९८ टक्के गुण मिळवत अर्थशास्त्रात पदवी; जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न

निखील मेस्त्री, लोकसत्ता
पालघर
:    वाडा तालुक्यातील एका मुलीने अंधत्वावर मात करत ९८ टक्के गुण मिळवत अर्थशास्त्रात पदवी संपादन करून पालघर जिल्ह्य़ात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. वाडा तालुक्यातील खरवली गावातील  दिव्यता प्रफुल्ल अधिकारी जिल्ह्यातील पदवी संपादन करणारी पहिलीच अंध विद्यार्थिनी आहे. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा मानस तिने व्यक्त केला असून त्यादृष्टीने प्रयत्नही तिने सुरू केले आहेत.

दिव्यता हिने प्राथमिक शिक्षण वाडा येथील विवेक नगर येथे तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पी. जे. हायस्कूल येथे केले. आई-वडिलांनी दिलेल्या बळामुळे ती बारावीपर्यंतची मजल मारू शकली. घरची परिस्थिती सर्वसामान्य असल्यामुळे तिला शिक्षणासाठी लागणारे साहित्य व आर्थिक मदत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने केली. बारावीनंतर पुढे शिकण्याची इच्छा होती. मार्गदर्शनासाठी  वंचितांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ मनोबल संस्थेचे यजुर्वेद महाजन यांच्या पालघर येथील एका शिबिरात तिने सहभाग घेतला तेथील महाजन यांच्या व्याख्यानाचा तिच्यावर प्रभाव पडला. तातडीने तिने त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले व जळगाव येथे पुढील शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. तिने जळगावच्या बेंडाळे महाविद्यालयातून शिकण्यास प्रारंभ केला.

तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या सर्वाची मदत तिने सार्थ ठरवली. अलीकडेच अर्थशास्त्र विषयात पदवीधर होऊन तिने विशेष प्रावीण्य मिळवले. पालघर जिल्ह्यात दहावी, बारावी व आता पदवीधर म्हणून पुढे येण्याचा अव्वल मान दिव्यताकडेच आहे. अंध असल्याने अभ्यासक्रमाच्या ध्वनिफिती ऐकून त्यांचे पाठांतर व आकलन करून परीक्षेच्या वेळी तिच्यासोबत असलेल्या लेखनिकाला प्रश्नांची उत्तरे सांगणे,असा

कटु अनुभव तिच्या माझ्यासह इतर वंचितांनी मागे न राहता खडतर वाटेचा प्रवास आत्मविश्वासाच्या पावलांनी सर करायला हवा. अभ्यास हे आव्हान असले तरी त्यातून खचून न जाता ही आव्हाने पेलण्याची क्षमता ठेवल्यास  नक्कीच यशस्वी व्हाल हाच माझा संदेश राहील. 

-दिव्यता प्रफुल्ल अधिकारी

दिव्यताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही आमचे जीवन समर्पित केले आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग तिने निवडला व त्यात ती यशस्वीही झाली याचा आम्हाला अभिमान आहे.

-प्रफुल्ल व प्रणिता अधिकारी,  दिव्यताचे आई-वडील