डहाणू: पालघर जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार, माजी आमदार, पक्षाचे माजी राज्य उपाध्यक्ष, माजी राज्य सचिव मंडळ सदस्य तथा तलासरी तालुक्यातील शिक्षण महर्षी, आदिवासी प्रगती मंडळ संस्थेचे अध्यक्ष कॉम्रेड लहानु शिडवा कोम यांचे बुधवार २८ मे रोजी पहाटे ५.३५ वाजता वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून अखेर उपचारादरम्यान यांचे निधन झाले आहे.

लहानु कोम यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले असून गेल्या सहा दशकांपासून त्यांच्या संस्थेच्या विद्यालायामार्फत विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय समाजकार्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले असून तलासरी, डहाणू सारख्या दुर्गम भागाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे. सन १९५९ पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये सहभागी होऊन त्यांनी समाज कार्याला सुरुवात केली. त्यांनतर १९६२ पासून आजवर त्यांनी आदिवासी प्रगती मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. सन १९७७ मध्ये ते डहाणू लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनतर १९९० मध्ये जव्हार मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. शिवाय पक्षाच्या कामात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले असून पक्षवाढीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

खासदार, आमदार आणि पक्षाचे विविध महत्त्वाचे पद भुषवून देखील त्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवत सर्वसामान्यांप्रमाणे आपले जीवन व्यतीत केल्यामुळे परिसरात त्यांचा नावलौकिक प्राप्त झाला. बुधवारी पहाटे त्यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या मृतदेह अंतिम दर्शनासाठी गुरुवार २९ मे रोजी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तलासरी येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासमोर ठेवण्यात येणार असून ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून काढण्यात येणार आहे. लहानु कोम यांच्या मृत्यु पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नात व नातू असा परिवार आहे.

तलासरी, डहाणू सारख्या दुर्गम आदिवासी बहुल भागामध्ये शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने लहानु कोम यांनी महत्त्वाचे योगदान दिले असून समाजकार्यात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या जाण्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजाचे मोठे नुकसान झाल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या लहानु कोम यांनी आपल्या समाजाच्या उद्धारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करत समाजकार्याला सुरुवात केली. पक्षाचे काम सुरू केल्यापासून ते अविरत समाजकार्यात कार्यरत होते. १९६२ साली आदिवासी प्रगती मंडळ संस्थेचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रातील कामगिरीला सुरुवात केली. त्यांनतर एकदा खासदार आणि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील त्यांनी आपल्या समाजाला शिक्षण क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सदैव उपलब्ध राहत असून अनेकांच्या मदतीसाठी धावून जात असल्यामुळे नागरिकांकडून त्यांना भरपूर प्रेम मिळाले. त्यांच्या निधनामुळे परिसरातून शोककळा उलटत असून आदिवासी समाजातील एक महत्त्वाचा हिरा गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.