पालघर : चिकू पिकाचे संरक्षण करायचे असल्यास किटक पकडणारे सापळे आवश्यक असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. किड आणि रोगाचे व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि चर्चासत्राचे आयोजन कोसबाड कृषी विज्ञान केंद्र येथे कृषी संशोधन केंद्र व कृषी विभागाने केले होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे आणि कृषी संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ अंकुर ढाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी ही विविध योजनांची माहिती दिली.
प्रा. उत्तम सहाणे यांनी प्रथम डहाणू, पालघर भागात भेटी दिलेल्या बागा आणि सद्य परिस्थितीची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर चिकू फळातील बी पोखरणारी अळी आणि कळी खाणारी अळी या महत्वाच्या किडींची ओळख, त्यांचे जीवनक्रम तसेच कोणत्या महिन्यांत कोणत्या किडी जास्त सक्रिय असतात आणि त्याची कारणे याविषयी सखोल माहिती दिली.
तसेच या किडींच्या नियंत्रणासाठी सांगितलेले उपाय करण्यासाठी एकरी एक याप्रमाणे निळ्या रंगाचा प्रकाश सापळा लावावा, फळातील बी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आणि कळी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी फेब्रुवारी ते जून महिन्यात खालील प्रमाणे कीटकनाशकाच्या दोन किंवा तीन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने घ्याव्यात असे सूचित केले. प्रोफेनोफोस १.५ मिली प्रति लिटर दुसरी फवारणीसाठी लॅमडा सायलोथ्रीन १ मिली प्रति लिटर किंवा डेल्टामेथ्रिन १ मिली प्रति लिटर पाणी.
चिकुवरील इतर किडींमध्ये फळमाशी सध्या जास्त त्रासदायक होऊ पाहते आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी फेब्रुवारी ते जून महिन्याच्या दरम्यान एकरी चार मिथाईल युजेनॉल युक्त फळमाशी सापळे लावण्याची शिफारस करत या सापळ्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
बुरशीजन्य रोगाचे कारण
कीटक शास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे यांनी ‘फायटोप्थोरा’ या बुरशीजन्य रोगाची माहिती दिली. या रोगासाठी पोषक वातावरण जसे ८० टक्के पेक्षा जास्त आद्रता आणि २२ ते २५ डिग्री सेल्सिअस तापमान या अनुकूल गोष्टी पावसाळ्यात म्हणजेच जुलै ते ऑगस्ट या महिन्या दरम्यान अशा प्रकारे वातावरण तयार होते.
तसेच बागेतील पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे न झाल्यामुळे बागेत आद्रता वाढते. जुन्या भागांची छाटणी न झाल्याने सूर्य प्रकाश जमिनीवर येत नाही तसेच हवा खेळती राहत नाही. अशी अनेक वेगवेगळी कारणे या रोगासाठी कारणीभूत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
रोगावरील उपाययोजना
जुन्या भागांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करणे, बागेतील अधिकचे पाणी उताराच्या दिशेने काढून देणे, चिकू झाडाच्या खोडाजवळ मातीची भर देऊन पावसाळ्यात झाड सशक्त करणे. तसेच सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे योग्य नियोजन केले तर झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात मेटलॉक्झिल व मनकोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करण्याची शिफारस यावेळी करण्यात आली.
निळ्या रंगाचा प्रकाश सापळा
कीटकांना आकर्षित करण्यासाठी निळ्या रंगाचा प्रकाश सापळा वापरला जातो. निळा रंग कीटकांना खूप आकर्षित करतो, त्यामुळे जेव्हा प्रकाश सापळ्याचा प्रकाश चालू होतो, तेव्हा कीटक त्या दिशेने आकर्षित होतात आणि सापळ्यामध्ये अडकतात. सापळ्यामध्ये एक विशेष रचना असते, जसे की चिकट पृष्ठभाग किंवा पाण्याची टाकी, ज्यात कीटक अडकतात आणि बाहेर पडू शकत नाहीत.
फळमाशी सापळे
मिथाईल युजेनॉल हे फळमाशी आकर्षित करणारे एक रसायन आहे. याचा उपयोग फळमाशीच्या नियंत्रणासाठी सापळे बनवण्यासाठी करतात. बाजारात तयार मिळणारे सापळे किंवा साध्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये मिथाईल युजेनॉल वापरून सापळे तयार करता येतात. कापसाच्या बोळ्याला मिथाईल युजेनॉलमध्ये बुडवून ते सापळ्यात ठेवावे.
मिथाईल युजेनॉलच्या वासाने नर फळमाश्या आकर्षित होऊन सापळ्यात येतात. काही सापळ्यांमध्ये, माश्या पाण्यात बुडून मरतात, तर काही सापळ्यांमध्ये कीटकनाशकांच्या प्रभावाने मरतात. २० ते २२ दिवसांनी कापसाचा बोळा बदलावा.