बहाडोली गावात बालकांना वाचनसंस्कृतीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
पालघर : शिक्षकांच्या संकल्पनेतून बालवाचकांसाठी ओटीवरचे बाल ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना बहाडोली गावात प्रत्यक्षात साकार झाली आहे. प्रतिभा बाल ग्रंथालय याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या उपक्रमामुळे बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे शक्य होणार आहे, अशी आशा शिक्षकांना आहे. बाल ग्रंथालयामार्फत विज्ञान, लहान मुलांच्या गोष्टी, कथा, मनोरंजनात्मक साहित्य, अवयव ओळख होणारे साहित्य, सामान्य ज्ञान व लहान मुलांना सहज सोपे समजतील अशी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना घरच्या घरी ही पुस्तके वाचायला मिळणार आहेत. हे बाल ग्रंथालय आठवडय़ातून दोनदा लहान मुलांसाठी सुरू असेल. गावातील किंवा पंचक्रोशीतील पहिली ते दहावीचे विद्यार्थी या बाल ग्रंथालयात असलेली कोणतीही पुस्तके वाचनासाठी नेऊ शकतात. हे विद्याार्थीच या बाल ग्रंथालयाचे सदस्य राहणार आहेत. विशेषत: हे बाल ग्रंथालय विद्यार्थीच चालवणार आहे. या गावातील सहावीची विद्यार्थिनी सुरवी संजय कडू ही या ग्रंथालयाचे कामकाज पाहणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे व त्याची नोंद ठेवण्याचे काम ती करणार आहे. याचबरोबरीने बालवाचक वाढवण्यासाठीही तिच्यामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी गावातील सुशिक्षित तरुण व शिक्षक समूह यांचे मार्गदर्शन राहणार आहे.
सोनोपंत दांडेकर महाविद्याालय, लायन्स क्लब पालघर व बहाडोली गावातील शिक्षक समूह यांच्या प्रयत्नातून प्रतिभा बाल ग्रंथसंग्रहालय पाटील आळी येथे बुधवारपासून कार्यरत झाले आहे. प्राचार्य किरण सावे, लायन्स क्लब अध्यक्ष अतुल दांडेकर यांच्या हस्ते बाल ग्रंथालयाचा शुभारंभ केला गेला. लायन्स क्लबचे पराग जोशी, भोगीलाल विरा, हितेंद्र शहा, बाल ग्रंथालय संकल्पनेचे शिक्षक प्रकाश चुरी, निखिल चुरी, वैभव कुडू, विवेक कुडू, आरती कुडू, दिलीप किणी, किरण पाटील उपस्थित होते. गावातील सुशिक्षित पिढीने पुढची पिढी घडविण्यासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. गावांमध्ये भौतिक सुविधा अनेक आहेत, पण बौद्धिक संपदा नाही. बाल ग्रंथालयाद्वारे बालकांसाठी वाचन चळवळ उभी करण्याचा हा पहिला प्रयत्न असला तरी पुढे त्याचे रूपांतर सार्वजनिक ग्रंथालय म्हणून होईल, असा विश्वास बहाडोलीकर येथील प्राध्यापक विवेक कुडू यांनी व्यक्त केली.
मोबाइलच्या युगात बालमनावर वाचनसंस्कृतीचे ठसे उमटविण्यासाठी बाल ग्रंथालय संकल्पना प्रभावी ठरेल असा विश्वाास आहे. जिल्ह्यात गावोगावी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अशी ग्रंथालये व वाचनालये उभारल्यास वाचन चळवळ उभी राहील.
– डॉ. किरण सावे, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्याालय