बोईसर : बोईसर चिल्हार मार्गावर अज्ञात वाहनाचे धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या या अपघात प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
बोईसर–चिल्हार मार्गावर सोमवारी सकाळी मान येथील शुभलक्ष्मी कोनार (वय ३८) या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. टाटा हाऊसिंग परिसरातील दुकानात कामावर जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. धडकेमुळे त्या रस्त्यावर पडल्या आणि त्याचवेळी बोईसरकडे जाणारा ट्रक (क्रमांक MH 04 DD 2505) अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह तब्येत घेऊन शवविच्छेदनासाठी तारापूर आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
महिलेला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार फरार झाला असून ट्रकचालकानेही वाहन घटनास्थळी सोडून पलायन केले आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पुढील तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
बोईसर चिल्हार मार्ग मृत्यूचा सापळा
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ते तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणारा १६ किमी अंतराचा बोईसर चिल्हार मार्ग वाहन चालकांसाठी सध्या मृत्यूचा सापळा ठरत आहे. दैनंदिन जवळपास ३५ ते ४० हजार वाहनांची प्रचंड वर्दळ या मार्गावरून होत असून पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था झाल्याने वारंवार अपघाती घटना घडत आहेत.
चौपदरी मार्गावर नागझरी ते खैरापाडा दरम्यान दुतर्फा दुकाने, व्यावसायिक गाळे आणि गोदामांच्या झालेल्या अतिक्रमणामुळे पायी चालण्यासाठी पदपथ नसल्याने नागरिकांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक वेळा वाहनांच्या धडके मुळे अपघाती घटना वाढत आहेत. या मार्गाची नियमित देखभाल दुरुस्ती करणे दुरुस्ती करणे एमआयडीसीच्या आवाक्याबाहेर जात असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
