जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पालघर: पालघर जिल्ह्यात बुधवारपासून प्राथमिक शाळांना प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी ७८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तसेच आवश्यक दक्षता घेऊन पहिली ते चौथी दरम्यानच्या प्राथमिक शाळांचे  वर्ग सुरू करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या १६७९ शाळांमध्ये ६४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्याचपद्धतीने जिल्ह्यातील ५६ शासकीय शाळांपैकी २६ प्राथमिक शाळा सुरू झाल्या असून त्यामध्ये  ३६२४ विद्यार्थी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील २१९ खासगी प्राथमिक शाळांत एकूण १४२ शाळा सुरू झाल्या असून त्यामध्ये १०,५६३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. एकंदरीत शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आवश्यक उपाययोजना करून आपण शाळा सुरू ठेवल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

वसईत ८२ शाळा सुरू

वसई ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या  पहिली ते चौथीच्या ८२ शाळा सुरू झाल्या असून बुधवारी दोन हजार ८८२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर शासकीय चार पैकी ३ शाळा सुरु झाल्या असून एक हजार ३२० विद्यार्थी हजर होते.