाजिक सुरक्षित अंतर राखणे अशी त्रिसूत्री कुठेही- कोणीही पाळताना दिसून येत नाही. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा कायम राहिल्यास पालघर जिल्ह्याला तिसऱ्या लाटेच्या भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल व हेच समारंभ करोनाची लागण होण्यास जबाबदार ठरतील असे तज्ज्ञांमार्फत सांगितले जात आहे.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, पर्यटनस्थळे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी त्रिसूत्री अंमलबजावणीचे पालन करण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलणे गरजेचे झाले आहे. तसेच या गर्दीला आवर घालणेही तितकेच आवश्यक बनले आहे. रात्रीच्या वेळेस जमावबंदी असली तरी बरेचसे नागरिक या आदेशाला बगल देताना दिसत आहेत. करोनाची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हा एक मात्र पर्याय असला तरी डहाणू, तलासरी भागांत अजूनही हवे तसे लसीकरण झालेले नाही. आ. विनोद निकोले स्वत: फिरून लसीकरण करून घेण्यासाठी जनजागृती करत आहेत.

रुग्णावाढ लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागप्रमुख यांच्यामार्फत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या रुग्णालयांमध्ये सुविधा नाहीत, त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून घेण्याचे सांगण्यात आले आहे. याचबरोबरीने जिल्हा प्रशासनाने करोना उपचार केंद्र पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केले असून प्राणवायू, कृत्रिम श्वसन यंत्रणा प्राणवायू साठवणूक, प्राणवायू प्रकल्प, औषधसाठा व इतर प्रकारच्या सुविधा रुग्णालयात सज्ज ठेवले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

लसीकरण

पहिली मात्रा : ८३.७३ टक्के

दुसरी मात्रा : ६२.४८ टक्के

३० डिसेंबर २०२१ अखेर सुमारे ४ लाख १७ हजार ५५५ नागरिकांनी पहिली लसमात्रा घेतलेली नाही.

दोन लाख ७६ हजार ४१७ जणांनी अद्याप दुसरी लसमात्रा घेतलेली नाही.

करोना उपचार रुग्णालये

डीसीएच – ३

रुग्णक्षमता – ३३०

कृत्रिम श्वसन यंत्रणा खाटा- ८६

कृत्रिम श्वसन यंत्रणा नसलेल्या  खाटा  – ८४

अतिदक्षता विभाग खाटा – १७०

प्राणवायूयुक्त खाटा -१६०

करोना आरोग्य केंद्रे

डीसीएचसी – १५

रुग्ण क्षमता – ७२०

प्राणवायूयुक्त खाटा – ५०५

बालकांसाठी प्राणवायूयुक्त खाटा – ३०

शिशुवर्ग, अंगणवाडी बंदचा निर्णय

  • तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी शाळांमधील तसेच अंगणवाडय़ांमध्ये होत असलेली गर्दी लक्षात घेता जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शिशुवर्ग,अंगणवाडी बंद करण्याच्या निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे.
  • पालघर हा राज्यातील सक्रिय रुग्णवाढ असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये आहे. ३० डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्याची साप्ताहिक रुग्णवाढीचा दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा १.५६ टक्के इतका होता. आता तो ५.१ टक्के इतका आहे.
  • जिल्ह्यात डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात पालघर जिल्ह्यात १७९ रुग्ण सापडले होते. चौथ्या आठवडय़ात २७० रुग्ण आढळले. त्यावेळी ही रुग्णवाढ ५०.८४ टक्के इतकी होती.

लसीकरण सत्रांवर भर द्या

राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग प्रशासकीय प्रमुख डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील, जिल्ह्यातील विविध प्रशासकीय यंत्रणांना आभासी बैठकीतून करोना रुग्णवाढीबाबत भीती व्यक्त करत सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लसीकरण न केलेल्या नागरिकांना व बालकांना गंभीर धोका आहे.  सध्याच्या लाटेतील व्यक्तींना मार्चच्या दुसऱ्या लाटेइतकाच (किंवा त्याहून अधिक) धोका आहे. त्यामुळे कृपया लसीकरण सत्रांवर अधिकाधिक भर देऊन लसीकरणाची उद्दिष्टे पूर्ण करा व नागरिकांना करोनाच्या संभाव्य धोक्यापासून वाचवा, असे आवाहनही डॉ. व्यास यांनी केले.

रुग्णालयातील खाटांची स्थिती

विलगीकरण खाटा – २७१५

प्राणवायूयुक्त खाटा- ६६५

कृत्रिम श्वसन यंत्रणा नसलेल्या खाटा – ८४

कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा – ८६

खाटांची एकूण संख्या  – ३५५०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाबाबत जिल्ह्यातील विविध यंत्रणासोबत वारंवार चर्चा व बैठकी सुरू आहेत. सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या व सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरण करून घेणे ही मोठी जबाबदारी सद्यस्थितीला आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. ज्या नागरिकांनी लसीकरण केले नाही, अशांनी पुढे येत आपले लसीकरण करून करोनाला थोपवण्यासाठी सहकार्य करावे हे आवाहन राहील. 

डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी