बोईसर : बोईसर एसटी आगारात चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोईसर एसटी आगारात सोमवारी दुपारच्या सुमारास चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने नियंत्रण कक्षा जवळील हिरकणी कक्षाला बस जाऊन धडकली. या अपघातात चालक आदिनाथ कुटे हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक आणि वाहकाव्यतिरिक्त बस मध्ये इतर कोणीही प्रवासी नसल्याने सुदैवाने अनर्थ टळला. मात्र बस स्थानकात झालेल्या या अपघातामुळे एसटीचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

बोईसर आगारात दोन आठवड्यापूर्वीच कामावर रुजू झालेला चालक आदिनाथ कुटे हा सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपली बस देखभाल दुरुस्ती विभागातून बस सुटण्याच्या जागेवर घेऊन येत असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने बस मुख्य नियंत्रण कक्षा जवळील नव्यानेच बांधलेल्या हिरकणी कक्षाला येऊन धडकली. बसच्या धडकेत हिरकणी कक्षाचे मोठे नुकसान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताच्या वेळेस बोईसर बस आगारात जवळपास १०० पेक्षा अधिक प्रवासी बसच्या प्रतीक्षेत उभे होते. मात्र ज्या ठिकाणी बस हिरकणी कक्षाला धडकली तिथे प्रवासी उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला. बोईसर एसटी आगारातील झालेल्या या अपघातामुळे एसटी प्रशासनामधील अनागोंदी समोर आली असून जुनाट बस, चालक आणि वाहकांवरील कामाचा अतिरिक्त ताण सेवा सुविधांचा अभाव, अल्प वेतन यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम यामुळे जिल्ह्यात एसटीच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे.