कासा : जव्हार, मोखाडा तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत व्हावा तसेच डहाणू १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्रावरील भार कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने तीन वर्षांपूर्वी जव्हार येथे १३२ केव्ही क्षमतेचे वीजपुरवठा उपकेंद्राचे काम कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण केले. परंतु उपकेंद्राचे काम पूर्ण होऊन अद्याप मुख्य विजवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने उपकेंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे जव्हार मोखाडा तालुक्यातील १६४ गावांमधील वीजग्राहकांना वीज पुरवठा खंडित झाल्यास अंधारात राहण्याची वेळ येते. तरी जव्हार येथील वीजपुरवठा उपकेंद्र सुरू होण्याची वीज ग्राहक तीन वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत.

सद्यस्थितीत डहाणू, जव्हार, मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करण्यासाठी आशागड, गंजाड, सुर्यानगर येथे ३३ केव्ही चे उपकेंद्र आहेत, तर जव्हार आणि मोखाडा येथे २२ केव्ही चे उपकेंद्र आहेत या सर्व उपकेंद्रांना डहाणू येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्रातुन मुख्य वाहिणीद्वारे वीजपुरवठा केला जातो. ही मुख्य वीज वाहिनी ४० ते ४५ वर्षे जुनी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज वाहिनीच्या तारा तुटतात, वादळ पाऊस यामुळे या वीज वाहिनीचे खांब उन्मळून पडतात. त्यामुळे गंजाड, सुर्यानगर, जव्हार, मोखाडा या सर्व उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित होतो. व हा सर्व भाग अंधारात जातो.

या समस्येतून वीज ग्राहकांची सुटका व्हावी, जुन्या वीज वाहिनीत बिघाड झाला तरी जव्हार मोखाडा येथील वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्र वीज महामंडळाने पाच वर्षांपूर्वी जव्हार येथे नवीन १३२ केव्ही वीजपुरवठा क्षमतेच्या उपकेंद्राचे काम पूर्ण केले. परंतु अद्यापही जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्राला वीज पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ६० किमी च्या वीज वाहिनीचे काम अपूर्ण असल्याने हे उपकेंद्र कार्यान्वित झालेले नाही.

जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्राला ज्या वीज वाहिनीद्वारे वीजपुरवठा होणार आहे.त्या वीज वाहिनीचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. सदर विजवाहिनीचा ३७ किमी भाग हा वनविभागाच्या जमिनीवरून जाणार आहे. त्यामुळे या भागात काम करण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये निवेदन दिलेले आहे. वनविभागाच्या परवानग्या घेण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने या वाहिनीचे काम संथ गतीने सुरू होते आता परवानगी मिळाली असून.

जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्र पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील १६४ गावांना या उपकेंद्रातुन वीज पूवरठा होणार आहे.तसेच डहाणू येथून आशागड, गंजाड, सुर्यानगर या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला तर जव्हार १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्रातून वीजपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे जव्हार येथील वीजपुरवठा उपकेंद्र कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरी सदरील वीजपुरवठा उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी वीज ग्राहक करत आहेत.

जव्हार १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्राला वीज पुरवठा करण्यासाठी ८० किमी विजवाहिनीचे काम सुरू आहे.वीज वाहिनीचे ३७ किमी भाग हा वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. त्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना डिसेंबर २०१९ मध्ये निवेदन दिलेले आहे. नुकतेच वनविभागाच्या हद्दीतून विजवाहिनीच्या कामाला परवानगी मिळावी आहे. आता काम सुरू पुढील काही महिन्यात हे काम पूर्ण होईल. – राजेश ढाकणे -मुख्य अभियंता, महापारेषण