पालघर : समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाकरिता (डीएफसी) सफाळे व नवली फाटक बंद झाल्यामुळे पदचारी, विद्यार्थी, दुचाकी व अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच अधिकतर पदचारी बंद फाटकाच्या कोपऱ्यातून धोकादायक प्रवास करताना दिसून आले आहेत. यामुळे नागरिकांच्या सोयीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे.

डीएफसीसी संजाण ते सफाळे दरम्यान कार्यरत होणार असल्याने ३१ मार्च रोजी सफाळे रेल्वे फाटक व १० एप्रिल पासून नवली रेल्वे फाटक देखील वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. नवली व सफाळे येथील नागरिकांना कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने तसेच उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग हे किचकट, लांब व वळसा घालून असल्याने नागरिकांना हा पर्यायी मार्ग अवलंबताना त्रास सहन करावा लागतो.

पालघर पूर्वेकडील नवली, वेवूर, वरखुंटी, कमारे या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना नवली फाटक बंद झाल्याचा फटका बसला आहे. फाटकाच्या पश्चिमेकडे प्राथमिक – माध्यमिक शाळा, ग्रामीण रुग्णालय, कचेरी, पोलीस स्टेशन व इतर महत्त्वाची कार्यालये असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचा दिवसभर या मार्गाने प्रवास सुरू असतो. तसेच फाटकाच्या पूर्वेला नवली परिसरात मोठमोठाली गृह संकुले असल्याने यामध्ये राहणारे जवळपास चार ते पाच हजार नागरिक व अनेक वाहने या मार्गाने सतत प्रवास करत असायची.

सफाळे येथील माकणे, विराथन खुर्द, मांडे, जलसार, विराथन बुद्रुक, टेंभीखोडावे या गावातील प्रवासी, स्थानिक नोकरदार, वाहनचालक, बागायतदार, भाजीपाला विक्रेते, दूध व्यवसायिक यांच्यासह विद्यार्थी वर्गाला पूर्व पश्चिम वाहतुकीकरिता तसेच ५०-६० गावांसाठी सफाळे रेल्वे फाटक क्रमांक ४२ हा जोड रस्ता होता. शासकीय कार्यालय शाळा, दवाखाने व इतर महत्त्वाची कार्यालय ही सफाळ्याच्या दोन्ही बाजूस विभागल्या गेल्यामुळे अनेक नागरिकांचा पूर्व पश्चिम असा प्रवास सतत सुरू असतो.

गेल्या काही वर्षात नवलीच्या आजूबाजूच्या परिसरातील व सफाळे येथील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना फाटक हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. मात्र फाटक बंद नंतर रेल्वे प्रशासनाने नागरिकांना उपलब्ध करून दिलेले पर्याय हे त्रासदायक व वेळखाऊ असल्याने नवली व सफाळे येथील नागरिक सुस्थितीत पर्याय उपलब्ध होईल या प्रतीक्षेत आहेत.

पर्यायी मार्गांची अडचण

नवली फाटक बंद झाल्यानंतर फाटकाच्या पूर्वेकडून दक्षिणेकडे जवळपास ७०० ते ८०० मीटर अंतरावर भुयारी मार्ग (अंडरपास) उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मात्र पूर्वेकडून या भुयारी मार्गातून गेल्यानंतर पश्चिमेकडे हा रस्ता लोकमान्य नगर परिसरातून कचेरी रोड कडे निघतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या नागरिकाला दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून रेल्वे स्टेशन गाठावे लागेल. तसेच पावसाळ्यामध्ये या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पुढील दोन महिन्यानंतर नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागेल.

सफाळे येथील पूर्व – पश्चिम ओव्हरब्रीज सुरु झालेला असला तरी पदाचाऱ्याकरीता रेल्वे फाटकात अजूनही पर्यायी पूर्व -पश्चिम पादचारी पूल झालेला नाही. अस्तित्वात असलेल्या पुलाच्या दक्षिणेच्या बाजूला दोन्ही विस्तार प्रकल्प ओलांडण्यासाठी नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. मात्र फाटक बंद नंतर असलेला पर्यायी रस्ता हा तीन ते चार किलोमीटरचा वळसा घालून गाठावा लागत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचा आधार

पालघर पूर्व पश्चिमेला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग १६०अ व्यतिरिक्त इतर कोणताही मुख्य पर्यायी मार्ग नसल्याने फाटक बंद झाल्यानंतर वाहतूक महामार्गावरून वळली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला पूर्व पश्चिम जाणाऱ्या पदचारां करिता देण्यात आलेला १० ते ११ मीटर उंचीचा जिना हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पूर्वेकडे २०० ते २५० मीटर आत व निर्जन रस्ता असल्याने या जिन्याचा कोणीही वापर करताना दिसत नाही.

हातगाडी व घोडागाडी वाल्यांची गैरसोय

नवली व सफाळे फाटक बंद पडल्यानंतर पालघर येथील हातगाडी वाले, सायकल चालक विद्यार्थी, घोडा गाडीवाले व इतर मानवी शक्ती वापरून चालवणारी वाहने यांना पोटापाण्यासाठी उंच पुलावरून ढकलून आपली वाहने पूर्वेकडून पश्चिमेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे असा सकाळी व सायंकाळी प्रवास करावा लागतो. उड्‌डाणपुलावर पादाचाऱ्यांसाठी तसेच सायकल, दुचाकी चालकांसाठी मार्गीकेलगत जागा नसल्याने प्रवाशांसाठी गैरसोय व धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

नवली उड्डाणपुलाची प्रतीक्षा

नवली येथील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून जून मध्यपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणे अपेक्षित आहे. नवली फाटक बंद झाल्यामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाला काही अंशी या उड्डाणपुलाचा आधार मिळेल. नवली फाटक रस्त्याची उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरावस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी हा पूल सुरू होणे आवश्यक आहे.

फाटक बंद झाल्यानंतर देखील काही प्रवासी फाटक ओलांडून धोकादायक प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग व राष्ट्रीय महामार्ग व्यतिरिक्त पूर्व पश्चिम प्रवासाकरिता नागरिकांच्या सोयीचा रस्ता उपलब्ध करून द्यावा. -आदित्य इंगोले, प्रवासी